SSC Supplementary Exam : दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी बुधवारपासून ऑनलाइन अर्ज होणार खुला pune SSC Supplementary Exam online form submit from wednesday education | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online Form

SSC Supplementary Exam : दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी बुधवारपासून ऑनलाइन अर्ज होणार खुला

पुणे - दहावीच्या जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना येत्या बुधवारी (ता.७) ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे प्रकटनाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.

दहावीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२३मध्ये घेण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर अर्ज भरायचा आहे.

दहावीच्या मार्च २०२३ मधील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइन घेता येणार आहे. पहिल्यांदा परीक्षा देणाऱ्या आणि श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०२३ आणि मार्च २०२४ अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध राहणार आहेत. पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

- माध्यमिक शाळांमार्फत अर्ज भरण्यासाठी मुदत : ७ ते १६ जून (नियमित शुल्कासह) आणि १७ ते २१ जून (विलंब शुल्कासह)

- माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्याचा कालावधी : ८ ते २२ जून

- माध्यमिक शाळांनी शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय मंडळाकडे देणे : २३ जून