Entrance Exam : विद्यापीठांसाठी एकाच प्रवेश परीक्षेची शिफारस; ‘एनईपी’मधील तरतूद pune university one entrance exam Recommend Provision in NEP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

new education policy

Entrance Exam : विद्यापीठांसाठी एकाच प्रवेश परीक्षेची शिफारस; ‘एनईपी’मधील तरतूद

पुणे - नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आजकाल प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र प्रवेश परीक्षा द्यावी लागते. देशभरात केंद्रीय विद्यापीठासह सार्वजनिक व खासगी विद्यापीठांमध्ये शेकडो प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. पर्यायाने विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा तर वाया जातोच. त्याचबरोबर आर्थिक ताणही सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये (एनईपी) राष्ट्रीय स्तरावर एकच प्रवेश परीक्षा सुचविण्यात आली आहे.

शैक्षणिक धोरणाच्या आराखड्यानुसार, विद्यापीठ प्रवेश परीक्षांची तत्त्वे एकसारखी असतील. त्यासाठी ही परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) घेईल. मात्र, या परीक्षेनुसार प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय संबंधित विद्यापीठे व महाविद्यालयांवर सोपविण्यात आला आहे. एनटीए उच्च गुणवत्तेची सामान्य योग्यता चाचणी तसेच विज्ञान मानव्यशास्त्रे, भाषा कला आणि व्यावसायिक विषयांमधील विशेषीकृत सामान्य विषय परीक्षा घेण्याचे काम करेल. या परीक्षांमध्ये संकल्पनांची समज आणि ज्ञानाचा वापर करण्याची क्षमता तपासली जाईल.

फायदा काय होईल?

शेकडो विद्यापीठांनी स्वत:च्या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेण्याऐवजी, या एका परीक्षेमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरचा भार मोठ्या प्रमाणात हलका होईल. त्यांच्या प्रवेशासाठी एनटीए मूल्यांकन वापरण्याबाबतचा निर्णय विद्यापीठे आणि महाविद्यालयांवर सोडला जाईल, असेही धोरणात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर संबंधित विद्यापीठे व महाविद्यालयांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

केंद्रीय स्तरावर प्रवेश परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्याला देशभरामध्ये कोठेही प्रवेश घेण्याची मुभा मिळते. याचा फायदा विद्यार्थ्यांबरोबरच विद्यापीठांना किंवा शैक्षणिक संस्थांना होणार आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांमध्ये विविधता येत सांस्कृतिक देवाणघेवाणही होईल.

- डॉ. नितीन करमळकर, अध्यक्ष, एनईपीसाठीची राज्य सुकाणू समिती

प्रवेश परीक्षेचे वैशिष्ट्ये

* पदवीपूर्व व पदवी अभ्यासक्रमांसाठी, फेलोशिपसाठी

* देण्यासाठी विषयांची निवड करता येणार

* विद्यापीठ विद्यार्थ्याचा वैयक्तिक विषयांचा पोर्टपोलिओ पाहू शकेल

* विद्यापीठ वैयक्तिक आवडी व प्रतीभा यांच्या आधारे प्रवेश देऊ शकेल

* ती घेण्यासाठी एनटीए स्वायत्त चाचणी संस्था म्हणून काम करेल