अखेर कुलगुरू पदासाठी अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

गेल्या तब्बल नऊ महिन्यांपासून रखडलेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे.

Pune University : अखेर कुलगुरू पदासाठी अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ

पुणे - गेल्या तब्बल नऊ महिन्यांपासून रखडलेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू शोध व निवड समितीने मंगळवारी अखेर कुलगुरू पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाहीर केली असून इच्छुकांना ३० मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली आहे. ही प्रक्रिया पार पडल्यास मे महिन्याच्या सुरवातीस विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ १८ मे रोजी संपला. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलांना राज्यपालांनी मान्यता न दिल्याने कुलगुरू निवड प्रक्रिया रखडली होती. राज्यात जुलैमध्ये सत्तांतर झाल्यानंतर राज्य सरकारने विद्यापीठ कायद्यातील प्रस्तावित बदल रद्द केले. त्यानंतर कुलगुरू शोध व निवड समिती नियुक्त करण्यात आली.

मात्र, त्यातही समितीच्या सदस्यांची संख्या पूर्ण होत नसल्याने ही प्रक्रिया रखडली. समितीची सदस्य संख्या पूर्ण झाल्यानंतरही त्यात विद्यापीठ अनुदान आयोगाचा प्रतिनिधींचा समावेश करण्यात आलेला नव्हता. तरीही देखील राज्य सरकारने कुलगुरू निवड२८ प्रक्रिया राबविण्याचे जाहीर केले. त्यानुसार कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाल्याची जाहिरात काढण्यात आली आणि उमेदवारांना १४ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली. त्यावेळी सात इच्छुकांनी अर्ज केले होते. पण ही प्रक्रिया रद्द करण्यात आली.

केरळमधील कुलगुरू निवड प्रक्रियेतील वादावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुलगुरू निवड समितीत विद्यापीठ अनुदान आयोगाचा (युजीसी) प्रतिनिधी असणे बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार युजीसीच्या प्रतिनिधीचा समावेश करून नव्याने कुलगुरू निवड समिती स्थापन करण्यात आली. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत आहे. आता या समितीमार्फत आता कुलगुरू पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

‘कुलगुरू’ पदासाठी असे मागविण्यात येतात अर्ज

विद्यापीठाच्या परिक्षेत्रात पुणे, नाशिक, नगर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. विद्यापीठाच्या कुलगुरू पदाकरिता महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ (कलम ११) नुसार कुलगुरू पदासाठी दिलेल्या शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येतात. संस्थांनासुद्धा योग्य उमेदवारांची नामनिर्देशने पाठविता येतात. ‘कुलगुरू’ पदासाठी दिलेली शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या, तसेच या प्रतिष्ठेच्या आणि आव्हानात्मक जबाबदारीचे काम करण्यास इच्छुक व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकतात.

‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी शैक्षणिक अर्हता, अनुभव, अर्जाचा नमुना आणि इतर आवश्यक कागदपत्रांचा तपशील दर्शविणारी सविस्तर जाहिरात ‘www.unipune.ac.in ’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ३० मार्च असून त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही,’’ असे कुलगुरू शोध व निवड समितीने कळविले आहे.

‘‘विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली असून वैयक्तिक आणि संस्थात्मक नामनिर्देशने देखील आमंत्रित करण्यात आली आहेत. निवड समितीसंदर्भातील नियमातील बदलानंतर पुन्हा सुरू झालेल्या या प्रक्रियेतून लवकरच नवीन कुलगुरू कार्यभार स्वीकारतील, अशी अपेक्षा आहे.’’

- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ