इम्प्रूव्ह युअरसेल्फ : ‘गोष्ट’ सकारात्मक बदलाची... 

रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर 
Thursday, 25 June 2020

तुम्हालाही कारचालकाप्रमाणे नकारात्मक वाटतेय का?गेल्या काही महिन्यांपासून कोरोना,लॉकडाउनमुळे नकारात्मकता वाढतेय,असंही तुम्हाला वाटत असेल.तर मग तुम्हीही तुमची गोष्ट आवर्जून बदलायला हवी.सुरवात करताय ना?

मला एकेदिवशी एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर छोटे व्याख्यान द्यायला जायचे होते. ओलाच्या कारचालकासोबत रस्त्यामध्ये गप्पा मारण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याने मला विचारले, ‘‘सर, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का?’’ मी होकार दिला. तो आपली गोष्ट सांगू लागला. 

एक राज्य होते. एकेदिवशी एक सैनिक जखमी चोराचा पाठलाग करत होता. मात्र, सैनिकाला हुलकावणी देण्यात चोर यशस्वी ठरला. तो एका संन्याशाच्या आश्रमात पोचला. त्याने पाहिले की, तेथे एक घोडा बाहेरच्या झाडाच्या बाजूला बांधलेला आहे. त्या दयाळू संन्याशाने जखमी चोराला पाहिले. त्याने चोराला आपल्या आश्रमात आश्रय दिला. त्याचप्रमाणे जखमेवर मलमपट्टी करत त्याची शुश्रूषा केली. रात्री दोघेही झोपी गेले. पहाटे चोर संन्याशाच्या आधी उठला. संन्याशाने केलेली मदत विसरत आश्रमाबाहेरचा घोडा चोरून त्याने पलायन केले. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘‘सर, तुम्ही मला आता सांगा की, या संन्याशाचा काय फायदा झाला? चांगल्या व्यक्तींना नेहमीच वाईट व्यक्तींचा त्रास सहन करावा लागतो. ही जगाची रीतच आहे. या जगात चांगल्या व्यक्ती जगूच शकत नाहीत,’’ चालकाने गोष्टीचे तात्पर्य सांगत मला विचारले. 

मी लगेच विचारात पडलो. त्याला त्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी माझी गरज होती. मी म्हणालो, ‘‘मला गोष्ट तरी पूर्ण करू दे. चोर संन्याशाचा घोड्यावर बसून शहरात गेला. तिथे लोकांनी घोड्याला ओळखले. राजाने तो संन्याशाला आदरपूर्वक भेट दिला होता. तोच घोडा या चोराकडे पाहून एकाने तात्काळ सैनिकांना खबर दिली. सैनिकांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेतली. चोराला अटक केली. चोराने आपला गुन्हा कबूल केला. त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. हा खरा आयुष्याचा नियम आहे.’’ 

यावर कारचालक म्हणाला, ‘‘सर, मला समजले. तुम्ही काय करता.’’ 

मी हसलो आणि म्हणालो, ‘‘हेच तर मी करतो. लोकांना त्यांच्या गोष्टी बदलण्यात मदत करतो.’’ तुम्हालाही या कारचालकाप्रमाणे नकारात्मक वाटतेय का? गेल्या तीन-चार महिन्यांपासून कोरोना, लॉकडाउनमुळे नकारात्मकता वाढतेय, असंही तुम्हाला वाटत असेल. तर मग तुम्हीही तुमची गोष्ट आवर्जून बदलायला हवी. सुरवात करताय ना? 

पुणे

सकारात्मकता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramesh-sood-article about Positive change

Tags
टॉपिकस