
Deepak Kesarkar : दप्तराचे ओझे कमी करण्यास उपाय करा; दीपक केसरकर
पुणे : ‘‘दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पाठ्यपुस्तकांची एकात्मिक स्वरूपात चार भागात विभागणी करावी. प्रत्येक पाठ, कविता यानंतर गरजेनुसार कोरी पाने समाविष्ट करावीत,’’ अशा सूचना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत सर्व विभागांचा आढावा केसरकर यांनी बैठकीत घेतला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, उपसचिव समीर सावंत उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, ‘‘प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वह्या शाळेत आणण्याची आवश्यकता असू नये. पाठ्यपुस्तकात दिलेल्या पानांचा वापर विद्यार्थ्यांना करता येईल. सोबतच विद्यार्थ्यांना शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्यास त्यांच्या दप्तराचे ओझे कमी होईल. विद्यार्थ्यांच्या लेखनाचे शिक्षकांकडून अवलोकन होणे आवश्यक आहे.’’
आधार नोंदणीबाबत सूचना
आधार नोंदणी पूर्ण न झाल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, त्यासाठी काळजी घेण्याची सूचनाही शिक्षणमंत्र्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केली आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये कृषी विषयाचा समावेश करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच शिक्षण विभाग आणि कृषी विभाग यांच्या समन्वयाने शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्रत्येक शाळेत परसबाग करण्यात यावी, असे केसरकर यांनी सांगितले. यावेळी दिवसे यांनी राज्यातील स्काऊट, गाइड तसेच क्रीडा शिक्षक नियुक्तीबाबत माहिती दिली. यावेळी मांढरे यांनी शिक्षणातील योजना आणि अन्य विषयांचे सादरीकरण केले. बैठकीत राज्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अंतिम संच मान्यतेसाठी मुदतवाढ देण्यात यावी. आवश्यकता तपासूनच नवीन शाळांना मंजुरीचे प्रस्ताव सादर करावे. शिपाई पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीबाबत तातडीने कार्यवाही करावी. अपंग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत पात्र शिक्षकांचे समायोजन करावे. केंद्रप्रमुखांची पदेही तातडीने भरावीत.
- दीपक केसरकर, शिक्षणमंत्री
स्काउट गाइड अनिवार्य करणार ः केसरकर
वि द्यार्थ्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा रुजवायला हवी. व्यक्तीमत्त्व विकास आणि कौशल्याधारीत प्रशिक्षणासाठी प्राथमिक शाळांमध्ये ‘स्काऊट गाइड अनिवार्य करणार आहोत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले. खासगी शाळांच्या वाढत्या मक्तेदारी विषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘खासगी शाळांतील प्रत्येक उपक्रमात पालकांना आर्थिकदृष्ट्या सहभागी होणे शक्य नाही. अशावेळी मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. खासगी शाळांमध्ये शिकविले जाणारे सर्व विषय सरकारी शाळांमध्ये शिकवले जातात. केवळ इंग्रजीच्या हव्यासापोटी पालकांनी खासगी शाळांच्या मक्तेदारीला बळी पडू नये.’’
ते म्हणाले, ‘‘या पुढचे शिक्षण हे मराठीतूनच असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. पालकांनीही आता इंग्रजी माध्यमाचा हव्यास सोडायला हवा. खासगी प्राथमिक शिक्षणाला जेवढी शिस्त लावता येईल, तेवढा प्रयत्न आम्ही करतोय. नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस आधीच गणवेश आणि तीन दिवस आताचा नवा गणवेश असेल, असेही त्यांनी सांगितले.
‘शिक्षक भरती पूर्ण करणार’
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या भरती संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिक्षक भरतीला पाच जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. ती उठल्यावर आम्ही तातडीने शिक्षक भरती पूर्ण करू, राज्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेला शिक्षक मिळणार, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.