आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया होणार सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RTE

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे.

RTE Admission : आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया होणार सुरू

पुणे - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत आवश्यक कागदपत्र म्हणून बालकांचे आधार कार्ड स्वीकारण्याच्या निर्णयावर शिक्षण विभागाकडून राज्य सरकारचे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. हे मार्गदर्शन आल्यानंतर प्रवेश प्रक्रियेतील अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांवर बालकांच्या प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या अंतर्गत शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता प्रवेशासाठी उपलब्ध जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचा सूतोवाच गोसावी यांनी केला.

सरकारी लाभाच्या योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे. त्यानुसार आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया ही देखील सरकारी योजना आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलांचे आधार कार्ड लागण्याची शक्यता आहे. मात्र, शाळा प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यात अनेक मुलांचे आधार कार्ड नसते.

या पार्श्वभूमीवर मुलांकडे आधार कार्ड नसल्यास प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल का, आधार कार्ड काढताना मिळणाऱ्या पावतीच्या आधारे प्रवेश देता येतील का, याबाबत राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. यावर येत्या दोन दिवसांत सूचना मिळण्याची शक्यता आहे, तसेच कोरोना काळात पालक गमाविलेल्या बालकांनाही या प्रवेश प्रक्रियेत सामावून घेण्यात येणार आहे. त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याबाबतही सरकारकडून सूचना मागविल्या आहेत, असेही गोसावी यांनी सांगितले.