पुढील काळ एआय आणि रोबोटिक्सचाच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sachin arondekar writes future belongs to AI and robotics education

बंगळूरच्या विमानतळावर उतरला की, अगदी हसतमुखाने ‘टेमी’ नावाचा रोबोट तुमचे स्वागत करतो

पुढील काळ एआय आणि रोबोटिक्सचाच!

सचिन आरोंदेकर

बंगळूरच्या विमानतळावर उतरला की, अगदी हसतमुखाने ‘टेमी’ नावाचा रोबोट तुमचे स्वागत करतो. तो विमानतळावर असणाऱ्या मदतनीसाप्रमाणेच तुम्हाला सर्व प्रकारची मदत करतो. तुमच्या सोबत येऊन तुम्हाला हव्या त्या ठिकाणी घेऊन जातो. तुमचं चेकिंग काउंटर कोठे आहे, तुमचे विमान कुठे लागणार आहे, तुमच्या विमानाच्या गेटपर्यंत कसे जाता येईल, तुम्हाला अपेक्षित असणारा खाद्यपदार्थांचा स्टॉल कुठे आहे, अशा प्रत्येक बाबतीत हा रोबोट तुम्हाला मदत करतो.

एखाद्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नसल्यास तो थेट संबंधित व्यक्तीला फोन करून तुम्हाला त्याच्याशी जोडून देतो. असे दहा रोबोट सध्या बंगळूर विमानतळावर कार्यरत असून ते प्रवाशांना अतिशय वेगवान सेवा देत आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) रोबोटिक्स तंत्रज्ञानात केलेल्या वापराचे हे उत्तम उदाहरण आहे. मुंबई स्थापन झालेल्या ‘आर्टिलिजंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने हा रोबोट विकसित केला आहे. असा रोबोट ही सुरुवात आहे. अशा प्रकारचे ‘सोल्युशन’ बेस तंत्रज्ञान विकसित करण्यावर ‘आर्टिलिजंट’चा भर आहे.

यापुढचा कालावधी हा प्रगत तंत्रज्ञानाचा राहील असे आपण म्हणतो, परंतु या तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड असेल. त्यातून उत्पादकता, विविध सेवा यांचा वेग वाढणार असून, कामाचा दर्जा सुधारणार आहे. त्यामुळे ‘एआय’ आणि रोबोटिक्स यांचा वापर सर्वच क्षेत्रात वाढणार आहे. एकदा वापर वाढला की या क्षेत्रातील संधीही वाढतात. त्यामुळे करिअरसाठी हे क्षेत्र अधिक आश्वासक राहणार आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आणि रोबोटिक्स परस्पर पूरक

‘एआय’ आणि रोबोटिक्स यात फरक असला तरी आता एआय चा वापर विविध तंत्रज्ञानात वाढला आहे. त्यामुळे हे दोन्ही एकमेकांना पूरक बनले आहे. एका प्रकारात फक्त सॉफ्टवेअर असू शकते तर दुसरीकडे चालता बोलता रोबोट आपण पाहतो तसा रोबोट असू शकतो. ‘चॅटबॉट’ हा दोन्ही तंत्रज्ञानाचा योग्य मिलाप आहे.

माणूस जे काम करतो, त्याचे ऑटोमेशन म्हणजे रोबोटिक्स आहे. रोबोटमध्ये ‘एआय’चा वापर वापर वाढला आहे, त्यामुळे त्याच्या कामाचे स्वरूप आणि वापरही वाढला आहे. गुगल असिस्टंट हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. रोबोट आपण गेली वीस वर्षांपासून आपण ऐकतो आहोत, त्यात अनेक बदल झाले आहेत. उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऑटोमेशन होत आहे.

हे ऑटोमेशन होताना उद्योग क्षेत्राला आता केवळ रोबोट नको आहे तर निर्णय घेणारे यंत्र किंवा सॉफ्टवेअर हवे आहे. ‘एआय’मुळे हे शक्य होत आहे. चॅट जीटीपी अल्पावधीतच ज्या वेगाने लोकप्रिय होत आहे, ते पाहता यापुढे तंत्रज्ञानात मोठे बदल होणार आहेत. ‘एआय’ आपली शिक्षणपद्धतीही बदलून टाकेल आणि हे सर्व बदल स्वीकारण्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही.

त्यामुळेच या क्षेत्रात काय बदल होत आहेत. एआय, रोबोटिक्स क्षेत्रात करिअर, व्यवसाय यांच्या संधी काय आहेत, त्यासाठी काय तयारी करावी लागणार आहे, हे सर्व आपण पुढील भागात पाहणार आहोत.