
देशात २०२२ च्या उत्तरार्धात भारतात 5G सुरू होईल असं आपल्या दूरसंचार मंत्र्यांनी जाहीर केलंय.
‘डिजि’साक्षर : 5G समजून घेताना
- समीर आठल्ये
देशात २०२२ च्या उत्तरार्धात भारतात 5G सुरू होईल असं आपल्या दूरसंचार मंत्र्यांनी जाहीर केलंय. 5G म्हणजे काय आणि त्याचा आपल्याला फायदा काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
2G, 3G, 4G म्हणजे नेमकं काय?
5G कडे थेट येण्यापूर्वी आपण सगळ्यात आधी हे 2G, 3G, 4G आणि आता 5G काय आहे, हे पाहू. खरंतर या अत्यंत तांत्रिक बाबी आहेत. त्याची सुरुवात साधारणपणे एकोणीसशे सत्तरच्या दशकात झाली. म्हणजे सगळ्यात आधी 1G तंत्रज्ञानाचा शोध लागला. यातील ‘G’ चा फूल फॉर्म आहे ‘Generation.’ म्हणजेच सत्तरच्या दशकात फोन सिग्नलसाठी लागणाऱ्या पाहिल्या जनरेशनच्या तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि त्यानंतर प्रत्येक दशकात हा आकडा 2G, 3G, 4G आणि आता 5G असा वाढत गेला.
1G मध्ये अॕनालॉग सिग्नल्सचा वापर केला जात असे. नंतर 2G आलं तेव्हा हेच सिग्नल्स डिजिटल रूपात वापरले जाऊ लागले. आता चाळीशीच्या पुढे असलेल्या लोकांना अगदी सहज समजू शकेल असा बदल म्हणजे, पूर्वी आपण आपल्या लँडलाईनवरून फोन लावायचो तेव्हा फोन लागेपर्यंत आपल्या इअर पीस मधून ‘कडकट्ट कडकट्ट’ असा आवाज यायचा. तेच फोन डिजिटल सिग्नल्स वापरायला लागल्यावर कधीतरी टुँ टुँ असा आवाज येत असे किंवा फोन थेट लागायलाच सुरुवात झाली. हाच 1G आणि 2G मध्ये फरक आहे. थोडक्यात काय तर फोन सिग्नलची ताकद आणि गती यांच्यात या प्रत्येक बदलणाऱ्या ‘G’ प्रमाणे वाढ होत गेली.
नव्वदच्या दशकाच्या शेवटी 3G आणि एकविसाव्या शतकाच्या पाहिल्या दशकाच्या शेवटी 4G सुरू झालं. या दरम्यान मोबाईल सिग्नल कसे ताकदवान होत गेले आणि इंटरनेटचा वेग कसा वाढत गेला याचा आपल्या सगळ्यांना अनुभव आहेच. आता तर भारतात 4G नेटवर्क सगळीकडे उपलब्ध आहे आणि चांगली रेंज असते तिथे तिथे आपण अगदी सहज युट्यूबवर किंवा प्राइम आणि अमेझॅानसारख्या प्लॅटफॉर्म्सवर व्हिडीओज बघू शकतो किंवा व्हिडिओ कॉल्सही करू शकतो.
एवढं सगळं असताना 5Gमध्ये काय सुधारणा करायचा प्रयत्न केलाय?
वर उल्लेख केल्याप्रमाणे, ‘जिथे रेंज चांगली आहे तिथे’ ही अडचण प्रामुख्याने टाळायचा प्रयत्न 5G तंत्रज्ञानामध्ये केला आहे. 5G तंत्रज्ञानामुळे रेंज जास्तीत जास्त ठिकाणी चांगली असेल. मोबाईल सिग्नलची शक्ती एकसमान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरी महत्त्वाची सुधारणा म्हणजे ‘लेटन्सी’ कमी करायचा प्रयत्न केला आहे. ‘लेटन्सी’ म्हणजे काय तर आपण कुठलीही वेबसाइट बघण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ती वेबसाइट किंवा व्हिडिओ लोड होण्यासाठी काही वेळ लागतो. हा वेळ लागायचं कारण म्हणजे आपला मोबाईल इंटरनेटवरून आपल्याला हव्या असलेल्या वेबसाइटच्या सर्व्हरला सिग्नल पाठवतो आणि तो सर्व्हर उत्तरादाखल आपल्याला हवी असलेली वेबसाइट किंवा व्हिडिओ पाठवतो. या वेळेला ‘लेटन्सी’ म्हणतात. म्हणजेच आपण काहीवेळा वेबसाइट अजून लोड होत आहे किंवा व्हिडिओ बफर होतोय असं बोलतो किंवा ऐकतो ते 5Gमध्ये बंद करायचा प्रयत्न केला आहे. अगदी अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सध्या आपल्याला मोबाईलवर जास्तीत जास्त १० ते १५ mbps (दर सेकंदाला १० ते १५ मेगा बाइट्स) एवढा इंटरनेटचा स्पीड मिळतो, तो 5G आल्यावर कमीत कमी १ GBPS (दर सेकंदाला १ गिगाबाइट) एवढा जास्त मिळू शकेल म्हणजे जवळपास सध्याच्या पेक्षा दहापट ते शंभरपट जास्त. पुढील भागात 5G चे फायदे पाहूयात.
Web Title: Samir Athalye Writes Uderstanding 5g
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..