दिवाळीनंतर शिक्षणक्षेत्रात गती

मागील दीडवर्षापासून कोरोना काळात शिक्षण क्षेत्रात जे घडलं ते फार नुकसानदायक होते. शाळा, महाविद्यालय बंद होती. त्यामुळे एकूण शिक्षणावर विपरीत परिणाम झाला.
दिवाळीनंतर शिक्षणक्षेत्रात गती

‘कोरोनामुळे सर्वांत जास्त नुकसान शिक्षणक्षेत्राचे झाले. विद्यार्थी शिक्षणापासून, शिक्षक पगाराविना, तसेच शाळा, संस्थाचालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिक्षण व्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली असली तरी प्राथमिकचे वर्ग दोन वर्षांपासून बंदच आहेत. दिवाळीनंतर पहिली ते चौथीचे वर्ग देखील सुरू होणार आहेत. त्यामुळे शिक्षण व्यवस्था पूर्णपणे पूर्वपदावर येऊन शिक्षणक्षेत्राला गती मिळेल.’

मागील दीडवर्षापासून कोरोना काळात शिक्षण क्षेत्रात जे घडलं ते फार नुकसानदायक होते. शाळा, महाविद्यालय बंद होती. त्यामुळे एकूण शिक्षणावर विपरीत परिणाम झाला. मात्र, या काळात शिक्षणाचे दोन-तीन भाग पडले. त्यात ऑनलाइन शिक्षणाचा काहींसा प्रयत्न झाला. त्यात इंटरनेट, मोबाइल असणाऱ्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात शिक्षण मिळाले; पण तांत्रिक अडचणीमुळे ते फारसं यशस्वी झालं नाही. ५० टक्के विद्यार्थ्यांकडे मात्र टेक्नॉलॉजीच्या संदर्भात काही सुविधा नसल्याने ते पूर्णतः वंचित राहिले. याकाळात नैसर्गिक आपत्ती, रोगराई, राजकीय इच्छाशक्ती याचाही बराच प्रभाव शिक्षण प्रणालीवर पडला. मात्र, आता परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आहे. चार ऑक्टोबरपासून माध्यमिक विभागाच्या शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना थोड्याफार प्रमाणात ऑफलाइन शिक्षणाची सवय झाली आहे. मात्र, प्राथमिकचे विद्यार्थी अद्याप प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित होते. आता दिवाळीनंतर शिक्षण व्यवस्था पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत.

कोरोना काळात विद्यार्थ्यांवर झालेले परिणाम

ऑनलाइन शिक्षणासाठी याकाळात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. या वस्तूंच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर एकूणच बरेच विपरित परिणाम झाले. सोशल मीडियाचा वापर, ऑनलाइन गेम, वेबसाइट हॅक, सायबर क्राइमसारख्या घटना घडल्या. यामुळे पालकांना आर्थिक नुकसानदेखील सहन करावे लागले. मोबाइलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर आय सिंड्रोम, चिडचिड वाढणे, अपचन होणे, डोके दुखणे एकटेपणा जाणवणे, संवाद कौशल्याचे नुकसान अशा अनेक समस्या निर्माण झाल्या.

बालविवाह, बालमजुरीच्या प्रमाणात वाढ

कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे ग्रामीण व शहरी भागात बालमजुरीचे प्रमाण वाढले. ग्रामीण भागात मजुरीसाठी पती आणि पत्नी दोघेही मजुरीसाठी जात असल्यामुळे मुलांना घरी सांभाळणार कोण? असा प्रश्‍न निर्माण झाला. त्यावर उपाय म्हणून पालकांनी मुलांना मोलमजुरीसाठी जुंपले; तर मुलींचे बालवयातच लग्न लावून दिले. ग्रामीण भागात ज्यावेळी शाळा सुरू करण्यात आल्या त्यावेळी अनेक नववी, दहावीत असणाऱ्या मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र असल्याचे आढळून आले होते. या घटना समोर आल्याने शासनाने तातडीने आठवीच्या पुढचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला.

विद्यार्थी, शिक्षकांमध्ये समन्वयाची गरज

सध्या शहरातील आठवी ते बारावी; तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. अद्याप पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित आहेत. या मुलांना शाळेत जाण्याची मानसिकता बनवण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. कोरोना काळात मुले घरात होती. या काळात त्यांनी घरात अनेक चढउतार अनुभवले. काही विद्यार्थ्यांच्या पालकांना कोरोना आजाराला सामोरे जावे लागले असेल. त्यामुळे काही मुलं विलगीकरणात राहिली असतील. काही मुलांच्या पालकांना आर्थिक झळ सोसावी लागली असेल. त्यामुळे सुमारे अठरा महिन्यांनी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांशी शिक्षकांचा संवाद हा सकारात्मक व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणारा असावा. 'तुम्ही घरी राहून काहीच अभ्यास केला नाही.' 'तुम्ही ऑनलाइन तासाला सहभागी का झाला नाही?' 'आता तुम्हाला पुढील अभ्यासक्रम खूप अवघड असेल.'' असा नकारात्मक संवाद नसावा. अगदी गोड शब्दात शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधणे गरजेचे आहे. नव्याने शाळा सुरू झाल्या म्हणून हा सकारात्मक संवाद एक ते दोन दिवसापुरता मर्यादित नसावा तर शिक्षकांना कायमच असा संवाद ठेवावा लागणार आहे.

विद्यार्थ्यांना व्यक्त होऊ द्या

दिवाळीनंतर प्राथमिकचे वर्ग सुरू होतील. तेव्हा याकाळात विद्यार्थ्यांनी जे काही अनुभले त्याविषयी शिक्षकांनी जाणून घ्यावे. कोणत्या गोष्टी आनंद देणाऱ्या होत्या? कोणता दुखद प्रसंग अनुभवला? याविषयी विद्यार्थ्यांना बोलते करा. थोडक्यात मुलांचे अनुभव ऐकणे ही शिक्षकांसाठी पर्वणी ठरेल. पुढे वर्ग अध्यापनात शिक्षकांना विद्यार्थीकेंद्री अध्यापन करण्यास या अनुभवांचा फायदा होईल. आपल्या मनातील गोष्टी आपण वर्गात सांगितल्या, याचा आनंद मुलांना होईल. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून शिक्षकांनी अध्यापनाची घाई करू नये. शाळेत रमण्यासाठी मुलांना पुरेसा वेळ द्यावा. वर्गातील तक्ते, बोलक्या भिंती, फळ्यावरील सुविचार, ताज्या बातम्या, प्रत्यक्ष लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा अशा कितीतरी गोष्टीपासून वर्गातील शिक्षणापासून विद्यार्थ्यांची ही पिढी वंचित राहिली आहे. दिवाळीनंतर शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल होईल. लहान मुलांसाठी शिक्षणाचे दरवाजे पुन्हा उघडतील. याकाळात शाळांची जबाबदारी वाढलेली असेल. विद्यार्थी आरोग्याच्या दृष्टिकोनातून शाळांचे निर्जुंतीकरण करणे, स्वच्छतागृह, स्वच्छ पाणी, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी शाळांवर असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com