
Pune News : पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२२ व्या पदवीप्रदान समारंभासाठी पदवी प्रमाणपत्र प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
एप्रिल-मे २०२२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या नमुन्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे, असे विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागामार्फत सांगण्यात आले आहे. विद्यार्थी १६ जानेवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात. तर विद्यार्थ्यांना १७ ते २८ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे.
पदवी, पदविका प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ‘convocation.unipune.ac.in’ या लिंकवर उपलब्ध आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.