Scholarship : संशोधक बनण्याचे स्वप्न साकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Education

Scholarship : संशोधक बनण्याचे स्वप्न साकार

पुणे : मिर्झापूर म्हणजे संगमनेर तालुक्यातील एक हजार ३०० लोकसंख्येचं दुर्गम खेडं. आज याच गावातील वैभव सोमनाथ वलवे हा विद्यार्थी पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयसर) ‘क्वांटम द्विमितीय पदार्थांवर’ संशोधन करत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला वैभवचा प्रवास शक्य झाला तो शिष्यवृत्ती, नवोदय विद्यालय आणि संशोधनासाठीच्या फेलोशिपमुळे...

केवळ आर्थिक आघाडीवर नाही, तर दर्जेदार शिक्षण आणि योग्य मार्गदर्शनासाठी शिष्यवृत्ती महत्त्वाची भूमिका बजावते, असे मत वैभवने व्यक्त केले. तो म्हणतो, ‘‘मराठी शाळेत चौथीच्या वर्गात दिक्षीत सरांनी शिष्यवृत्ती परिक्षेची कसून तयारी करून घेतली. त्यामुळे चौथीची शिष्यवृत्ती तर मिळाली, त्याचबरोबर पाचवीला नवोदय परीक्षेत उत्तीर्ण होत, नवोदय विद्यालयातही प्रवेश मिळाला.

मूलभूत विज्ञानाकडे जाण्याचा कल तेथूनच निर्माण झाला. पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी राजर्षी शाहू शिष्यवृत्ती तर आयसरमध्ये संशोधनासाठी सीएसआयआरची फेलोशिप मला मिळाली.’’ अशा अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक आणि लौकिक कारकीर्द शिष्यवृत्ती, पाठ्यवृत्ती आणि फेलोशिपमुळे घडली आहे. अशा काही निवड शिष्यवृत्तींचा घेतलेला हा आढावा...

शिष्यवृत्तीचे फायदे...

  • दर्जेदार शिक्षण संस्थांमध्ये शिकण्याची संधी

  • आर्थिक आघाडीवर आधार

  • स्वतःला प्रेरणा मिळते, त्याचबरोबर वेगळेपण सिद्ध करता येते

  • ओळखीबरोबरच सुयोग्य मार्गदर्शन मिळते

  • करिअरला दिशा मिळते

निवडक शिष्यवृत्ती...

नॅशनल स्कॉलरशीप पोर्टल

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांबरोबरच नवउद्योजकतेसाठी देशभरात दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची माहिती आणि अर्ज प्रक्रिया या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांसह विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि एआयसीटीईतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्तीचा तपशील यावर उपलब्ध आहे.

संकेतस्थळ ः https://scholarships.gov.in/

इन्स्पायर शिष्यवृत्ती

विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी गुणवत्तायादीतील पहिल्या १० हजार विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

संकेतस्थळ ः https://www.mahahsscboard.in/inspire.htm

प्राथमिक शिक्षणातील शिष्यवृत्ती

पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते.

संकेतस्थळ ः https://www.mscepune.in/

टाटा ट्रस्ट

परदेशातील शिक्षणसाठी टाटा ट्रस्टच्या वतीने

विविध शिष्यवृत्त्या देण्यात येतात.

https://www.tatatrusts.org/

राज्य सरकारच्या शिष्यवृत्ती

महाराष्ट्र राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण

घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेच्या आधारे प्रदान

करण्यात येणारी शिष्यवृत्ती

संकेतस्थळ ः https://mahadbtmahait.gov.in/

सामाजिक व विशेष न्याय विभागाच्या वतीने दिली जाणारी शिष्यवृत्ती

संकेतस्थळ ः https://mahaeschol.maharashtra.gov.in/

आदित्य बिर्ला शिष्यवृत्ती

आयआयटी सारख्या तंत्रशिक्षण संस्थांमधील शिक्षणासाठी प्रदान करण्यात येणारी शिष्यवृत्ती

संकेतस्थळ ः http://www.adityabirlascholars.net/