
नवा गडी, नवं राज्य!
- डॉ. सुनील गोडबोले
‘ने मेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे परत एकदा शाळा सुरू होत आहेत; पण तरीही लहान मुलांच्या खेळामधील ‘नवा गडी, नवं राज्य!’ ही गंमत या शाळा परत सुरू होण्याबद्दल जाणवतेय.
शाळेच्या नव्या वह्या-पुस्तकांचा एक ‘खास’ गंध असतो. तसाच नव्या गणवेशाचा- बुटांचा एक ‘ताजा’ ''स्पर्श'' असतो. इतकंच काय, तर जरी तीच भाजी-पोळी असली, तरी नव्या डब्याची एक ‘चव’ही असते.
आणि या सगळ्याबरोबर नवीन वर्ग, नवीन बाक, नवीन मित्र-मैत्रिणी आणि नवीन शिक्षकांबद्दलची प्रचंड उत्सुकता असते. आपण मोठे मात्र या सगळ्यावर विरजण घालत - ‘मागच्या वर्षापेक्षा या वेळेस जास्त गुण पडाले पाहिजेत, परत त्याच चुका नकोत, जरा शाळेत नीट वागा, तक्रारी नकोत’ असं सहज बोलून जातो.
ज्याप्रमाणे चालू खेळात कुणी नवीन मुलगा आला, तर त्याला राज्य घ्यायला सांगितलं जातं, तोही त्याचा सहज स्वीकार करून खेळात सहभागी होतो, अगदी तसंच नव्यानं शाळा सुरू होताना मुलांना ‘कोऱ्या’ पाटीनं शाळेत जाता आलं, तर किती बरं होईल?
रिसेट बटण : मागल्या वर्षातील चुका, अपयश सगळं विसरून जाऊन नव्यानं शाळा सुरू करणं म्हणजे ‘रिसेट बटण’च आहे. रिसेट बटणानं ज्याप्रमाणे संगणक/मोबाईल त्यातल्या जंक फाईल्स गाळून परत सगळ्या कार्यासहित सुरू होतो, अगदी तसंच मुलंही परत ‘शाळा’ नव्यानं सुरू करू शकतात.
नावीन्याची गरज : आपल्यातल्या प्रत्येकाला- मग तो अभ्यास असो किंवा नोकरी व्यवसाय असो - त्यातला तोचतोचपणा नको वाटतो. अगदी ‘आवडता’ ड्रेससुद्धा बदलावासा वाटतो. नव्यानं सुरू होणारी शाळा हाच नावीन्याचा डोस देते.
नवीन नातीगोती : मित्रांमधला अतिसहवासातून आलेला भांडणाचा ‘सूर’, शिक्षक आणि मुलांमधील वर्षभरात बिनसत गेलेलं ‘नातं’ हे सगळं पहिल्या पावसाबरोबर वाहून गेलेलं असतं. नात्यांचं नवीन ‘नेटवर्क’ तयार होऊ लागतं.
चुका दुरस्त करण्याची संधी : चुका- मग त्या अभ्यासातल्या असोत किंवा मैत्रीतल्या असोत - नव्यानं सुरू घेणारी शाळा ही चुका दुरुस्त करण्याची नामी संधी असते. स्वतःला सिद्ध करण्याचीही संधी असते.
नवं ध्येय, नवं संकल्प : नव्यानं सुरू होणाऱ्या शाळेबरोबर आपल्या मुलांना त्यांच्या वयानुसार, क्षमतानुसार ‘नवं ध्येय, नवं संकल्प’ देण्याची हीच तर वेळ आहे. आपण पालकांचं हेच तर ‘स्मार्ट’ पालकत्व आहे.