इंग्रजी शिका  :  KEEP WRITING

शैलेश बर्गे
Thursday, 19 March 2020

आजच्या काळात संवाद व सादरीकरण ही दोन कौशल्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. दोन्ही कौशल्यात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडल्यास दोन्ही गोष्टी परिणामकारक होऊ शकतात.

आजच्या काळात संवाद व सादरीकरण ही दोन कौशल्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. दोन्ही कौशल्यात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडल्यास दोन्ही गोष्टी परिणामकारक होऊ शकतात. एखाद्या ठिकाणी आपण स्वतः उपस्थित नसताना इतरांवर आपला प्रभाव पाडू शकतो का? बऱ्याच वाचकांचे उत्तर नाही, असे असण्याची शक्यता आहे. पण वाचक हो, आपण नसताना आपला प्रभाव पाडते ते आपले लेखन. तुमचे विचार, तुमची बुद्धिमत्ता, एखाद्या विषयामधील तुम्ही केलेला सखोल अभ्यास, त्या अभ्यासामुळे तुम्ही गाठलेली उंची हे सारं तुमच्या अनुपस्थितीत तुमच्याबद्दल, तुमच्यावतीने इतरांना प्रभावित करतं ते तुमचं लेखन. म्हणून आपण सर्वांनी लिहिते राहिले पाहिजे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मागच्या लेखात इंग्लिशमधून रोजनिशी लिहिण्याबद्दल आपण चर्चा केली. अगदी अशाच आणखी सोप्या इतर कोणत्या बाबींचा समावेश करता येईल ते आपण पाहू. 

समाज माध्यमे 
सर्वांच्या सोईचे आणि सध्या सहज उपलब्ध होत असलेले साधन म्हणजे स्मार्टफोन आणि त्याचा उपयोग करून आपण सोशल मीडियाचा वापर करत असतो. आपल्याला आपल्या इंग्लिश भाषेतील सुधारणा करून घेण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर करता येईल. इंग्लिश भाषेतून आधी जवळच्या लोकांना पोस्ट करणं सुरू करता येईल. त्यात सुधारणा करण्यासाठी इंग्लिश भाषेचं ज्ञान असणाऱ्‍यांची मदत घेतल्यास नक्कीच फायदा होईल. आपण आपल्या चुका लक्षात घेऊन योग्य ते बदल करून घेण्याची तयारी मात्र ठेवली पाहिजे. अशा जवळच्या लोकांच्या गटांत पोस्ट करत मग हळूहळू इतर गटांत इंग्लिशमधून पोस्ट करता येतील. 

Write Travelogues (प्रवास वर्णने) 
 इतर प्रवाशांनी/लेखकांनी लिहिलेली प्रवास वर्णनं अभ्यासून आपण केलेल्या एखाद्या प्रवासाचे travelogue लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यातून प्रवासाची साधनं, प्रवास करतानाच्या विविध क्रिया आणि विविध ठिकाणांची वर्णनं करण्यासाठीची उपयुक्त विशेषणं यांचा सराव होईल.

Writing Recipe (पाककृती लेखन) 
Travelogue प्रमाणे पाककृती लेखनही करता येईल. इंग्लिशमध्ये लिहिलेल्या पाककृतीचे आपल्या ब्लॉगवर लेखन करता येईल. यामुळं आपली शब्दसंपत्ती वाढते. पाककृती लिहिताना विविध क्रिया (verbs) अभ्यासता येतील. त्याचप्रमाणं प्रसंगानुरूप शब्दप्रयोग करण्याचा सराव  होईल. उदा. डिश सजवावी व द्यावी. यासाठी शब्दशः Decorate the dish and give असा वापर करण्याची शक्यता असते. या वाक्याऐवजी Garnish the dish and serve. अशी आणि या सारख्या वाक्यरचना वापरणं सरावाचे होईल. 

वरील प्रमाणे इंग्लिश लेखनाचा सराव करण्यासाठी काही जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक लेखन करत राहिलं पाहिजे उदा. नियतकालिकांसाठी लहान लहान लेख, सोप्या कविता, पत्रलेखन, अभ्यासपूर्वक दिलेला प्रतिसाद (feedback), पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, फोटोंचे अचूक वर्णन करणाऱ्या ओळी इत्यादी बाबींचा समावेश करता येईल. श्रवण, वाचन, आणि लेखन या तीन कौशल्यानंतर पुढच्या लेखापासून आपण करूया आपल्या यादीतील शेवटचं पण महत्त्वाचं आणि आपलं उद्दिष्ट असलेलं इंग्लिशमधून बोलण्याचं कौशल्य.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shailesh barge article Learn English KEEP WRITING