संधी नोकरीची : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगातील वाट 

डॉ. शीतलकुमार रवंदळे 
Thursday, 14 May 2020

देशात रोजगाराचीसंधी उपलब्ध करून देणारे कृषीक्षेत्रानंतर दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र म्हणजे सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योगक्षेत्र होय.संपूर्ण भारतात सुमारे६.३३कोटी उद्योग कार्यरत आहेत

कॅम्पस प्लेसमेंटमधून रोजगार मिळवू इच्छिणाऱ्या मुलांचा ओढा बहुराष्ट्रीय कंपन्यांनाकडे जास्त असतो. मात्र, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगदेखील (MSME) विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाचे महत्त्व : 
देशात रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे कृषी क्षेत्रानंतर दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र म्हणजे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्र होय. संपूर्ण भारतात सुमारे ६.३३ कोटी उद्योग कार्यरत आहेत. यातील सुमारे ६.३० कोटी सूक्ष्म उद्योग आहेत, ३.३१ लाख लघु तर ५,००० मध्यम उद्योग आहेत. 

भारताच्या GDP मध्ये MSME उदयोगाचे योगदान सुमारे २९% आहे व सुमारे ११ कोटी लोकांना यातून रोजगार मिळतो. मात्र ५ ट्रिलियन इकॉनॉमीचे लक्ष पूर्ण करण्यासाठी २०२५पर्यंत या क्षेत्राचे योगदान सुमारे ५०% पर्यंत नेण्याचे प्रयत्न असणार असून, यातून सुमारे १५ कोटी रोजगार उपलब्ध होणार आहेत. म्हणजेच या क्षेत्रात सुमारे ४ कोटी अधिकच्या रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. 

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगात नोकरी मिळण्याचे फायदे : 
१. विविध विभागात (जसे मार्केटिंग, प्रॉडक्शन, मनुष्यबळ, फायनान्स व इतर) काम करण्याचा अनुभवदेखील मिळविता येऊ शकतो. 
२. एकाच वेळी विविध प्रोजेक्ट्स व तंत्रज्ञानावरील कौशल्य वाढविण्याची संधी 
३. स्वतःचा उद्योग सुरू करायचा असल्यास या कंपनीत उत्तम अनुभव. 

MSME प्रमाणेच विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यात देखील मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. त्यामध्ये काम करण्याचे खालील प्रमाणे फायदे व तोटे देखील असतात. 

बहुराष्ट्रीय कंपन्यांत नोकरी मिळवण्याचे फायदे : 
१. जास्त पगाराची नोकरी 
२. विदेशात जाण्यासाठीची संधी 
३. कंपनीतील उत्तम पायाभूत सुविधा 
४. जास्त सुरक्षित नोकरी 

बहुराष्ट्रीय कंपन्यात नोकरी मिळवण्याचे तोटे : 
१. एकाच विभागात जास्त दिवस काम करावे लागते 
२. एखाद्याच तंत्रज्ञानातील/प्रोजेक्टवर काम करण्याची व कौशल्य वाढविण्याची संधी 
३. स्वतःचा उद्योग सुरू करायचा असल्यास त्याविषयी लागणाऱ्या मार्केटिंग, प्रॉडक्शन, मनुष्यबळ, फायनान्स या सर्वांऐवजी कुठल्यातरी एखाद्याच क्षेत्रातील अनुभव मिळतो. 

कोअर शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी MSME चे महत्त्व : 
मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या शाखांना कोअर शाखा म्हणून संबोधले जाते. अशा शाखांच्या विद्यार्थ्यांना करिअरसाठी प्रचंड वाव असतो. या शाखांचे विद्यार्थी आयटी क्षेत्रात देखील रोजगार मिळवू शकतात. तसेच त्यांच्या स्वतःच्या शाखेच्या कोअर उद्योगात देखील त्यांना चांगली संधी असते. आयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या मोठ्या संख्येतील MSME सेक्टरच्या उद्योगात थोड्या कमी प्रमाणात संधी उपलब्ध असतात. त्यामुळे मेकॅनिकलसारख्या कोअर शाखांचे विद्यार्थी सहसा बेरोजगार राहत नाहीत. त्यामुळे या शाखेला ‘EVER GREEN’ शाखा असे देखील संबोधले जाते. 
विद्यार्थ्यांनी उत्तम कौशल्ये मिळविण्यासाठी उद्योगांमध्ये इंटर्नशिप व प्रोजेक्ट्स करणे आवश्यक असल्याचे उद्योगातील तज्ज्ञ नेहमीच सांगत असतात. MSME क्षेत्र हे याबाबतीत खूपच उपयोगी असून, मोठ्या प्रमाणावर ह्या क्षेत्रात कोअर शाखेच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप व त्यानंतर रोजगार देखील मिळविता येतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sheetalkumar Ravandale writes Micro small and medium industry