‘लक्ष्य’भेद : सातत्य आणि चिकाटी...!

आपल्या आजूबाजूच्या जगातील घटना आणि घडामोडी यांचं ज्ञान आणि भान आपल्याला या परीक्षा पास होण्यासाठी गरजेचं असतं.
Study
StudySakal
Summary

आपल्या आजूबाजूच्या जगातील घटना आणि घडामोडी यांचं ज्ञान आणि भान आपल्याला या परीक्षा पास होण्यासाठी गरजेचं असतं.

- सोनल सोनकवडे

आपल्या आजूबाजूच्या जगातील घटना आणि घडामोडी यांचं ज्ञान आणि भान आपल्याला या परीक्षा पास होण्यासाठी गरजेचं असतं. याचीच अजून एक पायरी असते ती म्हणजे आत्मभान किंवा स्वत:च्या क्षमता, मर्यादा यांची असलेली जाणीव आणि त्यांचे भान. बुद्धिमत्ता ही थोडक्यात या आत्मभानाशी संबंधित असते.

स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला अनेकदा प्रयत्न करण्याची संधी मिळते आणि जात आणि वर्गनिहाय एकपेक्षा अधिक प्रयत्न देण्याची मुभा असली तरी तितका काळ, मग कधी तो दोन वर्ष असो, कधी तीन तर कधी चार वर्षं, आपली त्या विषयातील परीक्षेबाबतची आवड टिकून राहणं अवघड जातं. अशी आवड तुम्ही निष्ठेने, सातत्याने आणि चिकाटीने अभ्यास करत असाल तरच टिकून राहते.

अनेक वेळा एकच अभ्यास केल्याने तोचतोचपणा येऊन आपल्याला कंटाळा येऊ शकतो. अभ्यासक्रम इतका विस्तृत आहे की, अनेक वेळा त्याचं पाठांतर होत नाही, काही वेळा गोष्टी विसरायला होतात, त्यामुळे ते विषय वारंवार वाचावेच लागतात. या परीक्षांच्या अभ्यासात सातत्य महत्त्वाचं असतं. यामध्ये यश अपयशाचे चढ उतार तुम्हाला सतत अनुभवावे लागतात. तुमचा भावनिक बुद्ध्यांक हा चढ-उतार पचवण्यासाठी मजबूतच असला पाहिजे.

या परीक्षेत नापास होण्याचं प्रमाण हे पास होण्यापेक्षा अधिक आहे. कधी पूर्वपरीक्षेमध्ये नापास होता, तर कधी अगदी मुलाखतीपर्यंत जाऊनही शेवटच्या निवड यादीमध्ये तुमचं नाव येत नाही. कधी कधी तुमच्यानंतर अभ्यासाला सुरुवात केलेल्या, तुमच्यापेक्षा कमी काळ अभ्यास केलेल्या उमेदवाराची निवड होते.

यातली स्पर्धा, मनासारखे गुण न मिळणं, एखाद्या तुमच्यापेक्षा कमी योग्यता आणि क्षमता असलेल्या मुलाला तुमच्या आधी सेवेत रुजू होण्याची संधी मिळणं हे सगळं मनाचं खच्चीकरण करणारं असतं. अशा वेळी स्वत:ला उभारी देण्यासाठी, निकालाचा आपल्यावर नकारात्मक परिणाम होऊ न देता अभ्यासात सातत्य आणि चिकाटी टिकवून ठेवण्यासाठी आणि पुढच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी भावनिक बुद्ध्यांक गरजेचा असतो.

पहिल्या प्रयत्नाच्या वेळी मला जवळपास खात्री होती की आपलं अंतिम यादीमध्ये नाव येईल परंतु ते आलं नाही. पहिल्या वेळी पूर्वपरीक्षा पास होईन याची मला खात्री होती. मी मुलाखतीपर्यंत गेले असले तरीही जगाचा इतिहास या ऐच्छिक विषयाचा मी अभ्यासच केला नाही. अभ्यास केला नाही याचं कारण मी नियोजन करण्यात अपयशी ठरले आणि मनासारखा अभ्यास झाला नाही. दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळी मला हे जाणवलं होतं सामान्य अध्ययनाच्या पेपरला मला जे येणार येणार नाही ते माझ्यासोबत परीक्षेला बसलेल्या कुणालाच येणार नाही इतका माझ्या झालेल्या अभ्यासाबद्दल मला आत्मविश्वास होता. पण प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी काहीतरी अविश्वसनीयच घडलं.

मी उत्तीर्ण झाले असते पण सामान्य अध्ययन- २ च्या पेपरमध्ये मला ३०० पैकी केवळ ७२ गुण मिळाले. हा खूप अस्वस्थ आणि उध्वस्त करणारा अनुभव होता. माझ्या बरोबरच्या परंतु या विषयात कमी गती असलेल्या अनेकांना १०० किंवा त्याहून अधिक गुण मिळाले. काहींना तर अगदी १४७-५० गुण मिळाले. मला त्या पेपरला नेमके कशामुळे ७२ गुण मिळाले ते आजवर न उलगडलेलं एक कोडं आहे.

(लेखिका ‘आयआरएस’ अधिकारी, गायिका आणि गीतकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com