
‘लक्ष्य’भेद : भावनिक स्थैर्य आणि इच्छाशक्ती...
- सोनल सोनकवडे
दुसऱ्या प्रयत्नानंतर आपल्या अभ्यासात काहीतरी उणीव आहे असं मला वाटू लागलं. त्या काळात या परीक्षांचा अधिक प्रभावी अभ्यास करण्यासाठी मुलं महाराष्ट्रातून दिल्लीला जात असत. दिल्लीला जाऊन, अभ्यास करून परीक्षा दिलेल्या मुलांमध्ये उत्तीर्ण होण्याची टक्केवारी जास्त होती. मलाही आपण एकदा दिल्लीला जावं असं वाटू लागलं परंतु दोन्ही प्रयत्नात परीक्षा पास होता न आल्यामुळे माझ्या आई-वडिलांना माझ्याबद्दल वाटणाऱ्या विश्वासाला थोडासा तडा गेला होता. त्यामुळे त्यांनी मला दिल्लीला जाऊ दिलं नाही.
दरम्यानच्या काळात माझ्यासाठी मुलं बघणं सुरू होतं. लग्न झाल्यावर तुझे प्रयत्न असे घरातले लोक म्हणू लागले. अनेक मुलींना हा अनुभव आला असेल. मला मात्र आपण आत्ता संसारात पडू शकत नाही हेही प्रकर्षाने जाणवत होतं. म्हणजे मला लग्न करायचं होतं परंतु ते आपण अपयशी ठरत असताना, आत्मविश्वास अगदी कमी असताना करू नये असं मला वाटत होतं. एकदा तुम्हाला अपयश आलं की सगळ्या गोष्टींचा दोष तुम्हाला दिला जातो असं म्हणतात त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेत होते. ही सगळी घालमेल माझ्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम करत होती. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी स्वतःला अजून काही संधी देण्याची गरज माझ्या मनाला वाटत होती.
या परीक्षांमध्ये यश मिळवायचं असेल तर प्रयत्नांतील सातत्य, चिकाटी याबरोबरच स्वत:ला पुन:पुन्हा संधी देण्याची मानसिकता बाळगली पाहिजे. आत्मविश्वास आणि सकारात्मकता न गमावता प्रयत्न सुरू ठेवत स्वत:लाच प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली पाहिजे. अशा प्रकारे स्वत:ला संधी देणं हा या परीक्षांमध्ये यश मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असा दृष्टिकोन आहे. मीही पुन्हा एकदा नव्याने स्वत:ला संधी द्यायची ठरवली. ही गोष्ट २००७-०८ मधील. त्यावेळी मी दोन वेळा परीक्षेत अपयशी ठरले असले तरी माझा खूप अभ्यास मात्र झाला होता.
इतिहास विषयात मी देशात अव्वल होते. झालेल्या अभ्यासाचा उपयोग करून काम शोधायचं हे मी ठरवलं. मी वेगवेगळ्या क्लासेस आणि ॲकाडमीजमध्ये जाऊ लागले. या काळात मी अभ्यास करत होते आणि शिकवतही होते. मी स्वतःला दिलेल्या या संधीमुळे माझा आत्मविश्वास वाढला. माझा दिनक्रम निश्चित झाला होता. मी शिकवायचे आणि घरी येऊन माझा अभ्यास करायचे. या काळात मी मोबाईलही वापरत नव्हते. शिकवण्याचे पैसे मिळाले त्यातून मी दिल्लीला जायचं ठरवलं. दिल्लीला जायच्या आधी मी पुण्यातून एका दिल्लीतल्या मुलीशी संपर्क साधून राहण्यासाठी खोलीची चौकशी केली आणि तिने सांगितल्याप्रमाणे मी दिल्लीला गेल्यावर तिने सांगितलेल्या पत्त्यावर पोचले. तिथे गेल्यावर प्रत्यक्ष राहायला जागाच नव्हती. मला धक्का बसला. मी सैरभैर झाले. आपल्या भावनांचं व्यवस्थापन आणि त्यांचा योग्य वापर करणं हे आपण त्यातून शिकत जातो.
दिल्लीत आल्यानंतर अनेक गोष्टी मी स्वतंत्रपणे करू लागले. भावनिक स्थैर्याचा या काळात मी अनुभव घेतला. कम्फर्ट झोन हा आता परवलीचा शब्द झाला आहे. तुम्हाला वेगळा अनुभव घ्यायचा असेल, स्वतंत्रपणे घडायचं असल्यास स्वत:च्या कोशातून बाहेर पडावं लागतं. यासाठी तुमचा भावनांक अर्थात इमोशनल क्वोशंट मजबूत असावा लागतो. या परीक्षांच्या काळात तुम्हाला मनासारखा अभ्यास करूनही काही वेळा मनासारखे परिणाम मिळत नाहीत.
कोणताही प्रसंग तुमच्यावर येऊ शकतो. त्यातून तरून जाण्यासाठी भावनिक स्थैर्य महत्त्वाचं असतं. काही मुलांच्या बाबतीत असंही झालं आहे की त्यांनी परीक्षेच्या किंवा मुलाखतीच्या दिवशी वैयक्तिक आयुष्यात मोठ्या आघाताचा सामना केला आहे. या मुलांना स्वत:ला उभारी देऊन मुलाखतीला अथवा परीक्षेला जाता आलं कारण त्यांचा भावनिक बुद्ध्यांक उच्च होता. कसोटीच्या काळात माझी इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास यामुळे माझा निभाव लागला. भावनिक स्थैर्याच्या दृष्टीने हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात.
(लेखिका ‘आयआरएस’ अधिकारी, गीतकार, गायिका आहेत.)