
‘लक्ष्य’भेद : स्वतःला ओळखा आणि करिअर ठरवा
- सोनल सोनकवडे
प्रत्येकाच्या स्वभावाचा आणि वृत्तीचा त्याच्या कामावर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो. तुम्ही स्वत:च्या वागण्याचे, तुमच्या आवडी-निवडीचे आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना कशा प्रकारे प्रतिक्रिया देता याचे निरीक्षण करत असाल तर तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारचे काम जमू शकेल, कोणत्या क्षेत्रात काम करू शकाल याची कल्पना येऊ शकेल. त्यानुसार तुम्ही कोणत्या प्रकारच्या क्षेत्रात जाण्यासाठीची स्पर्धा परीक्षा द्यावी हेही तुम्हाला ठरवता येऊ शकते. काही लोक नोकरी करण्याच्या मानसिकतेचे असतात तर काहींना आपल्या मनासारखे स्वतंत्र काम करून पाहायचे असते, परंतु मुळातच हे कळण्यासाठी तुमच्या मनातला गोंधळ आणि कोलाहल कमी होऊन तुमच्या विचारातून तुम्हाला काय करायचे आहे याची निश्चिती झाली पाहिजे.
त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे आपण एखादी परीक्षा का देत आहोत, हे करिअर का निवडत आहोत याच्याबद्दल पुरेसा विचार करणे, या संदर्भातले प्रश्न स्वत:लाच सातत्याने विचारत राहणे. या परीक्षा देण्यामागे असलेलं कारण आणि आपली भूमिका निश्चित झाल्यास आपण अधिक जोमाने आणि स्वत:ला प्रोत्साहन देत यशाच्या दिशेने प्रयत्न करत राहतो. याउलट आपल्या मनाविरुद्ध जर आपल्याला एखादी गोष्ट करायला लावली तर आपण त्यात आपले १०० टक्के देऊ शकत नाही. स्पर्धा परीक्षा या अशा दुसऱ्याने भरीस पाडून देताच येत नाहीत.
लोक तुमचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी आणि तुम्हाला विचारापासून परावृत्त करण्यासाठी अनेकविध प्रकार करून बघतात पण जर तुम्ही सारासार विचार केला असेल तर तुम्ही तुमच्या निश्चयापासून सहसा ढळत नाही. मी आधीही सांगितलं की, स्पर्धा परीक्षांमध्ये आणि विशेषतः यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षांमध्ये कधी यश मिळेल याची निश्चित खात्री देता येत नाही.
अपयश आल्यास लोक तुम्हाला दोष देतात, तुम्हाला पैसे मिळवण्याचे अथवा करिअरचे मार्ग सुचवू लागतात. अशा डगमगत्या काळात तुमचे या क्षेत्राबद्दलचे विचार आणि याच मार्गे काम करण्याचा निश्चय दृढ असेल तर तुम्ही स्वत:च स्वत:चे चीअरलीडर बनू शकता. स्पर्धा परीक्षा आणि त्यातही विशेष करून यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षा देणे हा जुगार आहे असं तुम्ही सातत्याने ऐकतही आला असाल, कारण यातील यशाच्या टक्केवारीमुळे ही धारणा सर्वत्र झाली आहे. पण हे अर्धसत्य आहे. तुमचा विचार आणि निश्चय पक्का असेल तर हा चांगल्या अर्थाने तुमचं आयुष्य बदलणारा जुगार आहे असं मी म्हणेन.
(लेखिका ‘आयआरएस’ अधिकारी, गीतकार, गायिका आहेत.)