जपान आणि संधी :  वेळेचा सुखदायक अनुभव 

सुजाता कोळेकर
Thursday, 4 June 2020

जपानमध्ये जास्तीत जास्त निर्णय सगळ्या टीमच्या मदतीने घेतले जातात. त्याचा फायदा असा होतो की,सगळ्या टीमला हा निर्णय का घेतला आहे ते माहीत असते आणि सगळी टीम अंतिम टप्पा गाठण्यासाठी काळजीपूर्वक काम करते.

मी जपानमध्ये सुरुवातीला एका कंपनीसाठी बिझनेस प्लॅन लिहिला होता. मी त्यावेळी अनेक कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले आणि मला जपानची व्यावसायिक संस्कृती खोलवर समजून घ्यायला मदत झाली. जपानमध्ये जास्तीत जास्त निर्णय सगळ्या टीमच्या मदतीने घेतले जातात. त्याचा फायदा असा होतो की, सगळ्या टीमला हा निर्णय का घेतला आहे ते माहीत असते आणि सगळी टीम अंतिम टप्पा गाठण्यासाठी काळजीपूर्वक काम करते. जपानची काम करण्याची ही पद्धत जगभर प्रसिद्ध आहे. त्याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय हे सगळे कर्मचारी अगदी मनापासून अमलात आणतात. त्यामुळे विरोध होत नाही आणि काम वेळेवर पूर्ण होण्यास मदत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जपानमध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. एकदा आमच्या टीमसाठी प्रोजेक्ट मॅनेजरची जागा भरायची होती. मुळातच फक्त एकच उमेदवार योग्य असा होता, त्यामुळे त्याची मुलाखत घ्यायचे ठरले आणि एका वेळी पॅनेलने मुलाखत घेतली, तर निर्णय लवकर होईल म्हणून मी, अजून एक अधिकारी व एच. आर. मॅनेजर अशा टीमची वेळ त्याला दिली गेली. परंतु, तो ५ मिनिटे उशिरा आला आणि आमच्या एच. आर. मॅनेजरने मुलाखत रद्द केली. 

जपान आणि संधी  : कौशल्याधारितांना प्राधान्य

जपानची ट्रेन किंवा विमानाला अगदी एक मिनिट उशीर झाला, तरी कंपनी सगळ्यांची माफी मागते हे आपण ऐकले असेलच. ‘टाइम इज मनी’ हे जपानमध्ये पावलोपावली पाहायला मिळते. जपानमध्ये एकदा नोकरीला सुरुवात केली की, तिथेच निवृत्त होण्याची संस्कृती आहे. त्यामुळे लोक कंपनीला खूप महत्त्व देतात आणि कंपनीही सगळ्यांची खूप काळजी घेते. जपानमध्ये ११ मार्च २०११मध्ये मोठी सुनामी आली होती आणि भूकंप झाला होता, तेव्हा माझे मॅनेजर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः फोन करून माझी, माझ्या जपानमधील आणि भारतामधील कुटुंबाची चौकशी केली. त्यांनी मला एक आठवड्याची सुट्टी दिली आणि सांगितले की, तू भारतात जाऊन सगळ्यांना भेटून ये म्हणजे त्यांना काळजी वाटणार नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याची इतकी चौकशी करणारा असा हा देश आहे. तिथे काम करण्याची संधी मिळवण्याचा सगळ्यांनीच प्रयत्न करावा असे मला वाटते. त्यासाठी जपानी भाषा शिकणे आवश्यक आहे. जपानी भाषा शिकताना जपानमधली व्यावसायिक संस्कृतीही शिकून घेणे गरजेचे आहे. या दोन्हीचा मेळ घालता आला तर जपान खूप संधी देईल यात काही शंका नाही. 

जपान मधील खूप कंपन्या भारतामध्ये येत आहेत आणि त्यांना पण खूप कर्मचारी लागणार आहेत. त्यासाठी पण जपानी भाषा येणाऱ्या लोकांची गरज भासणार आहे . चला तर मग जपानी भाषा शिकायला सुरवात करूया. 

सुजाता कोळेकर, सिनिअर डायरेक्टर, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sutaja kolekar article about pleasant experience of time

Tags
टॉपिकस
Topic Tags: