‘लक्ष्य’भेद - शालेय शिक्षणातच स्पर्धा परीक्षांचं बीज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या युद्धात जिंकायचं

‘लक्ष्य’भेद - शालेय शिक्षणातच स्पर्धा परीक्षांचं बीज

सोनल सोनकवडे

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या युद्धात जिंकायचं असल्यास ‘जनरल अवेअरनेस’ येणं विशेष महत्त्वाचं आहे. अमेरिकन टेनिसपटू आर्थर अॅश अतिशय हलाखीतून वर आले. कृष्णवर्णीय टेनिसपटू म्हणून त्यांनी केलेली कामगिरी ऐतिहासिक आहे. यशाच्या शिखरावर असताना एके ठिकाणी त्यांनी असं म्हटलं आहे

की, ‘स्टार्ट व्हेअर यू आर. युज व्हॉट यू हॅव. डू व्हॉट यू कॅन.’ (तुम्ही जिथे असाल तिथून सुरुवात करा. तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याचा उपयोग करा आणि शक्य असेल ते करा.) अनेक मुलांच्या मनात एक प्रश्न नक्की असतो, तो म्हणजे, ‘स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात नेमकी कधी आणि कशी करायची?’

या प्रश्नाचं साधं आणि सोपं उत्तर म्हणजे...

१) दैनंदिन वर्तमानपत्राचं वाचन करावं आणि त्यातून अभ्यासाला सुरुवात करावी.

२) आर्थर अॅश म्हणतात तसं, जिथं असाल तिथून आणि तुमच्याकडं जे सहज उपलब्ध असेल त्यानं सुरुवात करा.

याच प्रश्नाचा दुसरा भाग असतो. की ही सुरुवात नेमकी कधी करायची? त्याचं उत्तर देण्याआधी मी एक आठवण सांगते. चौथीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मला नेहमी विचारला जाणारा प्रश्न अर्थात ‘मोठी झाल्यावर तू कोण होणार?’ हा विचारला गेला.

मी न अडखळता उत्तरले ‘जिल्हाधिकारी होणार.’ त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचं काम काय असतं, जबाबदाऱ्या काय असतात याची मला काहीच मला माहिती नव्हती. प्रशासकीय सेवेतील अधिकारी व्हावं आणि तेही केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेली अधिकारी हे माझ्या आई-वडिलांनी पाहिलेलं स्वप्न होतं.

चौथी आणि सातवी या दोन्ही वर्षांत शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मी गणित, भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी हे विषय अभ्यासले होते. त्याचा मला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देताना उपयोग झाला. शिष्यवृत्ती परीक्षेप्रमाणेच दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत माझं नाव आल्यामुळं ‘युपीएससी’ आपण करू शकू, हा विश्वास होता. अर्थात, बारावीनंतर ‘युपीएससी’चा अभ्यासक्रम पहिल्यांदा हातात घेऊन प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केलं, त्यावेळी त्यातलं सामान्य ज्ञानाला असलेलं महत्त्व पाहिल्यावर खाड्कन जागी झाले.

या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर गांभीर्यानं रोजची वर्तमानपत्रं वाचायला लागले. मात्र, आता रुखरुख वाटत आहे की, लहानपणापासून वर्तमानपत्र वाचायची सवय लागली असती, आसपास घडणाऱ्या ताज्या घटनांबद्दल उत्सुकता निर्माण झाली असती, तर ‘युपीएससी’ उत्तीर्ण व्हायला चार ॲटेम्ट लागले नसते. वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या बातम्या, ताज्या घटना यांना शालेय अभ्यासक्रमात गुण नसतात, म्हणून याकडं दुर्लक्ष होतं. परिणामी आपला दृष्टिकोन व्यापक करण्याची संधी गमावून बसतो.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास अगदी गोल सेटिंग झाल्यापासून सुरू करावा. शालेय अभ्यासक्रमात शिकविले जाणारे इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित हाच स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाचा पाया आहे. हा पाया शालेय जीवनातच भक्कम केल्यास स्पर्धा परीक्षा कमीत कमी प्रयत्नात उत्तीर्ण होऊ शकतो.

रोजच्या रोज मुला-मुलींनी आपल्या घरात येणारी वर्तमानपत्रे वाचणे, संपादकीय पानावरील विश्लेषणात्मक लेख, विविध साप्ताहिक, मासिकांचे वाचन करावे. यासाठी घराघरांतून पालकांनी वृत्तपत्रवाचनासाठी पाल्याला प्रोत्साहित करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या आजूबाजूच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीचे सर्वसाधारण भान असणे क्रमप्राप्त आहे. अर्थात, चांगले अधिकारी होता आले नाहीतर वाचनामुळं चांगला नागरिक निश्चित होता येईल.

(लेखिका ‘आयआरएस’ अधिकारी,गायिका, गीतकार आहेत)