
शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ (टेट) या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला.
Teacher Recruitment Exam Result : ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी’ परीक्षेचा निकाल जाहीर
पुणे - राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ (टेट) या परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने टेट परीक्षा घेण्यात आली. राज्य परीक्षा परिषदेने दोन लाख १६ हजार ४८३ उमेदवारांचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला आहे. या परीक्षेचा निकाल जाहीर होणार, याबाबत राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर आदल्या दिवशी माहिती देण्यात आली होती. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत होते.
मात्र, संध्याकाळ झाली तरीही निकाल जाहीर न झाल्याने उमेदवार काहीसे हताश झाले होते. दरम्यान परीक्षा परिषदेने शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास निकाल जाहीर केला.
या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांची गुण यादी परीक्षा परिषदेच्या ‘www.mscepune.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.