
फेब्रुवारी-मार्चमध्ये शिक्षक भरतीसाठी टीईटी (TET Exam) अर्थात अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली.
Teacher Recruitment : ..अखेर शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; बेरोजगार उमेदवारांना शिक्षक होण्याची संधी!
कणकवली : गेल्या काही वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती (Teacher Recruitment) आता पवित्र पोर्टलद्वारे (Pavitra Portal) होणार असून येत्या जूनअखेर पवित्र पोर्टल अपडेट केले जाणार आहे. शाळानिहाय विद्यार्थ्यांचे आधारकार्डसहित संच मान्यता निश्चित करून पवित्र पोर्टल अॅक्टिव्ह केले जाणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीचा मुहूर्त येत्या ऑगस्टमध्ये निघणार आहे.
यात खऱ्या अर्थाने शाळा व्यवस्थापन समितीचा (School Management Committee) कस लागणार आहे. रखडलेली भरती प्रक्रिया सुरू झाल्याने टीईटी परीक्षा दिलेल्या बेरोजगार उमेदवारांना शिक्षक होण्याची संधी मिळणार आहे. राज्यात तब्बल अडीच लाख बेरोजगार उमेदवारांना प्रतीक्षा असलेल्या शिक्षक भरतीचा मुहूर्त येत्या ऑगस्ट महिन्यात निघाला आहे.
सध्या कार्यरत शिक्षकांची संचमान्यता १५ मेपर्यंत मुदत होती; मात्र, ही मुदत वाढविण्यात आली आहे. नव्या शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल अॅक्टिव्ह करण्याचे नियोजन शिक्षण संचालक यांनी शालेय शिक्षण विभागाला कळविले आहे.
फेब्रुवारी-मार्चमध्ये शिक्षक भरतीसाठी टीईटी (TET Exam) अर्थात अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. गेल्या २४ मार्चला या परीक्षेतील राज्यात दोन लाख ४० हजार डीएड, बीएडधारकांचा निकालही जाहीर करण्यात आला; मात्र, काही महिने उलटूनही शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या हालचाली नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. याच दरम्यान उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे शासनाला पदभरतीचे वेगवान नियोजन करणे भाग पडले आहे.
शिक्षण संचालकांनी भरतीचे वेळापत्रकच प्रधान सचिवांना कळविले आहे. त्यात १७ एप्रिलला उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार टीईटी परीक्षेच्या निकालानंतरची पदभरतीची कार्यवाही सुरू करणे आवश्यक असल्याची बाब प्रधान सचिवांच्या निदर्शनात आणून देण्यात आली आहे; परंतु, सध्या विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलिडेशननुसारच शिक्षकांची २०२२-२३ ची संचमान्यता करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांचे चित्र स्पष्ट होईल व त्यानंतरच नव्या भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
माध्यमिक शाळांच्या शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर रोस्टरनुसार शाळेतील पटसंख्येनुसार रिक्त पदे निश्चित करावी लागणार आहेत. त्यापूर्वी शाळांना त्यांचे रोस्टर तपासून घ्यावे लागणार आहे. या रोस्टरप्रमाणे रिक्त जागांची जाहीरात ३० जुलैपर्यंत शाळा व्यवस्थापनाला काढावी लागणार आहे. शाळा व्यवस्थापनाला जाहिरातीनुसार येणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना शिफारसपत्र द्यावे लागणार आहे.

नव्या शैक्षणिक वर्षात भरती
रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया येत्या २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात होत आहे. त्यामुळे मे अखेर रिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या जागा पोर्टलवर नमूद केल्या जाणार आहेत. एक पदासाठी दहा उमेदवारांना संधी मिळणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीला उमेदवार निवडीचे स्वातंत्र आहे. मुलाखतीनंतर शिफारसपत्र दिली जाणार आहेत.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पवित्र पोर्टलला संचमान्यतेची प्रक्रिया लांबली आहे. त्यामुळे संचमान्यतेनंतर शिक्षक भरती प्रक्रिया होईल. संचमान्यता झाल्यानंतर जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती निश्चित होणार आहे. त्यामुळे नियोजित वेळेत यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या जातील.
- मुश्ताक शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सिंधुदुर्ग