परीक्षा शिक्षकांची होती का बॅंकेची? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TET Exam

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षकांची अभियोग्यता तपासण्यात आली का, बॅंकेच्या अधिकाऱ्याची? असा संतप्त प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे.

TET Exam : परीक्षा शिक्षकांची होती का बॅंकेची?

पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षकांची अभियोग्यता तपासण्यात आली का, बॅंकेच्या अधिकाऱ्याची? असा संतप्त प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापण चाचणी परीक्षेत (टेट) विज्ञान, भूगोल, इतिहास, राज्य घटनेसंदर्भात एकही प्रश्न नसल्याने उमेदवारांनी प्रश्नपत्रिकेवर आक्षेप घेतला आहे. तसेच तांत्रिक अडचणीमुळे वेळ अपुरा पडल्याची प्रतिक्रिया अनेक उमेदवारांनी सकाळकडे नोंदविली आहे. त्यातीलच काही निवडक प्रतिक्रिया....

अतिशय कमी वेळेत प्रश्नांची वाक्यरचना समजून घेणे अवघड होते. त्याचबरोबर भाषा विषयाचे अतिशय कमी प्रश्न होते.

- दयानंद शेळके, लातूर

पहिले दोन दिवस विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजलेच नाही. वेळेअभावी ७० ते ८० प्रश्न सोडविता आले नाही. अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न कसे आले, याची दखल परीक्षा परिषदेने घ्यायला हवी.

- मुस्तफा, रहेमान शेख, करडखेल, ता. उदगीर,लातूर

मी स्वतः दिव्यांग असून, आमच्यासाठी अधिकचा वेळ देण्यात आला नाही. संगणकाच्या स्क्रीनवर आणि प्रवेशपत्रात अधिकच्या २० मिनीटांचा उल्लेख आहे. पण, प्रत्यक्ष मात्र ही वेळ देण्यात आली नाही.

- पुजा कायस्थ, दिव्यांग विद्यार्थीनी

आरआरबी पीओ पदासाठीचे प्रश्न कॉपी पेस्ट केले असून, त्यांचे गुगल मराठी भाषांतर टाकण्यात आले होते. आम्ही २०१७च्या परीक्षे प्रमाणे अभ्यास केला. मात्र परीक्षेसाठीच शिक्षकांच्या पदाचाच विचार न करता प्रश्न काढण्यात आले.

- अश्र्विन पांडे, मूर्तिजापूर, अकोला

टेटे पेपरचा अतिषय वाईट अनूभव आला. सर्व विषयांचे ज्ञान पडताळण्या ऐवजी केवळ बुद्धिमत्तेचे ज्ञान पडताळण्यात आले. तसेच केंद्रात आत गेल्यावर नोंदणी करण्यासाठी खुप वेळ लागला. परीक्षेसाठी व्यवस्थापन सुधारणे गरजेचे आहे.

- प्रदिप त्रिभुवने, पासर्डी, ता. भडगाव, जिल्हा - जळगाव

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पूर्णपणे वेगळे होते. पातळी अतीशय कठीण होती. समाजमाध्यमांमध्ये प्रश्नांची मुक्तपणे चर्चा झाली. नंतरच्या बॅचमध्ये किंवा दिवशी काही प्रश्न रिपीट झाल्यास जबाबदारी कोण घेणार .

- वाचक

इंग्रजी आणि मराठीत प्रश्न संगणकाच्या स्क्रिनवर एकत्र ठेवल्याने वाचन करता येत नाही. उत्तराचे पर्याय पाहताना अधिक वेळ जातो. दिलेल्या वेळेत २०० प्रश्नांची उत्तरे क्लिक करणे अशक्य आहे.

- अभिमान हंगे

शिक्षक भरतीसाठी शिक्षण क्षेत्रातील २०० पेकी फक्त १५ प्रश्न विचारले होते. गणित वगळता भाषा, समाजशास्र, विज्ञान आदी विषयांचे प्रश्नच नव्हते. खरं तर ही सट्टा पद्धतीने नशीबवान शिक्षकांची भरती आहे.

- सलीम मनेरी, बारामती

आलेल्या अडचणी -

- २०० प्रश्र्न सोडविण्यासाठी केवळ १२० मिनीटे पुरेसे नाही

- बुद्धिमत्तेची प्रश्न संख्या निम्म्याहून अधिक, विद्यार्थ्यांना ते प्रश्न वाचणे, समजून घेणे आणि सोडविणे ३६ सेकंदात अशक्य

- पूर्ण प्रश्न स्क्रीनवर दिसत नव्हता. प्रश्न व त्याचे सर्व पर्याय बघण्यासाठी स्क्रीन खाली वरती करावी लागत होती. यामुळे विद्यार्थ्यांचा सारखा वेळ वाया जात होता.

- सामाजिक शास्त्र, सामान्य ज्ञान, विज्ञान ,चालू घडामोडीवर एकही प्रश्न नाही.

- आयबीबीएस ज्या बँकेच्या परीक्षा घेते त्याच पद्धतीचा शिक्षकांना पॅटर्न