esakal | Health Department Exam: आरोग्य खात्याची परीक्षा 'न्यासा'तर्फेच, पण कंट्रोल सरकारकडेच
sakal

बोलून बातमी शोधा

health department examination

31 ऑक्‍टोबरला होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असून त्याची अंतिम घोषणा आज (बुधवारी) होणार आहे.

आरोग्य खात्याची परीक्षा 'न्यासा'तर्फेच, पण कंट्रोल सरकारकडेच

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: 'न्यासा' ही कंपनी मान्यताप्राप्त असून त्याच कंपनीच्या माध्यमातून सावर्जनिक आरोग्य विभागाची परीक्षा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. रद्द झालेली ही परीक्षा आता 24 ऑक्‍टोबर व 31 ऑक्‍टोबरला घेतली जाणार आहे. त्यासाठी 31 ऑक्‍टोबरला होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असून त्याची अंतिम घोषणा आज (बुधवारी) होणार आहे. आरोग्य विभागाची परीक्षा तीन टप्प्यात घेण्याचे नियोजन केल्याचे विश्‍वसनिय सूत्रांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क व ड प्रवर्गातील सहा हजार 191 रिक्‍त पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये गट 'क'अंतर्गत दोन हजार 725 तर गट 'ड'तीन हजार 466 पदांचा समावेश आहे. त्यासाठी राज्यभरातून आठ लाख 66 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी 'न्यासा' या कंपनीची निवड करण्यात आली आहे. मात्र, प्रवेश पत्रातील गोंधळामुळे ती परीक्षा रद्द करावी लागली. त्यानंतर आता भरतीतील वशिलेबाजीच्या ऑडिओ क्‍लिप बाहेर आल्याने विरोधकांसह उमेदवारांनी त्या क्‍लिपची 'एसआयटी'मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तरीही, ही परीक्षा त्याच कंपनीच्या माध्यमातून होईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, त्या ऑडिओ क्‍लिपची चौकशी केली जात असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा 24 व 31 ऑक्‍टोबरला होईल. परीक्षेचे तीन टप्पे केले असून 'टीईटी' पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. ती परीक्षा पुढे न गेल्यास 31 ऑक्‍टोबरऐवजी त्या दिवशीची परीक्षा त्याच्या पुढील रविवारी होऊ शकते. परंतु, त्यावर आज (बुधवारी) अंतिम निर्णय होईल.

- डॉ. सतिश पवार, संचालक, राष्ट्रीय आरोग्य मिशन, मुंबई

परीक्षेचे असे आहे नियोजन

- गट 'क' पहिला टप्पा : पदवी व त्यापुढील साडेतीन लाख उमेदवारांची परीक्षा 24 ऑक्‍टोबरला

- गट 'क' दुसरा टप्पा : दहावी-बारावी उत्तीर्ण सव्वालाख उमेदवारांची 31 ऑक्‍टोबरला सकाळच्या सत्रात परीक्षा

- गट 'ड' तिसरा टप्पा : साडेचार लाख उमेदवारांची 31 ऑक्‍टोबरलाच दुपारच्या सत्रात होईल परीक्षा

संस्था बदलल्यास पुढच्या वर्षीच पदभरती

'न्यासा' या संस्थेची संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी झाली असून मान्यताप्राप्त असल्यानेच त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची पदभरती सोपविली आहे. तरीही, विरोधकांच्या मागणीनुसार संस्था बदलण्याचा निर्णय घेतल्यास ही परीक्षा किमान तीन महिने पुढे ढकलावी लागेल. परंतु, उमेदवारांची मागणी आणि सावर्जनिक आरोग्य विभागाची गरज लक्षात घेऊन ही परीक्षा त्याच संस्थेमार्फत घेतली जाणार आहे. परंतु, त्यावर राज्य सरकारचे नियंत्रण राहील, असेही सूत्रांनी सांगितले.

loading image
go to top