
केमिकल इंजिनिअरिंग : करिअरच्या संधी, अंबानी, रेड्डींनीही याच शाखेतून घेतलंय शिक्षण
केमिकल इंजिनिअरिंग शाखा आणि केमिस्ट्री शाखा यात विद्यार्थ्यांनी गफलत न करता फरक समजावून घेणे ही महत्त्वाचे आहे. केमिस्ट्री ही शास्त्राची शाखा असून या शाखेत रासायनिक अभिक्रिया सारख्या मूलभूत गोष्टींचा अंतर्भाव होतोर; पण केमिकल अभियांत्रिकीत या केमिस्ट्रीच्या तत्त्वाचा उपयोग करून तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षितपणे नवनिर्मिती कशी करावी? हे शिकायला मिळते. या शाखेचे अंतर्गत केमिस्ट्रीबरोबरच फार्मासिटिकल, पाँलिमर, बायोटेक्नॉलॉजी, पेट्रोलियम, पेट्रोकेमिकल, एनर्जी इंजिनिअरिंग, खत निर्मिती, ग्रीन टेक्नॉलॉजी, ई. सारख्या अनेक उपशाखांचा समावेश होतो. त्यामुळे या संबंधित अनेक उद्योग विश्वात या शाखेच्या अभियंत्यांना मोठी मागणी असून या शाखेत संशोधनासाठी भरपूर वाव आहे.
केमिकल इंजिनिअरिंग ही मानवाला सद्यस्थितीत व भविष्यात लागणाऱ्या अनेक गरजा पूर्ण करणारी शाखा आहे. या शाखेचे अंतर्गत साबण, तेल, कपडे, प्लास्टिक, पेट्रोल, डिझेल, तणनाशक, खते, पेंट्स, कागद, सौंदर्यप्रसाधने, औषधे, स्फोटके, इंधन, फायबर, नायलॉन, पॉलिस्टर, रबर, टायर, बायोगॅस, सौर ऊर्जा पॅनेल, कॉम्प्युटर मोबाईलमधील मेमरी पॅनेल, अल्कोहोल उत्पादन ई. अनेक रोजच्या जीवनामध्ये लागणाऱ्या उत्पादनाकरिता उपयोग होतो. त्यामुळे या संबंधित अनेक उद्योग विश्वात या शाखेच्या अभियंत्यांची मागणी वाढत आहे. या शाखेचा राष्ट्राच्या उभारणीमध्ये सिंहाचा वाटा आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागांमधील ही जीवनशैली, गुणवत्ता बदलण्याची ताकद या शाखेत आहे. भारतातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. एम. एम. शर्मा म्हणतात, ‘‘सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपी जाईपर्यंत मानव या शाखेचे योगदान, महत्त्व दुर्लक्षित करू शकत नाही’’ हे वाक्य या शाखेचे महत्त्व अधोरेखित करते.
भारतामधील सध्या आघाडीवर असणाऱ्या रिलायन्स, हिंदुस्तान लिव्हर, भारत पेट्रोलियम, ओ.एन.जी.सी. ,आर.सी.एफ, बी.पी.सी.एल, एल & टी, लुपिन, कॅडबरी, ब्रिटानिया, नेरोलॅक, इफको या सारखे उद्योग तसेच जामनगर, मेंगलोर येथील रिफायनरी, ग्रासिमसारखे कपडे उद्योग, कारगिल ऑईल ई. अनेक उद्योग विश्वामध्ये या शाखेचा अभियंत्यांना प्रचंड मागणी असून ती दिवसागणिक वाढतच आहे. भारतातील उद्योग विश्वाबरोबरच अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, नेदरलँडबरोबरच सौदी अरेबिया, ओमन, दुबई, बहरीन, इराण-इराक अशा व अनेक अरब राष्ट्रांमध्ये ही पेट्रोलियम व त्यासंबंधित उत्पादन कंपन्यांमध्ये केमिकल अभियंत्यांची भरपूर मागणी आहे. त्यामुळे सध्या इंधनाच्या तुटवड्याचा काळात या संपणाऱ्या नैसर्गिक इंधनांना उत्तम पर्याय शोधण्यासाठी या शाखेचा अभियंत्यांना बायोडिझेल, बायोगॅस, इथेनॉल, सी.एन.जी, एल.पी.जी, हायड्रोजन, ई. उत्पादनासाठी ही मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक बहुराष्ट्रीय उद्योग आस्थापनांत काम करण्याची संधी या शाखा अभियंत्यांना मिळते.
केमिकल अभियांत्रिकी ही मूलभूत शाखा असल्याने या शाखेअंतर्गत पेट्रोलियम, पेट्रोकेमिकल, पाँलिमर, ऑईल, केमिकल्स, प्लास्टिक, फार्मा, बायोटेक्नॉलॉजी, एनर्जी इंजिनिअरिंग, प्रोसेस डिझाईन, पर्यावरण अभियांत्रिकी, नॅनोटेक्नॉलॉजी, अपारंपरिक ऊर्जा, कॉम्पिटेशनल फ्लूड डायनॅमिक्स, मटेरियल सायन्स, फूड टेक्नॉलॉजी, कॅटॅलीसिस, प्रदूषण नियंत्रण अशा अनेक उपशाखा येतात. त्यामुळे वरील उत्पादन संबंधित उद्योगांमध्येही या शाखेच्या अभियंत्यांना पुष्कळ मागणी आहे. वरील क्षेत्रांमध्ये अजूनही संशोधनाला भरपूर वाव असल्याने देशांमध्येच नाही तर परदेशांमध्ये ही संशोधनाला भरपूर संधी मिळते. केमिकल अभियांत्रिकी संबंधित संशोधन सुप्रसिद्ध आय.सी.टी मुंबई, एन.सी.एल. पुणे, बी.ए.आर.सी, आय आय सी.टी. इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असून परदेशामध्ये ही मॅचेसट्यूटस, परडू, इम्पेरियल विद्यापीठ सारख्या संस्थेमध्ये ही संशोधनासाठी भरपूर भारतीय दरवर्षी जात असतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशामध्ये कमी खर्चात अनेक प्रकारची पिके घेण्यासाठी या शाखेचा चांगला उपयोग होऊ शकतो. या अंतर्गत येणारे अनेक उत्पादने जसे की रासायनिक खते, दूध, तणनाशके, कीटकनाशके, यामुळे हजारो एकर पडीक जमीनही शेतीसाठी वापरता येईल. तसेच शुगर मिल संबंधित साखर, बगॅस. सेल्युलोज संबंधित उत्पादने मुख्य म्हणजे अल्कोहोल, बायोडिझेल सारखी इंधने, सौर ऊर्जा, अपारंपरिक इंधन ऊर्जा ही उत्पादने या शाखेच्या अंतर्गत येतात.
या शाखेचा अभियंता लहान-सहान व्यवसायापासून मोठ-मोठे उद्योग धंदा सुरू करू शकतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणारे सत्यम पेट्रोकेमिकल तसेच औषध निर्माण करणारी युनिकेम, रसोनी हर्ब, निप्रो इत्यादी सारखे उद्योग अथवा कोल्हापूर ऑक्सिजन, इमर्सन, वनिता अॅक्ववाकेम, सारख्या पर्यावरण विषयक आस्थापना तसेच तुरटी, रंग, बायोडिझेल, साबण, जलशुद्धीकरण, निर्जंतुक करणारे रसायने अशा अनेक उद्योगधंदे या शाखेचा अभियंता काम करू शकतो. या उद्योग आस्थापना शिवाय पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर-उद्योग, डिस्टीलरी, वस्त्रोद्योग अशा अनेक कंपन्यांमध्ये या शाखेचे अभियंता सध्या उत्तम प्रकारे काम करत आहेत. यामुळे रासायनिक अभियंत्यांची मागणी वाढतच चालली आहे. भारताचा आर्थिक कणा असणाऱ्या औषध निर्मिती क्षेत्रात, पर्यावरणविषयक सल्ला देणाऱ्या आस्थापनांमध्ये सध्या या शाखेच्या अभियंत्यांची भरपूर गरज भासत आहे.
या शाखेत शिक्षण घेऊन मुकेश अंबानी, अंजी रेड्डी, के. एच. घरडा ई. अनेक उद्योजक उद्योगधंद्यांत आघाडीवर आहेत. तसेच डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. एम. एम. शर्मा, डॉ. जी. डी. यादव, डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी संशोधनातून उद्योग विश्वाबरोबर ग्रामीण भागात प्रगती घडवण्यास हातभार लावून पर्यावरण, ऊर्जा बचत, संवर्धन यासारख्या अनेक सामाजिक प्रश्नांची उकल केली आहे.
केमिकल इंजिनिअरिंगनंतर या शाखेचा अभियंता एनर्जी, पर्यावरण, पेट्रोलियम, पेट्रोकेमिकल, पाँलिमर, केमिकल, मटेरियल सायन्स, सारख्या अनेक विभागांमधून अनेक आय.आय.टी. , आय.आय.एस.सी., आय. सी.टी., एन.आय.टी. सारख्या प्रसिद्ध संस्थांमधून पदव्युत्तर शिक्षण तसेच पी.एच.डी तेही सरकारी फेलोशिपसह पूर्ण करू शकतात. या नावीन्यपूर्ण शाखेमध्ये अजूनही बरेच संशोधन सुरू असल्याने एन. सी. एल., बायोडिझेल इंडिया, डी. आर. डी. ओ., आय. आय. सी. टी. यासारख्या संस्थांमधून अनेक संशोधक घडत आहेत. तसेच बरेच संशोधकांना विकसित देशांमध्ये अद्यावत संशोधन करण्याची संधी मिळत आहे. या शाखेचा अभियंत्यांना बहुराष्ट्रीय त्याचबरोबर आर.सी.एफ, ओ.एन.जी.सी, हिंदुस्तान पेट्रोलियमसारख्या अनेक नामांकित सरकारी उद्योगांमध्ये सेवा करण्याची संधी मिळते.
केमिकल इंजिनिअरिंग म्हणजेच रासायनिक अभियांत्रिकी, या नावीन्यपूर्ण पण मूलभूत शाखेबद्दल भारतात बरेचसे पालक, विद्यार्थी या शाखेच्या अमर्याद, दैनंदिन जीवनामधील उपयोगाबद्दल अनभिज्ञ आहेत. ही शाखा मानवाच्या जीवनातील प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी असून या साठीची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. सकाळी उठल्यानंतर लागणाऱ्या टूथ पेस्ट, ब्रश, साबणापासून ते रात्री झोपताना लागणाऱ्या डास प्रतिबंधक कॉईल, औषधे आदी पर्यंत या शाखेचा संबंध येतो. भारतातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ जगप्रसिद्ध आय.सी.टी. मुंबईचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ. जी. डी. यादव हे तर नेहमी संभाषणात म्हणतात, ‘‘देव हा केमिकल अभियंता आहे कारण देवनिर्मित मानवाच्या शरीरातसुद्धा या शाखेच्या अनेक तत्त्वाचा उपयोग केलेला आहे; तसेच निसर्गातसुद्धा या शाखेसंबंधित प्रक्रिया घडत असतात.’’
- डॉ. अमरसिंह जाधव, डीन, डी. वाय. पाटील, अभियंत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80876 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..