Ganesh Chaturthi 2022 : गणेशाच्या लोभस रूपांवर पीएच.डी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Chaturthi 2022 Ph.D on greedy forms of Ganesha pune
गणेशाच्या लोभस रूपांवर पीएच.डी

Ganesh Chaturthi 2022 : गणेशाच्या लोभस रूपांवर पीएच.डी

पुणे : निरनिराळ्या चित्रकारांनी साकारलेल्या गणेशचित्रांचा सखोल अभ्यास करून, त्यांवर ज्येष्ठ चित्रकार प्रा. मिलिंद फडके यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून नुकतीच पीएच.डी. पूर्ण केली. ‘भारतीय समकालीन चित्रकलेतील गणेशाची रूपे : एक अभ्यास (१९९० ते २०१५)’ या विषयावर त्यांनी प्रबंध लिहिला आहे.

चित्रकलेबद्दल फडके म्हणाले की, पणजोबा, आजोबा आणि वडील यांच्याकडून आलेला चित्रकलेचा वारसा मला मिळाला. आई सलग चाळीस वर्षे तिच्या हातांनी शाडूमातीच्या घरातील गणेशमूर्ती घडवायची. मी ती रंगवायचो. पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून उपयोजित कलेचे शिक्षण घेतल्यावर मी दोन वर्षं नोकरीनिमित्त बंगळूरूमध्ये होतो. तेव्हा घरची आठवण आल्यावर मी गणपतीचे चित्र रेखाटले. पुढे प्रदर्शनात माझी चित्रे पाहून गणपतीच्या चित्रांची मागणी केली. ती पुरवताना मनात गणेशचित्रे साकारण्याची ओढ निर्माण झाली. नंतर सात वर्षांत मी गणपतीची जवळपास सव्वाशे चित्रे भक्तिभावाने केली.

फडके यांनी पुढे सांगितले की, प्रदर्शनांमधून इतर चित्रकारांनी निर्मिलेली गणेशचित्रेही बघायचो. एकदा विचार आला की, भारतीय चित्रकलेवर पाश्चात्य व आधुनिक कला प्रवाहांचा मोठा प्रभाव असतानाही, चित्रकारांना गणेशरूपांचे आकर्षण कशामुळे वाटत असावे? भारतातील अनेक नामवंत चित्रकारांनी गणपतीचे एखादे तरी चित्र काढलेले आहे. त्यामागची त्यांची भूमिका काय असेल? गणेशरूपांच्या वेगवेगळ्या पैलूंचा चिकित्सक, कलात्मक, भावनात्मक व वैचारिक अभ्यास करायचे ठरवले.

योगायोग प्रसादरूप वाटतो!
प्राध्यापक म्हणून केलेल्या नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर मी या अभ्यासासाठी अनेक चित्रकारांशी बोलून, त्यांनी साकारलेल्या गणेशचित्रांसंबंधी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. चित्रकृतींतील रेखांकन, आकार, रंगसंगती, मांडणी व सादरीकरणाच्या पद्धती, शैली आदींचा व्यापक अभ्यास केला. गणपतीची निरनिराळी रूपे अभिजन, बहुजन, कलाकार व अनेक बुद्धिवादींनाही प्रिय आहेत. नुकत्याच पूर्ण झालेल्या पीएच.डी.च्या निमित्ताने जणू गणपतीचाच आशीर्वाद लाभला आहे व तो नेमका यंदाचा गणेशोत्सव जवळ आलेला असताना, हा योगायोगही मला प्रसादरूप वाटतो.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13370 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..