पुणे विद्यापीठात कंत्राटी प्राध्यापकांची भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Savitribai phule pune university
विद्यापीठ नेमणार कंत्राटी प्राध्यापक

पुणे विद्यापीठात कंत्राटी प्राध्यापकांची भरती

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे, निवृत्त होणाऱ्या प्राध्यापकांची मोठी संख्या आणि रखडलेली भरतीप्रक्रिया पाहता काही विभाग बंद करण्याची वेळ आली आहे. यावर तातडीची उपाययोजना म्हणून विद्यापीठाने कंत्राटी आणि स्वतःच्या फंडातून सहायक प्राध्यापकांची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठातील ४२ अनुदानित विभागांतील प्राध्यापकांची जवळपास ५५ टक्के पदे रिक्त आहेत. तर काही नावाजलेल्या विभागांत प्राध्यापकांची सख्या एक ते दोन वर आली आहे. त्यामुळे विद्यापीठाचे राष्ट्रीय क्रमवारीतील स्थानही घसरले आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांची निकड पाहता ‘सकाळ’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. रिक्त पदे आणि स्वयंअर्थसहाय्यीत विभागांमधील प्राध्यापकांची गरज पाहता विद्यापीठाने तातडीच्या उपाययोजना स्वीकारल्याचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर पाहता आम्ही कंत्राटी पद्धतीने १३० सहायक प्राध्यापकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यापीठ फंडातूनही काही प्राध्यापकांची पदे भरली जाणार आहेत. आमच्या पातळीवर जे शक्य आहे ते सर्व आम्ही करत आहोत.’’ पुढील महिनाभरातच कंत्राटी भरती पूर्ण करून शिक्षक दिनी अर्थात ५ सप्टेंबरला हे प्राध्यापक रुजू होतील, असा विश्वास डॉ. सोनवणे यांनी व्यक्त केला.

रिक्त पदांचा परिणाम

  • चार विभागांत शून्य, नऊ विभागांत फक्त एक कायमस्वरूपी प्राध्यापक

  • विज्ञान शाखेच्या विभागांत प्राध्यापकांअभावी प्रयोगशाळा बंद पडण्याची स्थिती

  • एका प्राध्यापकाला दोन किंवा त्यापेक्षा अधिक विषय शिकविण्याची वेळ

  • संशोधन आणि शिकवणीवर विपरीत परिणाम

  • मानव्यविद्या शाखेतील अनेक विभागांत प्राध्यापकांची वानवा

विद्यार्थी म्हणतात...

अनुभवी शिक्षक, दर्जेदार शिक्षण आणि संशोधनातील करीअरसाठी सर्वच विद्यार्थी विद्यापीठातील विभागांना प्राधान्य देतात. मात्र, येथे आल्यानंतरही प्राध्यापकांची कमतरता जाणवते. त्याबरोबरच विशिष्ट विषयातील संशोधक प्राध्यापक मिळायला अडचण होते. काहीवेळा तर विभागाबाहेर राष्ट्रीय संशोधन संस्थांत संबंधीत विषयाचे संशोधक शोधावे लागतात. आता जरी कंत्राटी पद्धतीने प्राध्यापक घेतले, तरी कायमस्वरूपी प्राध्यापकांची भरती होणे गरजेचे आहे, असे मत एका विद्यार्थ्याने व्यक्त केले.

कायमस्वरूपी प्राध्यापकांच्या भरतीला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यासंबंधाने बिंदू नामावली प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील अधिवेशनात त्याला मान्यता मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. या द्वारे ५० टक्के भरती पूर्ण होईल.

- डॉ. कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88995 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..