विद्यार्थ्यांनो, इंटर्नशिपची संधी चिंता सोडा ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

education job portal for students AICTE internship opportunities
विद्यार्थ्यांनो, इंटर्नशिपची संधी चिंता सोडा !

विद्यार्थ्यांनो, इंटर्नशिपची संधी चिंता सोडा !

पुणे : नियमितच्या अभ्यासक्रमाबरोबरच कौशल्य विकासासाठी प्रत्यक्ष कार्यानुभव आता अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना अधिक रोजगाराभिमुख करण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) इंटर्नशिप पोर्टलची निर्मिती केली असून, एका क्लिकवर आपल्याला देशभरातील इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पदवीच्या शेवटच्या वर्षाला इंटर्नशिप किंवा संशोधनकार्य अनिवार्य केले आहे. त्यामुळे येत्या काळात इंटर्नशिपला पदवीला प्रमाणपत्राइतकेच महत्त्व प्राप्त होत आहे. आयटी क्षेत्रात करिअर करणारे धन्वंतरी जाधव सांगतात, ‘‘नोकरी मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे ‘प्रशिक्षण किंवा प्रशिक्षण कालावधी’ अर्थात इंटर्नशिप आहे.’’

उद्योगांनाही होणार मदत
व्यवसायांच्या बदलत्या गरजा व नवीन तंत्रज्ञानाधारीत कुशल मनुष्यबळासाठी शैक्षणिक संस्थांनी उद्योगांसोबत परस्पर सहकार्य वाढविले आहे. विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर दर्जेदार इंटर्नशिप संधी मिळावी, म्हणून ‘एआयसीटीई’ने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. विद्यार्थी स्वतः लॉगीन करत अपेक्षित ठिकाणी इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. तसेच उद्योगांनाही त्यांना अपेक्षित उमेदवारांची एकत्रित माहिती या संकेतस्थळावरून मिळणार आहे.

इंटर्नशिपसाठी ही कौशल्य गरजेची
१. संभाषण व सादरीकरण ः तुम्ही स्वतःला कसे सादर करता, कंपनीमध्ये तुम्ही इतरांशी संवाद साधताना कसे बोलाल, हे पाहिले जाते. सादरीकरणामधून व ऐकण्यामधून तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना समजून घ्याल का? ऐकाल का? हे समजते.
२. अनुकूलता ः नवीन शिकायची तयारी, नवीन वातावरणात नवीन कामे, नवीन कार्ये, नवीन आव्हाने कशी हाताळता यावरसुद्धा जोर दिला जातो.
३. स्वतःची शिस्त व वेळेचे नियोजन ः तुमच्याकडे स्वतःची शिस्त हवी. आपण एखादी गोष्ट का करतोय? का करणार आहोत? याबाबतीत आपले ध्येय किंवा उद्दिष्ट ठरलेली असावीत. या गोष्टी करता करता वेळेचे भान महत्त्वाचे आहे.
४. नेतृत्व व सकारात्मकता ः एखाद्या प्रकल्पावर स्वतःहून पुढाकार घेत व सगळ्यांना सोबत घेऊन काम करत असाल तर नेतृत्वगुण विकसित होतात. यामुळे पुढे जाण्याची संधी मिळते.
५. उत्सुकता ः प्रशिक्षण कालावधीसाठी जाताना, तिथे का जाताय? ती कंपनी कोणत्या बाबींवर काम करते? असे वेगवेगळे प्रश्न तुम्ही स्वतः मुलाखतीमध्ये विचारायला हवेत किंवा त्यांनी विचारले तर तुम्हाला ते सांगता यायला हवेत.
६. वैयक्तिक कौशल्य व कार्यसंघ ः तुम्ही इतरांचे ऐकणे समजून घेणे. सहानुभूती दर्शविणे, संयमाने सांगणे किंवा त्यावर प्रतिक्रिया देणे, या गोष्टी तुम्ही महाविद्यालयामध्ये केलेल्या ग्रुप प्रोजेक्टवर आधारलेल्या प्रश्नांवरून कळू शकतात.
७. बायोडाटा व कव्हर लेटर ः बायोडाटा (रिझुमे) सोबत कव्हर लेटरसुद्धा लिहून जोडा. त्यात तुम्ही कोणत्या प्रकल्पावर किंवा काय काम केलं, हेसुद्धा लिहा. तुम्ही कसे कार्यक्षम आहात आणि त्या (इंटर्नशिप) पोस्टसाठी कसे योग्य उमेदवार आहात हे सांगा.

इंटर्नशिप मन लावून केल्यास कामाची खूप चांगली माहिती मिळते. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे समजत नाही व ते हा काळ गांभीर्याने घेत नाही. पण तसे करणे चुकीचे आहे. या काळात योग्य ते ज्ञान घेतल्यास त्याचा फायदा आपल्या करिअरसाठी होतो.
- विजय पंडित, औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ

‘एआयसीटीई’च्या संकेतस्थळावरील इंटर्नशिपसाठीची नोंदणी ः
राज्य ः नोंदणी ः सुरू असणारी ः पूर्ण झालेली
१) मध्यप्रदेश ः ४२०३ ः ३३८ ः ५८६
२) महाराष्ट्र ः ४०७२ ः ३८९ ः ४४८
३) उत्तर प्रदेश ः ३६४५ ः १९४ ः ३७४
४) तमिळनाडू ः ३३३४ ः १७८ ः ३७४
५) कर्नाटक ः ३७७५ ः ६१ ः ३२१
भारत ः २५८६१ ः १८०२ ः ३३७३

- इंटर्नशिपसाठीचे संकेतस्थळ : https://internship.aicte-india.org/
- क्यूआर कोड : PNE22T04768