
शालेय साहित्य महागले; वह्यांच्या किमतींत २० ते ३० टक्क्यांनी वाढ
पुणे - अवघ्या काही दिवसांत नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून आता शालेय साहित्याच्या खरेदीसाठी पालकांची लगबग सुरू झाल्याचे पाहायला मिळते. मात्र, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा वह्यांच्या किमतीत तब्बल २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. एकीकडे मागणीप्रमाणे पुरवठा करताना आणि ग्राहकांना वाढलेल्या किमतीबाबत समजावून सांगताना विक्रेत्यांना कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे, वह्यांच्या किमती वाढल्याने पालकांच्या म्हणजेच ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दोन वर्ष शाळा बंद होत्या आणि ऑनलाइन शिक्षण सुरू होते. त्यावेळी दरवर्षीप्रमाणे शालेय साहित्याची विक्री झाली नाही. आता मात्र शालेय साहित्याला वाढती मागणी आहे. वह्यांच्या निर्मितीसाठी कागदाचा दरांसह वाहतूक खर्च वाढला आहे. त्यासमवेत मजुरी, हमाली, वाहतूक यांसह अन्य खर्च वाढले आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि वाढलेला वाहतूक खर्च पाहता वह्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. वह्यांसह पेन, पेन्सिल, कंपास, स्कूलबॅग अशा शालेय साहित्याच्या किमतीतही वाढ झाल्याचे दिसून येते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्ष शाळा बंद होत्या. दरम्यान, शालेय साहित्याला मागणी देखील कमी होती. परंतु आता शालेय साहित्य आणि त्यातही वह्यांना वाढती मागणी आहे. पुण्यात पुणे आणि मुंबईमधील कारखानदारांकडून वह्या येतात. परंतु यंदा विक्रेत्यांच्याच मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याचेही दिसून येते. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने वह्यांच्या किमती वाढल्या आहेत. पण, ग्राहकांना दोन वर्षांपूर्वीच्याच दरात वह्या हव्या आहेत. त्यांना वह्यांचे भाव वाढले आहेत, हे पटवून देण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
- महेश जैन, विक्रेते, अप्पा बळवंत चौक
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा शालेय साहित्यांच्या किमती खूप वाढल्या असल्याचे दिसून येते. दोन-तीन वर्षांपूर्वी २५-३० रुपयांना मिळणाऱ्या एका वहीसाठी आता ४० रुपये मोजावे लागत आहेत. वह्या, कंपास बॉक्स, दप्तर अशा सर्वच शालेय साहित्याच्या किमती वाढल्याचे दिसून येते.
- सविता कांबळे, ग्राहक
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07738 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..