
CDS Exam : संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेसाठी विद्यापीठात प्रशिक्षण वर्ग
पुणे : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाच्या धर्तीवर यंदाच्या वर्षीपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) परीक्षेसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक व माजी पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नागरी सेवा परीक्षांसाठी (एमपीएससी, यूपीएससी) स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नागरी सेवा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यात येते. याच धर्तीवर आता केंद्रात संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांच्या मदतीने या प्रशिक्षण वर्गासाठी आठ महिन्यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यात प्रवेश परीक्षेसाठी प्रशिक्षण आणि स्टाफ सिलेक्शन बोर्ड स्क्रिनिंगसाठी शारीरिक व मानसिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी ५० विद्यार्थी क्षमता असून यासाठी माफक शुल्क आकारण्यात येणार असल्याचेही उमराणीकर यांनी सांगितले.
या प्रशिक्षण वर्गात नियमित मार्गदर्शनपर वर्ग, अभ्यासिका, ग्रंथालय, मुलाखतीसाठी आवश्यक मार्गदर्शन आदींचा समावेश असेल. तसेच उमराणीकर यांच्यासह कॅप्टन प्रा.चंद्रशेखर चितळे (निवृत्त), कर्नल एस. हसबनीस (निवृत्त) व लष्करी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
‘‘विद्यापीठाने काही महिन्यांपूर्वी विद्यापीठात एनसीसी सुरू केले असून या विद्यार्थ्यांना सीडीएस प्रशिक्षणाचा फायदा होईल. येत्या एप्रिल महिन्यापासून हे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचे नियोजन आहे.’’
- डॉ. संजीव सोनवणे, प्र- कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ