मनातलं : करिअर निर्णय : अनाहूत सल्ले

विद्यार्थ्याला फक्त आधार हवा असतो. विद्यार्थी त्याचा निर्णय पालकांच्या मदतीने घेऊ शकतो.
students career
students careersakal
Summary

विद्यार्थ्याला फक्त आधार हवा असतो. विद्यार्थी त्याचा निर्णय पालकांच्या मदतीने घेऊ शकतो.

- प्रा. विजय नवले

झाली का दहावी? झाली का बारावी? आता काय ठरवलंय? अमुक एक कर बरं ...हे करू नको, ते कर....वगैरे वगेरे. समाजातील अनुभवी आणि सदिच्छा असणाऱ्यांचे सल्ले आपण नक्की घ्यायचे आहेत. संबंधित क्षेत्रात काम करत असणाऱ्या व्यक्तीकडून त्या त्या क्षेत्रातील सद्य स्थिती समजावून घेणे एकदम महत्त्वाचे. आम्ही तर आवाहन करतोय, जे जे ज्या ज्या क्षेत्रातील खऱ्या अर्थाने तज्ज्ञ आहेत, ज्यांचे विश्लेषणात्मक ज्ञान चांगले आहे अशा अनुभवी मंडळींनी संबंधित क्षेत्रातील करिअर मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज राहावे. त्यांचे मार्गदर्शन उपयुक्तच ठरेल.

मात्र अर्धवट माहिती, नकारात्मक विचार, चुकीची माहिती असणाऱ्यांचे सल्ले आपण विद्यार्थी आणि पालकांनी ऐकायचे देखील नाहीत. करिअरचा ‘क’ देखील माहीत नसणारे, उगीचच वयाने मोठे आहेत म्हणून वडिलकीच्या नात्याने सांगायला जातील परंतु लक्षात घ्या करिअर मार्गदर्शन हे शास्त्र आहे. त्यात मानसशास्त्र उपयोगाचे असते. कसे बोलावे, मुलांना काय वाटेल, शब्द जपून वापरावे लागतात, मुलांनी पुढे काही प्रश्न विचारले तर सांगता आले पाहिजे, जुनी माहिती सांगून चालत नाही, बदललेले नियम माहिती असावे लागतात, करिअर आणि संबंधित कौशल्यांचा अभ्यास असावा लागतो, विद्यार्थ्याला समजावून घ्यावे लागते, त्याला काय हवे काय नको, तो किंवा ती कशामुळे आनंदाने करिअर करेल याचा अंदाज सुक्ष्मपणे घ्यावा लागतो. या सगळ्या कामाचा मोठा अनुभव लागतो. उगीच जाता जाता बोलणे, टोमणे मारणे.

आमच्यावेळी असे होते, आता काही खरे नाही, हल्ली कशाला किंमत नाही हो, स्पर्धा खूप वाढली हो, अमुक-तमुकला कोण विचारतो, वगैरे पकाऊ वाक्ये तोंडावर हाणून पालकांना आणि विद्यार्थ्यांना संभ्रमित करण्यापेक्षा गप्प बसावे. आजची मुले बऱ्यापैकी जाणकार आहेत. पालकांनी अर्धवट ज्ञान असणाऱ्या नातेवाइकांसमोर आपल्याला मुलांना या विषयावरील चर्चेत विनाकारण सहभागी करून घेऊ नये. चांगली माहिती असलेले, वृत्तीने सकारात्मक असलेले चालतील. पण वैयक्तिक आयुष्यात पराभूत, विचारांनी बुरसटलेले कुणी असेल तर त्यांचे अनाहूत सल्ले ऐकू नयेत. आपल्याला सल्लागारांपेक्षा दिशा दर्शकांची गरज असते.

विद्यार्थ्याला फक्त आधार हवा असतो. विद्यार्थी त्याचा निर्णय पालकांच्या मदतीने घेऊ शकतो. त्यांची संभ्रमावस्था अशा अर्धवट माहिती असणाऱ्यांनी वाढवू नये. विद्यार्थी आणि पालकांनी सरसकट ॲप्टिट्यूड टेस्ट करणे आणि समुपदेशकांकडे रांगा लावणे हा सल्ला मी तरी देत नाही. अगदी गरज निर्माण झाली तरच जावे. अन्यथा विद्यार्थी आणि पालकांनी वैयक्तिक स्तरावर आत्मविश्वासाने निर्णय घेतला असेल आणि तो सुयोग्य आहे असे वाटत असेल तर फार कडकड करू नये. निर्णय घ्यावा आणि पुढील वाटचालीस सुरुवात करावी. शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com