रि-स्किलिंग : मानवी कौशल्यांचे महत्त्व वाढणारच!

एखादी घटना घडल्यानंतर अथवा कोणी काही सांगितल्यानंतर त्याचा सखोल अर्थ समजण्याची आणि निश्चित करण्याची क्षमता म्हणजे ज्ञान तारतम्य कौशल्य.
Reskilling
ReskillingSakal

एखादी घटना घडल्यानंतर अथवा कोणी काही सांगितल्यानंतर त्याचा सखोल अर्थ समजण्याची आणि निश्चित करण्याची क्षमता म्हणजे ज्ञान तारतम्य कौशल्य. हे कौशल्य पुढील काही वर्षांत अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. घटनेचा, माहितीचा, डेटाचा सखोल अर्थ समजून घेणे आणि त्याचा योग्य वेळी, योग्य कारणांसाठी आणि योग्य प्रकारे उपयोग करता येणे अतिशय महत्त्वाचे आहे. स्मार्ट मशिन्स, ऑटोमेशन आणि रोबोटच्या वाढत्या वापरामुळे उत्पादन आणि सेवा क्षेत्रात, जे कामे वरील तंत्रज्ञान करू शकणार नाही, अशा कौशल्यांचे महत्त्व अधिक वाढणार आहे.

संगणकच्या मर्यादा

जेव्हा ‘आयबीएम’च्या सुपर कॉम्प्युटर, डीप ब्लूने ग्रँडमास्टर गॅरी कास्पारोवचा बुद्धिबळात पराभव केला, तेव्हा आता संगणक माणसापेक्षा हुशार झालेत आणि बुद्धिमान झालेत असा निष्कर्ष काढला गेला. पण, डीप ब्लूने गॅरीला जिंकले ते केवळ प्रोग्रॅम केलेल्या त्याच्या एका सेकंदात लाखो संभाव्य चाली समजून घेण्याच्या क्षमतेने. त्याच्या स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर नव्हे. संगणक बुद्धिबळ किंवा एखाद्या अवघड खेळात एखाद्या व्यक्तीला त्याच्या संगणकीय क्षमतेच्या जोरावर पराभूत करू शकतो, परंतु जर आपण त्याला विचारले, की त्याला दुसरे काही, उदा, पूल खेळायचे आहे का, तर आपण कशाबद्दल बोलत आहे हेच कळणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संशोधनातील महत्त्वपूर्ण प्रगती असूनही, स्वतः विचार करण्याची कुवत मशिन लर्निंग अथवा कृत्रिम बुद्धिमत्तेत असू शकत नाही.

मानवी मेंदू गरजेचाच

तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी मनुष्याची विचार करण्याची क्षमता संगणकाला देता येणार नाही. मनुष्य आपला मेंदू, विचार करण्याची क्षमता, स्मृती वापरतो, तर कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला फीड केलेल्या डेटावर अवलंबून असते. मनुष्य हा भूतकाळातील चुकांमधून शिकत असतो. मानव बुद्धिमान कल्पनांना जन्म देत असतो. मानवी बुद्धिमत्ता ही अशी गोष्ट आहे, जी मानवनिर्मित चेतना आणि त्याच्याशी संबंधित सर्जनशील व्यवस्थेच्या विकास आणि विनियोगाला आकार देते. मानवी बुद्धिमत्ता प्रत्येक गोष्टीत कारण शोधते. परिस्थितीचा विचार करून योग्य निर्णय घेते. त्यामुळे आताच्या सर्व तंत्रज्ञान सांभाळण्यासाठी मानवी मेंदूची गरज आहे.

भविष्यात अशा संगणकांना, रोबोजना, ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाला मॅनेज करण्यासाठी मानवी बुद्धिमत्ता लागणार आहे. त्यामुळे सेन्स मेकिंगसारखे (ज्ञान तारतम्य ) कौशल्य शिकून घ्यावे लागेल. अर्थात, रोबोटिक्स तंत्रज्ञानाची खरी शक्ती आपल्याला स्वतःच्या क्षमता वाढवण्याची संधी आहे. आपण आता मशिन्स सोबत भागीदारी करणार आहोत, जे आपल्या, मानवी बुद्धीच्या आणि कारण समजून घेण्याच्या कौशल्यावर आधारित असेल. त्यामुळे आपल्याला आता ह्या तंत्रज्ञानासोबत जगण्याची सवय करून घ्यावी लागेल. हे तंत्रज्ञान स्वतःच्या फायद्यासाठी कसे वापरात येईल याचे स्वतःच्या ज्ञानावर आधारित तारतम्य शिकून घ्यावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com