esakal | रि-स्किलिंग : वेळ ‘धोक्यांना’ प्रतिसाद देण्याची...
sakal

बोलून बातमी शोधा

Reskilling

रि-स्किलिंग : वेळ ‘धोक्यांना’ प्रतिसाद देण्याची...

sakal_logo
By
विनोद बिडवाईक

नोकरदार माणूस हा कितीही मोठ्या पदावर असला तरी शेवटी नोकरदारच असतो. त्याचे संपूर्ण अस्तित्व हे त्याच्या संस्थेला असणाऱ्या उपयोग मूल्यांवर अवलंबून असते. काही संस्थांमध्ये ते त्याच्या उपद्रव मूल्यांवर अवलंबून असते. आपल्या बघण्यात दोन्ही प्रकारचे कर्मचारी असतात.

उपयोग मूल्य असणारे कर्मचारी उत्पादक असतात, त्यांची कामगिरी चांगली असते. एकदा त्यांचे हे मूल्य संपले, की मग त्यांच्यासमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो.

उपद्रव मूल्य असणारी व्यक्ती निव्वळ राजकारणातच असते असे नव्हे, ह्या व्यक्ती सगळीकडे असतात. अगदी खटकणाऱ्या कार्यसंस्कृती असणाऱ्या संस्थेमध्ये हे उपद्रव मूल्य असणारे कर्मचारी बरेच असतात. ह्या व्यक्ती स्वतःचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी कोणत्याही थराला जातात. अगदी संस्थेला हानिकारक असणारे कृत्य करायला हे मागेपुढे पाहत नाहीत. अशा व्यक्ती कामावर नाइलाजाने ठेवणे हे काही संस्थांना आवश्यक ठरते. अर्थात ह्या लोकांचे करिअर अचानक पडझडीला लागते. अर्थात उपद्रव मूल्य सिद्ध करण्यासाठी कमालीचा निर्लज्जपणा आणि नालायकपणा रक्तात असावा लागतो.

आपण आणि बहुतांश कर्मचारी पहिल्या प्रकारात मोडतो. प्रश्न हा आहे की स्वतःचे उपयोग मूल्य वाढवावे कसे?

आतापर्यंत आपल्या लक्षात असे आले असेल, की तंत्रज्ञान, बदलते जागतिक संदर्भ आणि आता आता आलेल्या ह्या ‘कोविड -19’च्या महामारीमुळे सर्वांसमोर अस्तित्वाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. भूतकाळात करत असणाऱ्या कामाच्या पद्धती वेळोवेळी बदलत आहेत, त्या भविष्यातही बदलत राहणार आहेत. ह्या सर्वांचे प्रतिबिंब आपल्या कामात पडत राहणार हे नक्की. त्यामुळे आपल्याला ‘मला हे सर्व माहिती आहे’ येथपासून ‘मला ह्यातून काय शिकता येईल,’ असा दृष्टिकोन ठेवला तर नक्कीच फायद्याचे ठरू शकेल.

कोणता धोका प्रत्यक्षात येईल, हे समजून घेणे हे कौशल्य आहे. आणि हेच कौशल्य आपल्याला आता शिकायचे आहे. आपल्याला असणारा धोका हा तंत्रज्ञानाचा नाही, ऑटोमेशनचा नाही, धोका आहे हा आपण नवीन शिकण्याचे थांबवल्याचा. कामाच्या नवनवीन पद्धती शिकून घेणे ह्याशिवाय आपल्यासमोर आता तरणोपाय पर्याय नाही. आपणासमोर अनेक धोके आहेत, नोकरी जाण्याचा, जॉब ऑटोमेट होण्याचा, बॉस बदलला तर त्याच्या बदलेल्या अपेक्षांचा, संस्थेमध्ये असणाऱ्या राजकारणाचा फटका बसण्याचा इत्यादी इत्यादी. ह्या सर्व धोक्यांना प्रतिसाद देणे कदाचित नेहमीच शक्य होणार नाही, परंतु यापैकी किती गोष्टी प्रत्यक्षात येऊ शकतात हे समजून उमजून घेऊन योग्य तो प्रतिसाद देणे आवश्यक ठरते.

त्यामुळे कामावर जाताना सोबत आपले, कान, डोळे, हे सर्व समजणारा मेंदू न्यायला विसरू नका.