रि-स्किलिंग : नोकरी सोडताय? हा विचार करा!

रि-स्किलिंग : नोकरी सोडताय? हा विचार करा!

तरुण कर्मचाऱ्यांमध्ये सध्या नोकरी बदलण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. नोकरी बदलण्याची कारणेही महत्त्वाची आहेत. चांगली संधी, उत्तम पगार, उत्तम फायदे, परदेशगमन करण्याची संधी, अथवा बॉसबरोबर पटत नाही, संस्थेचे वातावरण चांगले नाही वगैरे सारखी अनेक कारणे कर्मचारी सांगतात. मात्र, विचार न करता नोकरी बदलल्यास पश्चात्ताप करण्याची वेळ येते. खरे तर या सर्व गोष्टी व्यक्तिसापेक्ष असतात. काही महाभाग दर एक-दोन वर्षांनी नोकरी बदलतात. प्रत्येक वेळी नोकरी बदलण्याचे एकच कारण असते, असेही नाही. खूपदा नोकरी बदलताना अल्प मुदतीचा फायदा बघितला जातो.

नवीन नोकरीत तुमचा पगार वाढीव दिसेल; पण फायदे सारखे आहेत का? उदा. एखाद्या संस्थेत तुमच्या कुटुंबीयांसाठी विम्याचा फायदा असेल आणि यात तुमचे आई-वडील देखील सामील असतील, मात्र नवीन संस्थेमध्ये आई वडील नसतील तर? खूपदा हा विचार मंडळी करत नाहीत. आपण नवीन संस्थेत रुजू होतो, तेव्हा आपल्याला चार अतिरिक्त फायदे मिळत असतील, परंतु आधीच्या संस्थेत मिळत असणारे आधीचे सहा फायदे गमावत असाल, तर वाढीव पगाराचा काय फायदा? या फायद्यामध्ये तुमच्या रजा, रजेचे मिळणारे पैसे, विम्याचे फायदे, सुट्ट्या, कॅन्टीन, कॅफेटेरिया आणि ट्रान्सपोर्टसारखे फायदे आहेतच, त्याचबरोबर नवीन संस्थेचे कार्यालय, इंटरनेट अथवा ‘आयटी’ची साधने, संस्थेची कार्यसंस्कृती, बॉस वगैरे सारखे परिमाण येतात.    

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आगीतून फुफाट्यात नको
नोकरीत काही गोष्टी या दंतकथा म्हणूनच समजून घ्याव्या लागतात. उदा. परिपूर्ण संस्था, परफेक्ट बॉस, उत्कृष्ट कार्यसंस्कृती, अमाप पगार इत्यादी इत्यादी. प्रत्येक संस्था या सर्व घटकांत वेळोवेळी सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु संस्थेमध्ये हजारो लोक काम करीत असतात. एखादी प्रणाली सुधारण्याची, स्थापित करण्याची जबाबदारी वरिष्ठ व्यवस्थापनातील मंडळी आणि नंतर कर्मचाऱ्यावर असते. नोकरी करताना अथवा बदलताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्यास नोकरी सोपी होते.

आगीतून फुफाट्यात पडल्यापेक्षा, सध्याच्या संस्थेत आपल्याला काय मिळते हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. मुळात आपण फक्त मिळणाऱ्या पगाराचा विचार करतो आणि संपूर्ण कारकीर्द दुर्लक्षित करतो, त्यावेळी नोकरी बदलल्यावर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते. पगार हा महत्त्वाचा असतोच, मिळणारे फायदेही महत्त्वाचे आहेत, परंतु फक्त पगारामागे धावत नोकरी बदलल्यास नोकरी टिकून ठेवणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे एखादी नोकरी करताना आणि नोकरी बदलताना संपूर्ण संस्थेचा, स्वतःच्या आवडीनिवडीचा, स्वतःच्या स्वभावाचा, स्वतःच्या मूल्यांचा आणि संस्थेच्या मूल्यांचा, तसेच मिळणारे फायदे-तोटे यांचा विचार करणे चांगले. 

(लेखक मनुष्यबळ विकास आणि व्यवस्थापनतज्ज्ञ असून, एका बहुराष्ट्रीय संस्थेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com