esakal | संधी करिअरच्या... : स्पर्धा परीक्षा आणि कला शाखा

बोलून बातमी शोधा

संधी करिअरच्या... : स्पर्धा परीक्षा आणि कला शाखा}

कला शाखेतून मानवाशी संबंधित शास्त्रांचा अभ्यास केला जातो. मानवी जीवनाच्या विविध पैलूच्या अभ्यासाबरोबरच या शाखेमध्ये राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र यासारख्या विषयांमध्ये उत्तम करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. मानसशास्त्रासारख्या विषयात अनेक प्रकारचे स्पेशलायझेशन करता येतात.

संधी करिअरच्या... : स्पर्धा परीक्षा आणि कला शाखा
sakal_logo
By
विवेक वेलणकर

कला शाखेतून मानवाशी संबंधित शास्त्रांचा अभ्यास केला जातो. मानवी जीवनाच्या विविध पैलूच्या अभ्यासाबरोबरच या शाखेमध्ये राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र यासारख्या विषयांमध्ये उत्तम करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. मानसशास्त्रासारख्या विषयात अनेक प्रकारचे स्पेशलायझेशन करता येतात. त्यात सोशल सायकॉलॉजी, स्कूल सायकॉलॉजी, क्लिनिकल सायकॉलॉजी, इंडस्ट्रिअल सायकॉलॉजी, कंझ्युमर सायकॉलॉजी, काउन्सिलिंग इत्यादी विषयांचा समावेश होतो. याशिवाय या शाखेतून इतिहास. भूगोल, गणित, संख्याशास्त्र आणि इंग्रजी, मराठी, संस्कृतसह जर्मन, फ्रेंच, जॅपनीज सारख्या परकीय भाषांमध्ये सुद्धा अध्ययन व करिअर करण्याची सोय आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कला शाखेतून बारावीनंतर बीबीए,  लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, बीएफ, डिझायनिंग, पत्रकारिता यांसारख्या क्षेत्रात जाता येते तर पदवीनंतर स्पर्धा परीक्षा, एमबीए, बँकिंग, इन्शुरन्स, आर्मी, पत्रकारिता, लॉ, एमएसडब्लू, मीडिया, ट्रॅव्हल/ टुरिझम, रेल्वे, लायब्ररी सायन्स, राजकारण अशा विविध क्षेत्रांत पुढील शिक्षणाच्या / करिअरच्या संधी उपलब्ध होतात. यूपीएससी/ एमपीएससी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कला शाखा आदर्श शाखा आहे. यामुळे या स्पर्धा परीक्षांची तयारी पदवीपर्यंत शिक्षण घेताना करणे सहज शक्य होते. सायन्स; कॉमर्सच्या मानाने आर्ट्सला कमी वेळ अभ्यासासाठी व कॉलेजसाठी देणे पुरते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतर आयआयटीमध्ये शिक्षणाची संधी मिळते. आयआयटीमध्ये बारावीनंतर जायचे असल्यास फक्त शास्त्र शाखेचीच मुले जाऊ शकतात या सर्वसाधारण समजाला तडा देणारी एक संधी बारावीनंतर कला शाखेच्या विद्यार्थ्यांना आयआयटी मद्रासमध्ये उपलब्ध आहे.

मद्रास आयआयटीमधील ह्युमॅनिटीज व सोशल सायन्स विभागात बारावीनंतर पाच वर्षांचा इंटिग्रेटेड ‘एमए’चा कोर्स चालवला जातो. ज्यामध्ये विद्यार्थी इंग्रजी/डेव्हलपमेंट स्टडीज हा विषय घेऊन मास्टर्स डिग्री मिळवू शकतात. १९५९ साली स्थापन झालेल्या मद्रास आयआयटीमध्ये गेली अनेक वर्षे ह्युमॅनिटीज व सोशल सायन्स विभागामध्ये पीएचडी करण्याचीही सोय आहे. बारवीनंतरच्या या शिक्षणक्रमात  पहिली दोन वर्षे समान अभ्यासक्रम असतो ; तर पुढील तीन वर्षे इंग्रजी/डेव्हलपमेंट स्टडी या विषयात प्रावीण्य मिळवता येते. त्यानंतर या विद्यार्थ्यांना ॲकॅडिमिक्सपासून पत्रकारीतेपर्यंतच्या विविध क्षेत्रात उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. आयआयटी मद्रासमधील या शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी एक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेमध्ये दोन पेपर असतात.

पहिला पेपर अडीच तासांचा, संपूर्णपणे ऑब्जेक्टीव्ह स्वरूपाचा व कॉम्प्युटरवर  सोडवण्याचा असतो. ज्यामध्ये इंग्रजी व कॉम्प्रिहेन्शन कौशल्य, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, सामान्यज्ञान, पर्यावरण या विषयांवर प्रश्न असतात. दुसरा पेपर अर्ध्या तासाचा लेखी पेपर असतो. त्यामध्ये सामान्यज्ञान व ताज्या घडामोडी यावर निबंध लिहावा लागतो.

बारावी उत्तीर्ण किंवा बारावीला बसलेले विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. यंदा ही परीक्षा १३ जूनला होणार आहे; त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ मार्च आहे. अधिक माहितीसाठी hsee.iitm.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Edited By - Prashant Patil