esakal | संधी करिअरच्या... : अभियांत्रिकीच्या ‘हटके शाखा’
sakal

बोलून बातमी शोधा

Career Opportunity

संधी करिअरच्या... : अभियांत्रिकीच्या ‘हटके शाखा’

sakal_logo
By
विवेक वेलणकर

बारावीनंतर अभियांत्रिकी क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बहुप्रतिक्षित सीईटी परीक्षा अखेर सुरू झाली आहे. या परीक्षेच्या निकालानंतर अभियांत्रिकी प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू होईल. यावेळी अभियांत्रिकी शाखा निवडताना विद्यार्थ्यांना सामान्यतः मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कॉम्प्युटर आणि आयटी याच शाखा माहिती असतात, मात्र आजमितीला महाराष्ट्रात अभियांत्रिकीच्या सत्तर शाखा उपलब्ध आहेत! यातील काही शाखा तर अगदी कमी महाविद्यालयांत उपलब्ध असतात, मात्र त्या शाखांमध्ये उत्तम रोजगार संधी उपलब्ध आहेत. अशा काही शाखांची ओळख करून घेऊयात.

पेट्रोलियम इंजिनिअरिंग

आज पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस मानवी जीवनात अत्यावश्यक म्हणून गणल्या जातात. क्रूड ऑइलपासून या सर्वांची निर्मिती होते व त्याच्या साठ्यांच्या संशोधनापासून क्रूड ऑइल भूगर्भातून बाहेर काढून रिफायनिंगला नेईपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश पेट्रोलियम इंजिनिअरिंग या शाखेत होतो. पेट्रोलियम इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना भूविज्ञान, ड्रिलिंग, उत्पादन अभियांत्रिकी, पाईपिंग अभियांत्रिकी याबरोबरच संगणक शास्त्र, पुरवठा साखळी व्यवस्थापन, अर्थशास्त्र या विषयांचेही अध्यापन करावे लागते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक सरकारी व खासगी आस्थापनांमध्ये भारतात व परदेशात करिअरच्या संधी मिळतातच, त्याशिवाय उच्च शिक्षणाच्याही उत्तम संधी भारतात व परदेशात उपलब्ध असतात. इलेक्ट्रीक वाहनांचे प्रमाण येत्या काही वर्षांत वाढणार असले, तरी त्याला अनेक मर्यादा असल्याने जगभरातील पेट्रोलियम पदार्थांचा वापर अजून काही दशके तरी फारसा कमी होण्याची शक्यता नसल्याने या क्षेत्रात दर्जेदार मनुष्यबळाची गरज कायम राहणार आहे.

एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग

वातावरण बदल हा जागतिक पातळीवर चर्चेचा व चिंतेचा विषय बनला आहे. हवा, पाणी व जमीन यांचे प्रदूषण नियंत्रणासाठी जगभरातच मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. या तंत्रज्ञानाचा अभ्यास एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या शाखेत विद्यार्थी करतात. सांडपाणी शुद्धीकरण, हवा व आवाजाचे प्रदूषण नियंत्रण, घनकचरा व धोकादायक कचऱ्यावर प्रक्रिया, औद्योगिक सुरक्षा, रिन्युएबल एनर्जी, एन्व्हायरमेंटल जिओटेक्नॉलॉजी, ग्रीन बिल्डींग उभारणी, प्रदूषण नियंत्रण कायदे यांसारख्या अनेक विषयांबरोबरच सिव्हिल इंजिनिअरिंगमधील हायड्रॉलिक्स, बिल्डींग प्लॅनिंग व डिझायनिंगसह अनेक विषयांचा अभ्यास विद्यार्थी या शाखेत करतात. या शाखेतून पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना सरकारी, निमसरकारी तसेच आघाडीच्या खासगी उद्योगांमध्ये संधी उपलब्ध होतातच, शिवाय मोठ्या सल्ला सेवा संस्था तसेच संशोधन संस्थांमध्येही करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध होतात. विद्यार्थी उद्योजकही बनू शकतात. वातावरण बदलाचे दुष्परिणाम वाढत असल्याने यापुढील काळात या क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी जगभरात वाढतच जातील, यात शंकाच नाही.

प्रिंटिंग टेक्नॉलॉजी

प्रिंटिंग इंडस्ट्री ही देशातील एक आघाडीची इंडस्ट्री आहे. पुस्तके, वर्तमानपत्रे येथपासून अगदी पॅकेजिंग लेबलपर्यंत आजच्या संगणक युगातही प्रिंटेड कागद ही गरज आहे. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी या शाखेत विद्यार्थी प्रिंटिंग प्रोसेस, प्रिंटिंग मटेरिअल याबरोबरच संगणकशास्त्र, केमिकल इंजिनिअरिंग , मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट या विषयांचाही अभ्यास करतात. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक सरकारी व टेट्रापॅकपासून झेरॉक्सपर्यंतच्या मोठ्या खासगी आस्थापनांमध्ये, तसेच मोठ्या पब्लिशिंग हाउसमध्ये करिअरच्या संधी मिळतातच, त्याशिवाय उच्च शिक्षणाच्याही उत्तम संधी भारतात व अमेरिका, कॅनडा, जर्मनी या देशांत मिळतात. याशिवाय विद्यार्थ्यांना डिझायनिंग, पॅकेजिंग, डिजिटल प्रिंटिंग, वेब डिझायनिंग, ॲडव्हरटायझिंग या क्षेत्रांमध्ये स्वयंरोजगाराच्याही संधी उपलब्ध होतात. पेपरलेस जमान्यात प्रिंटिंगची गरज उरणार नाही, या समजाला खोटे ठरवून प्रिंटिंग इंडस्ट्री वेगाने वाढत आहे. हे पाहता यातील निष्णात मनुष्यबळाची गरज वाढतच जाणार आहे, हे नक्कीच.

loading image
go to top