
YCMOU : मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सोनवणे
पुणे : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी संबधीचा अध्यादेश गुरूवारी रात्री जारी केला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी प्र- कुलगुरू असलेले डॉ. सोनवणे यांच्याकडे आता राज्यभर विस्तार असलेल्या विद्यापीठाची जबाबदारी आली आहे. शिक्षणाची 'ज्ञानगंगा घरोघरी' या ब्रीदवाक्यानुसार दूरस्थ व मुक्त शिक्षणातून वंचित, उपेक्षितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून केले जाते आहे.
प्रा.डॉ.ई. वायुनंदन यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा प्रभारी पदभार राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांतकुमार पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता. कुलगुरु निवड प्रक्रियेतील बदलासाठी तत्कालीन महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरु असल्याने निवड प्रक्रिया ठप्प झालेली होती. दरम्यानच्या कालावधीत देशभरातील विद्यापीठांत कुलगुरु निवड प्रक्रियेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकालानंतर मुक्त विद्यापीठाच्या निवड समितीकडून पुन्हा प्रक्रिया हाती घेतली होती.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांचे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने पुनर्रचना करण्यात येईल. तसेच ते अधिक रोजगार अभिमुख करत आधुनिक तंत्रज्ञनाद्वारे ते गरजू पर्यंत पोचविण्यात येईल.
- डॉ. संजीव सोनवणे, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ