वृत्तपत्रांमध्ये बांधलेले खाद्यपदार्थ विषारी 

सोमवार, 12 डिसेंबर 2016

वृत्तपत्रांमध्ये बांधलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यास कर्करोगाशी निगडित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वृत्तपत्रांचा वापर खाद्यपदार्थ बांधण्यासाठी, गुंडाळण्यासाठी आणि त्यावरील तेल शोषण्यासाठी करू नये.  - भारतीय अन्न व मानके प्राधिकरण (एफएसएसएआय)

नवी दिल्ली(पीटीआय) : रस्त्यावरील विक्रेते खाद्यपदार्थ बांधून देण्यासाठी वृत्तपत्रांचा सर्रास वापर करतात मात्र, हे आरोग्यासाठी हानीकारक आहे. वृत्तपत्रात बांधलेले खाद्यपदार्थ विषारी होत असून, त्यात कर्करोगाला कारणीभूत ठरणारे घटक निर्माण होत आहेत, असा इशारा भारतीय अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) दिला आहे. 

वृत्तपत्रांमध्ये खाद्यपदार्थ बांधून देण्यास मनाई करण्याबाबत मार्गर्शक सूचना जाहीर करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी दिले होते. त्यानुसार "एफएसएसएआय'ने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यात म्हटले आहे, की वृत्तपत्रांमध्ये खाद्यपदार्थ बांधणे अनारोग्यकारक असून, असे खाद्यपदार्थ खाणे प्रकृतीसाठी धोकायदायक आहे. हे खाद्यपदार्थ स्वच्छतेचे निकष पाळून बनविले असले तरी हा धोका कमी होत नाही. 

वृत्तपत्रांतील शाईमुळे अन्नपदार्थ दूषित होत असून, त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या शाईत अनेक हानीकारक जैविक पदार्थ असून, त्यांचे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहेत. या शाईमध्ये हानीकारक रंग, पिंगमेंट, बाईंडर्स, ऍडिटीव्हज्‌ आणि प्रिझर्व्हेटिव्ह आहेत. वृत्तपत्रांच्या कागदामध्ये असलेले जैविक घटकही आरोग्याला अपायकारक आहेत. कागदाचा पुनर्वापर करून तयार केलेली वृत्तपत्रे आणि कागद अथवा काडबोर्ड बॉक्‍समध्ये धातू, खनिज तेल आणि विषारी रसायने आढळतात. यामुळे पचनाच्या समस्येसोबत विषबाधाही होऊ शकते, असे "एफएसएसएआय'ने म्हटले आहे. 

खाद्यपदार्थ बांधण्यासाठी वृत्तपत्रांचा वापर तातडीने थांबविण्याची गरज आहे. याबाबत जनतेसोबत व्यावसायिकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्‍यकता आहे. विशेषत: असंघटित क्षेत्रातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना याबाबत सूचना करायला हव्यात. वृत्तपत्रांचा खाद्यपदार्थ बांधून देण्यासाठी होणारा वापर थांबावा यासाठी पावले उचलायला हवीत, असे असे एफएसएसएआयने नमूद केले आहे. 
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्नसुरक्षा आयुक्तांनी वृत्तपत्रांतून खाद्यपदार्थ बांधून दिल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करावी आणि हा वापर थांबविण्यासाठी योग्य पावले उचलावीत, असे निर्देश एफएसएसएआयने दिले आहेत. 

वृत्तपत्रांमध्ये बांधलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यास कर्करोगाशी निगडित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वृत्तपत्रांचा वापर खाद्यपदार्थ बांधण्यासाठी, गुंडाळण्यासाठी आणि त्यावरील तेल शोषण्यासाठी करू नये. 
- भारतीय अन्न व मानके प्राधिकरण (एफएसएसएआय)