ॲलर्जिक त्वचाविकार Allergic skin disorders Dr. Malvika tambe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ॲलर्जिक त्वचाविकार

ॲलर्जिक त्वचाविकार

डॉ. मालविका तांबे

काल रात्री रमेश त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या परिवाराबरोबर चायनीज हॉटोलमध्ये जेवायला गेला होता. रात्री अडीच-तीनच्या सुमारास त्याच्या अंगाचा दाह होऊन खाज सुटायला लागली. बघता बघता अंगावर लाल ददोडे यायला लागले, नखाने खाजविल्यास वेगाने वाढायला लागले.

काय झाले हे त्याला समजेना. बर्फ आणून लावते म्हणजे अंगाचा दाह कमी होईल असे पत्नी म्हणाली व तसे केले. पण त्याला काही बरे वाटेना. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांकडे गेल्यावर कसली तरी ॲलर्जी असेल असे निदान करून गोळी दिली. त्यानंतर बाहेर गेल्यावर अशा प्रकारचा त्रास रमेशला वरचेवर व्हायला लागला. असा अनुभव कार्ल्याला येणाऱ्या कित्येकांचा असतो.

ॲलर्जीची कारणे चुकीचा आहार, सूर्यप्रकाश, जीवाणू वगैरे आढळतात. सध्याच्या काळात तर नवजात बालकांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत अशा प्रकारचे ॲलर्जीचे त्रास होताना दिसतात. नवजात बालकांचे आईवडील तर म्हणतात की अहो, तो अजून आईच्या दुधाशिवाय काही पीतसुद्धा नाही, त्याला कसली ॲलर्जी? पण जसे जसे आपले आयुष्य आधुनिकतेकडे वळत आहे, तसे आपल्या आजूबाजूला प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे,

आपल्या आहारामध्ये कळत-नकळत होणारा रासायनिक द्रव्यांचा वाढता वापर, मागचा पुढचा विचार न करता औषधांचा केला जाणारा वापर, रात्रीचे जागरण, सकाळी उशिरा उठणे, व्यायामाचा अभाव वगैरे चुकीच्या दैनंदिन सवयींमुळे सगळ्यांचीच प्रतिकारशक्ती कमी होत चाललेली आहे. या सगळ्यांमुळे आज ॲलर्जीचे त्रास वाढत चाललेले आहेत. सुरुवातीला अशा प्रकारे पित्ताचा वा ॲलर्जीचा त्रास झाला तर औषध घेतल्यावर ८-१५ दिवस परत त्रास होत नाही.

काही वर्षांत हळू हळू औषधांचा परिणाम कमी व्हायला लागतो आणि दिवसातून २-३ गोळ्या घेऊनही त्रास कमी होत नाही अशी तक्रार कार्ला येथे येणारे करताना दिसतात. म्हणूनच रोगाची सुरुवात झाली की लगेचच योग्य उपचार न करता केवळ लक्षणे दाबण्याचा प्रयत्न केला तर त्रास बळावत जातात.

आयुर्वेदाच्या मताने विचार केला तर शरीरातील प्रकुपित पित्ताला वाताची व कफाची जोड मिळाली तर रक्तधातूमध्ये अशुद्धी तयार करून संपूर्ण शरीरात पसरते व अशा प्रकारे पित्ताच्या गांधी शरीरावर उठायला सुरुवात होते. आयुर्वेदिक दृष्ट्या कारणाचा विचार केला तर आहारात केलेल्या चुका सर्वांत महत्त्वपूर्ण ठरतात. विरुद्ध गुणधर्माचा घेतलेला आहार त्वचेचे विकार मोठ्या प्रमाणावर वाढवत असतो.

उदा. मांसाहार वा फळे दुधाबरोबर घेतल्यास ॲलर्जी होण्याची शक्यता वाढते. भूक नसताना जेवणे किंवा भूक लागलेली असताना न जेवणे हेही शरीरातील पित्तदोष वाढवायला मदत करत असते. मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते घालून उत्पादित केलेल्या फ्लॉवर व कोबीसारख्या भाज्या आहारात असणे,

अंडी खाणे, चीजच्या नावाखाली प्रोसेस्ड चीज खाणे, ढोबळी मिरची, खूप प्रमाणात आंबवलेले पदार्थ, मश्रूम वगैरे अति प्रमाणात खाणे, तसेच तिखट, आंबट वातळलेले पदार्थ फार प्रमाणात खाणे, प्रोसेस्ड गोष्टी, डबाबंद वा फ्रोजन पदार्थ किंवा रासायनिक उपचार केलेल्या गोष्टी खाणे वगैरेंमुळे ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो.

बाहेर जाऊन सध्या रूढ झालेली चमचमीत व मसालेदार पदार्थ खाण्याची पद्धतही टाळलेलीच बरी. ॲलर्जिक खाज आली की प्रयोगशाळेत तपासून घेऊन कुठल्या पदार्थांची ॲलर्जी आहे हे याची यादी माहीत करून घेण्याची पद्धत रूढ होते आहे, व लोक त्या गोष्टी आवर्जून टाळतात असेही दिसते.

मध्यंतरी माझ्याकडे दिल्लीहून दीड-पावणेदोन वर्षाची मुलगी एक रुग्ण आलेली होती. तिच्या अंगाला भरपूर खाज येत होती.ॲलर्जीची तपासणी केली असता भात, दूध, डाळ अनेक गोष्टी तिला ॲलर्जिक आहेत असे सांगण्यात आले. ही यादी पाहून तिचे आई-वडील हवालदिल झालेले. तिलाखायला काय द्यावे असा मोठा प्रश्र्न त्यांच्यापुढे उभा होता.

अशा वेळी अन्नविशेष ॲलर्जीचा विचार न करता शरीरात पित्ताचा अशा प्रकाराचा प्रतिसाद देते आहे याचा विचार करून औषधांची उपायोजना केली. काही छोट्या छोट्या थेरपी त्यांना समजावून सांगितल्या. आश्र्चर्याची गोष्ट म्हणजे मुलगी ३-४ महिन्यांत बऱ्याचशा गोष्टी खाऊ शकली, साधारण सहा महिन्यांत तिचा ॲलर्जीचा त्रास पूर्णपणे बरा झाला.

तिला अन्नापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला असता पण पित्तावर काम केले नसते तर कदाचित ती मुलगी जन्मभर चांगल्या आहारपदार्थांपासून वंचित राहिली असती. आहारानंतर विचार करावा लागतो तो औषधांचा. शरीरातील पित्त कमी करण्याकरतामंजिष्ठा, अनंत, कडुनिंब, चंदन वाळा, हळद वगैरेंपासून त्वचेसाठी बनविलेले निरनिराळे आयुर्वेदिक योग घेता येतात.

कामदुधा, प्रवाळपंचामृत, मोती भस्म, संतुलन पित्तशांती वगैरे औषधे मदत करताना दिसतात. अन्न-औषधाच्या स्वरूपात असलेला चांगल्या प्रतीच्या देशी गुलाबांपासून व खडीसाखरेपासून तयार केलेला संतुलनचा प्रवाळ- वेलचीयुक्त गुलकंद अशा प्रकारच्या त्रासावर मदत करू शकतो.

पचन सुधरवण्याच्या दृष्टीने व एकूणच पित्त कमी होण्याकरता संतुलन अविपत्तिकर चूर्ण, सॅनकूल चूर्ण नियमित घेतलेले बरे. अशा प्रकारच्या त्रासामध्ये संतुलन केंद्रात जेव्हा शास्त्रोक्त पंचकर्म अर्थात शरीराची शुद्धी करतो तेव्हा खूप चांगले परिणाम मिळालेले दिसतात. पंचकर्मात शरीरशुद्धीनंतर व्यवस्थित औषधोपचार घेतला तर अशा प्रकारचे त्रास संपूर्णपणे बरे झालेले दिसतात.

या त्रासावर घरच्या घरी करता येण्यासारखे उपाय म्हणजे स्वयंपाकामध्ये आमसुलाचा उपयोग नक्की करावा, यामुळे शरीरातील पित्त कमी व्हायला मदत मिळते. तसेच आमसूल पाण्यात भिजवून, कोळून, त्याचे पाणी स्नानाच्या वेळी अंगावर लावावे किंवा जेथे पित्तानेगांधी उठलेल्या ठिकाणी लावावे.

यामुळे गांधी कमी व्हायला मदत मिळते.खऱ्या दूर्वा वाटून केलेला कल्क पित्तानेगांधी उठलेल्या ठिकाणी लावावे.घरगुती तुपात चांगल्या प्रतीची हळद मिसळून लावल्यास अशा खाजेवर उपयोग होताना दिसतो.संतुलन पादाभ्यंग घृत किंवा शतधौतघृत किंवा वनस्पतींनी शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केलेले तूप लावल्याचा उपयोग होतो. कडुनिंबाची ताजी पाने पाण्यात उकळावे, हे पाणी स्नानाकरता घेणे फायद्याचे ठरते.

खूप गरम पाण्याने स्नान करणे टाळावे. कडुनिंबाच्या पानांचे चूर्ण व आवळ्याचे चूर्ण तुपात मिसळून त्वचेवर लावल्यास फायदा होताना दिसतो. शक्य झाल्यास १०-१५ दिवसांनीगवती चहा किंवा आल्याच्या चहाबरोबर एरंडेल घेतल्यास २-३ महिन्यांत चांगला फायदा दिसू लागतो.

पित्ताच्या आजारापासून दूर राहायचे असल्यास अति खारट, अति तिखट, अति कडू तसेच खूप जास्त प्रमाणात आंबवलेले अन्न वर्ज्य करावे. मसाल्यांतील अति प्रमाणात मोहरी, हिंग, काळी मिरी, हिरवी मिरची टाळणे बरे. पंखा किंवा एसीत सतत बसणे टाळावे, जेणेकरून त्वचा कोरडी होणार नाही. दिवसा झोप शक्यतो टाळलेलीच बरी. अशा प्रकारे आहार, आचरण, औषधे, उपचार व पंचकर्म यांची मदत घेतल्यास पित्तज त्वचाविकारांपासून लांब राहायला मदत मिळू शकेल.

टॅग्स :doctorayurveda