esakal | अन्नपानविधी - फळवर्ग 
sakal

बोलून बातमी शोधा

Annapaanvidhi phalvarga

अन्नपानविधी - फळवर्ग 

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे

द्राक्षे ही फलोत्तम म्हणजे सर्वोत्तम फळ. द्राक्षे जगभरात सर्वत्र मिळतात. बीज नसलेल्या द्राक्षांपेक्षा सबीज द्राक्षे अधिक पोषक असतात. काळी द्राक्षे वाळवून केलेल्या मनुकाही औषधी गुणांनी परिपूर्ण असतात. 

शाकवर्गातील परिचयाच्या असणाऱ्या फळभाज्या व पालेभाज्यांची आपण माहिती घेतली. आज आपण फळवर्गातील विविध फळांची आयुर्वेदिक दृष्टिकोनातून माहिती करून घेणार आहोत. 

आयुर्वेदात द्राक्षे ही फलोत्तम म्हणजे सर्वोत्तम फळ म्हणून सांगितलेली आहेत. द्राक्षे जगभरात सर्वत्र मिळतात. बीज नसलेल्या द्राक्षांपेक्षा सबीज द्राक्षे अधिक पोषक असतात. 

पक्वं द्राक्षाफलं स्वर्यं मधुरं तृप्तिकारकम्‌ । 
पाके स्निग्धं चातिरुच्यं चक्षुष्यं मूत्रलं गुरु ।। 
तुवरं च सरं चाम्लं वृष्यं शीतं श्रमापहम्‌ । 
पित्तं श्वासं च कासं च छर्दिं शोथं भ्रमं ज्वरम्‌ दाहं मदात्ययं वातं वातपित्तं क्षतक्षयम्‌ ।
 
....निघण्टु रत्नाकर 
पिकलेली द्राक्षे चवीला गोड, किंचित आंबट व तुरट असतात, वीर्याने शीत असतात, चवीला रुचकर असतात, स्वर सुधारतात, तृप्तीकर असतात, गुणाने स्निग्ध असतात, थकवा खोकला, उलटी, ताप, चक्कर, दाह, क्षय, सूज वगैरे रोगात हितकर असतात. 

द्राक्षांच्या अर्धा कप रसात चमचाभर खडीसाखर व मध मिसळून घेतल्यास शक्‍ती वाढण्यास मदत मिळते. शुक्रधातू अशक्‍त झाल्याने पाय दुखणे, उत्साह न वाटणे, थकला जाणवणे वगैरे लक्षणे दिसत असली तर हा उपाय करून पाहावा. ज्यांना द्राक्षे खाल्ल्यानंतर घशात खवखवते किंवा सर्दी होते त्यांनी यातच चिमूटभर सुंठ, मिरी, पिंपळीचे मिश्रण टाकून घेणे चांगले. 

तोंडाला चव नसणे, भूक न लागणे, वारंवार कोरड पडणे वगैरे तक्रारींवर चार चमचे द्राक्षांचा रस त्यात चमचाभर खडीसाखर, चिमूटभर जिऱ्याची पूड व चवीनुसार सैंधव मिसळून थोडे थोडे घेण्याने बरे वाचते. 

लघवीला अडखळत होत असली, हातापायांचा दाह होत असला तर द्राक्षांच्या पाव कप रसात बडिशेपेचे अर्धा चमचा चूर्ण मिसळून घेण्याचा उपयोग होतो. 

गर्भारपणात काही खावेसे वाटत नाही, मळमळते, तोंडाला पाणी सुटते अशा वेळी द्राक्षे कापावीत, त्यावर काळी मिरीची पूड, सैंधव मीठ व थोडी खडीसाखरेची पूड भुरभुरावी. पाच-दहा मिनिटे झाकून ठेवावे व नंतर चवीने खावे म्हणजे बरे वाटते. 

काळ्या मनुका 
काळी द्राक्षे वाळली की त्याला मनुका म्हणतात. मनुका औषधी गुणांनी परिपूर्ण असतात. पोट साफ होण्यासाठी, पित्तदोष कमी करण्यासाठी, तसेच शक्‍ती वाढण्यासाठी काळ्या मनुका उत्तम असतात. 


पोट साफ होत नसेल तर मूठभर मनुका पाण्यात भिजत घालून त्या फुगल्या की नीट कोळून घेऊन ते पाणी पिण्याचा उपयोग होतो. अगदी लहान बालकालाही हा उपाय लागू पडतो. फक्‍त बालकाच्या मुठीच्या प्रमाणात मनुका घ्याव्यात. 

वारंवार पित्त होत असेल, पोटात आग होऊन दुखत असेल, आंबट उलट्या होण्याची प्रवृत्ती असेल त्यांनी मूठभर मनुका व चमचाभर कुटलेली बडीशेप कपभर पाण्यात भिजत घालावी. सकाळी कोळून व गाळून घेऊन त्यात चमचाभर खडीसाखर मिसळून पिण्याचा उपयोग होतो. 

शक्‍ती वाढण्यासाठी, वजन वाढण्यासाठी काळ्या मनुका उत्तम असतात. रात्री झोपण्यापूर्वी मनुका खाऊन वरून पाणी पिण्याने हळूहळू वजन वाढते. 

तोंडाला चव नसेल, खाण्याची इच्छा नसेल, पोटही साफ होत नसेल अशा वेळी मनुका तुपावर परतून घेऊन त्यावर चवीपुरते सैंधव व जिऱ्याची पूड भुरभुरावी व खावे. 

कोणत्याही प्रकारची उलटी असेल तरी त्यावर मनुका व साळीच्या लाह्यांपासून तयार केलेले खालील चाटण उपयोगी पडते. दहा ग्रॅम मनुका व दहा ग्रॅम साळीच्या लाह्या शंभर ग्रॅम पाण्यात भिजत घालाव्यात. दोन तासांनंतर हे सर्व मिश्रण कुस्करून गाळून घ्यावे. त्यात खडीसाखर, मध व घरी बनविलेले साजूक तूप प्रत्येकी पाच-पाच ग्रॅम मिसळावे व तयार झालेले मिश्रण थोडे थोडे चाटवावे.