अन्नपानविधी- शाकवर्ग 

Annapaanvidhi Shakvarga
Annapaanvidhi Shakvarga

अतिरिक्‍त मेद कमी करत असल्याने तोंडलीचे सूप संध्याकाळच्या जेवणात घेणे पथ्यकर असते. तर, कारल्याचा रस त्वचारोगांवर उत्तम असतो. विशेषतः ओलसर त्वचारोग असल्यास कारल्याचा रस आणि हळद एकत्र करून बाधित त्वचेवर हलक्‍या हाताने जिरवले तर गुण येतो. 

मागच्या वेळी आपण पडवळ या भाजीची माहिती, तिची उपयुक्‍तता याची माहिती घेतली. आज तोंडली व कारले या भाज्यांचे गुणधर्म जाणून घेऊया. 

तोंडली 
तोंडलीची वेल असते. कोवळी तोंडली हिरवी असते. नुसतीसुद्धा खाता येते. मात्र जून तोंडली आतून लाल असते, अशी तोंडली भाजीसाठी न वापरणे चांगले. तोंडली दोन प्रकारची असते, गोड व कडू. गोड तोंडली भाजीसाठी वापरतात, कडू तोंडलीचा औषधात वापर होतो. बाराही महिने मिळणाऱ्या भाज्यांपैकी ही एक भाजी होय. 
बिम्बीफलं स्वादू शीतं गुरु पित्तास्रवातजित्‌ । 
स्तम्भनं लेखनं रुच्यं विबन्धाध्मानकारकम्‌ ।। 
...भावप्रकाश 
- तोंडली चवीला स्वादिष्ट, शीत वीर्याची व पचायला जड असतात, मात्र पित्तदोष व कफदोष कमी करते, अतिरिक्‍त चरबी कमी करते, रुचकर असते, मात्र थोड्या प्रमाणात गॅसेस व मलावष्टंभ करू शकते. 

- तोंडली थोड्या प्रमाणात गॅसेस व मलावष्टंभ करत असल्याने भाजी करताना जिरे, हिंग, हळद वगैरे मसाल्याचे पदार्थ योग्य प्रमाणात वापरणे चांगले असते. 

- जुलाब होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांसाठी तोंडली ही पथ्याची भाजी होय. कोवळी तोंडली घेऊन तुपामध्ये आले, जिरे, कोथिंबीर, हळद, धणे वगैरेंची फोडणी करून तयार केलेली भाजी मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते. 

- बाळंतपणानंतर स्तन्य पुरेशा प्रमाणात तयार व्हावे, यासाठी तोंडली उकडून आहारात समाविष्ट करण्याचा उपयोग होतो. 

- अतिरिक्‍त मेद कमी करत असल्याने तोंडलीचे सूप संध्याकाळच्या जेवणात घेणे पथ्यकर असते. तोंडली, पडवळ व मूग यांचे एकत्रित सूप केले तरी चालते. 

- कोवळ्या तोंडल्यांची तूप, जिरे व चवीनुसार सैंधव टाकून केलेली भाजी पित्तविकारात पथ्यकर असते. 

- काविळीमध्ये भूक लागू लागली की नंतर जो पथ्यकर आहार घ्यायचा असतो, त्यात तोंडलीच्या भाजीचा समावेश होतो. 

कारले 
कडू चवीची भाजी म्हणून कारली प्रसिद्ध आहेत. सध्या मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याने कारल्याच्या भाजीचा खपही वाढलेला दिसतो. मात्र, मधुमेह आहे म्हणजे रोज कारल्याचा रस पिणे, कारल्याची भाजी खाणे, असा अतिरेक न करणे चांगले कारण यामुळे कडू रसाचा अतियोग होऊन उलट मधुमेहात नुकसान होऊ शकते.

सर्वसामान्यांनी आठवड्यातून एकदा व मधुमेह असणाऱ्यांनी आठवड्यातून दोनदा या प्रमाणात कारल्याची भाजी खायला हरकत नसावी. 

कारवेल्लं हिमं भेदि लघु तिक्‍तामवातलम्‌ । 
ज्वरपित्तकफास्रघ्नं पाण्डुमेहकृमीन्‌ हरेत्‌ ।।
 
...भावप्रकाश 
- कारले वीर्याने शीत असते, मलाचे भेदन करते, पचायला हलके व चवीला कडू असते, पित्तदोष व कफदोष कमी करते, रक्‍तदोष कमी करते, योग्य प्रमाणात घेतल्यास पांडुरोग, प्रमेह व कृमिरोगात हितकर असते. 

- मूळव्याधीमुळे शौचासह रक्‍त पडत असेल तर कारल्याच्या पानांचा रस किंवा कारल्याच्या फळाचा रस चमचाभर प्रमाणात साखरेसह देण्याचा उपयोग होतो. आठ-दहा दिवसांत रस पडायचे न थांबल्यास मात्र वैद्यांचा सल्ला घेणे आवश्‍यक. 

- वारंवार जंत होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी किंवा फार प्रवास करावा लागणाऱ्यांनी चार दिवस सलग कारल्याचा रस दोन-दोन चमचे या प्रमाणात घेऊन नंतर एरंडेलाचा जुलाब घेणे चांगले असते. यामुळे जंत पडून जातात. 

- कारल्याच्या फळांचा रस त्वचारोगांवर उत्तम असतो. विशेषतः ओलसर त्वचारोग असल्यास कारल्याचा रस आणि हळद एकत्र करून बाधित त्वचेवर हलक्‍या हाताने जिरवले तर गुण येतो. 

- वारंवार लघवी होत असली, लघवीनंतर थकवा जाणवत असला तर कारल्याची भाजी पथ्यकर समजावी. 

- पित्त वाढले असल्यास कारल्याच्या पानांचा रस घेण्याची पद्धत आहे. यामुळे उलटी होईल वा जुलाब होतील व पित्त पडून जाऊन बरे वाटेल. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com