अन्नपानविधी- शाकवर्ग 

Annapaanvidhi Shakvarga
Annapaanvidhi Shakvarga

जखम लवकर भरून न येणे हे रक्‍त अशुद्ध असल्याचे एक लक्षण असते. मधुमेही व्यक्‍तींमध्ये क्‍लेद म्हणजे अवाजवी पाणी साठून राहण्याची प्रवृत्ती असते. या सर्वांमध्ये घोसाळ्याची भाजी पथ्यकर असते. घोसाळ्याचे बी बारीक करून तुपात मिसळून जखमेवर लेपाप्रमाणे लावले तर जखम भरून येणे सोपे होते. बियांचे चूर्ण अंगाला चोळून लावले तर त्वचेवरचा चिकटपणा कमी होतो, अतिरिक्‍त चरबी कमी होण्यासही मदत मिळते. 
 

मागच्या वेळी आपण कोहळा या भाजीचे आयुर्वेदातील गुणधर्म व उपयोग पाहिले. आज आपण घोसाळे या भाजीची माहिती घेऊ या. 
घोसाळी व दोडकी या दोन्ही भाज्या पथ्यकर असल्या तरी विशेष आवडीने खाल्ल्या जात नाहीत. अनेकांना तर घोसाळी व दोडकी यातील फरकही माहीत नसतो. मुळात या दोन्ही भाज्या वेलीवर येतात. वेलीला अगोदर पिवळ्या रंगाचे फूल येते व नंतर फळे धरतात. घोसाळे निमुळत्या काकडीसारखे असते, पण रंगाने हिरवे असते. दोडकेसुद्धा रंगाने हिरवे असते, मात्र दोडक्‍याला शिरा-कडा असतात. 
घोसाळीला आयुर्वेदात कोशातकी म्हणतात, 

प्रोक्‍ता कोशातकी स्निग्धा वृष्या च मधुरामता 
कृम्याध्मानकरी तिक्‍ता व्रणरोपणकारिणी ।। 
सरा कफकरी गुर्वी बल्या चैव प्रकीर्तिता । 
वातपित्तज्वरहरा मुनिभिः परिकीर्तिता ।। 

...निघण्टु रत्नाकर 

घोसाळी चवीने मधुुर, थोडी कडू व गुणांनी स्निग्ध असते, शुक्रधातुपोषक असते, जखम भरून येण्यास मदत करते, सारक गुणाची, पचायला जड व कफकारक असते व वात-पित्तदोषांचे शमन करते, ज्वरात हितकारक असते. 

मुतखडा होण्याची सवय असणाऱ्यांसाठी घोसाळी पथ्यकर असते. लघवीतून खर जात असली, लघवीचा रंग पिवळसर असला तर घोसाळ्याची भाजी आहारात ठेवणे चांगले होय. भाजी करताना त्यात धणे पूड, जिरे पूड, हळद वगैरे टाकले तर भाजी रुचकर तर होतेच, पण अधिक गुणकारीही ठरते. 

अंगात कसकस वाटत असली, जिभेवर पांढरा थर येत असला, तोंडाला चव नसली, अस्वस्थ वाटत असले तर घोसाळ्याची भाजी व भाकरी भूक असेल त्या प्रमाणात खाण्याचा उपयोग होतो. 

ज्यांना सकाळी उठल्यावर आपणहून मलप्रवृत्तीचा वेग येत नाही, पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यांनी रात्रीच्या जेवणात घोसाळीची भाजी घेणे उपयोगी असते. 
लहान मुलांना खोकला होतो त्यावर किंवा खोकून खोकून छाती दुखत असेल त्यावर घोसाळे निखाऱ्यावर भाजून त्यात थोडा हिंग, ओवा, हळद वगैरे टाकून तयार केलेले भरीत खाण्याचा उपयोग होतो. 

लघवीला कमी झाल्याने सकाळी चेहऱ्यावर सूज येत असेल किंवा पायावर टापसा जाणवत असेल तर घोसाळीची भाजी किंवा घोसाळीचे सूप घेण्याचा उपयोग होतो. 

उष्ण प्रकृतीच्या व्यक्‍तींसाठी तर घोसाळी पथ्यकर असतेच, पण उन्हाळ्यात किंवा शरद ऋतूत घोसाळ्याची भाजी नित्यनियमाने आहारात ठेवणे उत्तम. उन्हात किंवा अग्नीजवळ काम करावे लागणाऱ्यांनी, प्रखर प्रकाशात राहावे लागणाऱ्यांनाही घोसाळीचे भाजी नित्य सेवनात ठेवावी. 

पोट-आतड्यात अल्सर झाला असता फार कमी गोष्टी खाण्यास योग्य असतात. मात्र घोसाळे थंड गुणाचे असल्याने तिखट न टाकता जिरे, मीठ, धणे, हळद, कोकम वगैरे टाकून केलेली घोसाळ्याची भाजी भातासह किंवा ज्वारी वा तांदळाच्या भाकरीसह घेता येते. 

जखम लवकर भरून न येणे हे रक्‍त अशुद्ध असल्याचे एक लक्षण असते. मधुमेही व्यक्‍तींमध्ये क्‍लेद म्हणजे अवाजवी पाणी साठून राहण्याची प्रवृत्ती असते. या सर्वांमध्ये घोसाळ्याची भाजी पथ्यकर असते. घोसाळीचे बी बारीक करून तुपात मिसळून जखमेवर लेपाप्रमाणे लावले तर जखम भरून येणे सोपे होते. बियांचे चूर्ण अंगाला चोळून लावले तर त्वचेवरचा चिकटपणा कमी होतो, अतिरिक्‍त चरबी कमी होण्यासही मदत मिळते. 

आधुनिक विज्ञानानुसार या भाजीत सी व्हिटॅमिन, लोहतत्त्व, झिंक, मॅग्नेशियम वगैरे प्रचुर मात्रेत असतात, यात बीटा कॅरोटिन असल्याने दृष्टीसाठीही ही भाजी हितकर असते. 

तूप किंवा तेलामध्ये जिरे, हळद, धण्याची पूड, तिखट, मीठ आवडत असल्यास थोडा कांदा परतून घेऊन घोसाळीची रुचकर भाजी बनविता येते, वरून लिंबू पिळून खाल्ली तर अजूनच छान लागते. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com