अन्नपानविधी- शाकवर्ग 

Annapaanvidhi Shakvarga
Annapaanvidhi Shakvarga

टिंडा थंड तसेच पित्तनाशक असल्याने अग्नीजवळ काम करावे लागणाऱ्यांसाठी, उन्हात प्रवास करणाऱ्यांसाठी किंवा प्रखर प्रकाशात राहावे लागणाऱ्यांसाठी टिंड्याची भाजी हितकर असते. त्वचारोगात, वातरोगात, मूत्रमार्गात जंतुसंसर्ग होण्याची प्रवृत्ती असताना गवार खाणे टाळणे चांगले असते. 

पथ्यकर आहार हा औषधाच्या तोडीला तोड असतो. आपल्यासाठी अनुकूल काय, प्रतिकूल काय, आपल्याला कशाने बरे वाटते, कशाचा त्रास होतो हे समजले तर आरोग्य सांभाळणे सोपे होते. आयुर्वेदात तर याच्यापुढची पायरी गाठलेली दिसते. योग्य योजना केली तर आहारद्रव्येसुद्धा औषधाप्रमाणे उपयोगी पडतात हे आयुर्वेदात पदोपदी सांगितलेले दिसते. आपणही सध्या फळभाज्या आरोग्यासाठी कशा उपयोगी असतात हे पाहतो आहोत. मागच्या वेळी आपण भेंडीचे उपयोग पाहिले. आज आपण टिंडा व गवारीच्या शेंगा यांची माहिती घेऊ या. 

टिंडा 
टिंडा भाजी ढेमसे या नावानेही प्रचलित आहे. टिंडा ही भाजी उत्तर भारतात अधिक आवडीने खाल्ली जाते. टोमॅटोच्या आकाराची ही भाजी हिरव्या रंगाची असते. टिंड्याच्या आत बिया असतात, बियांसकट भाजी केली जाते. 
डिण्डिशो रुचिकृद्‌ भेदी पित्तश्‍लेष्मापहः स्मृतः । शीतलो वातकृत्‌ रुक्षो मूत्रलश्चाश्‍मरीहरः ।।...भावप्रकाश 
टिंडा ही एक पथ्यकर भाजी होय. टिंडा चवीला रुचकर असतो, पित्त तसेच कफदोषाचे शमन करतो, वीर्याने शीत असतो, रुक्ष गुणाचा असल्याने वात वाढवतो, मूत्रप्रवर्तनास मदत करतो व मूतखड्यामध्ये हितकर असतो. 
टिंडा थंड तसेच पित्तनाशक असल्याने अग्नीजवळ काम करावे लागणाऱ्यांसाठी, उन्हात प्रवास करणाऱ्यांसाठी किंवा प्रखर प्रकाशात राहावे लागणाऱ्यांसाठी टिंड्याची भाजी हितकर असते. तुपात टिंड्याचे काप परतून घेऊन त्यात जिरे, धणेपूड, लिंबू, चवीनुसार सैंधव मिसळून केलेली भाजी तांदळाच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसह घेण्याचा फायदा होतो. 

वारंवार मूतखडा होणाऱ्यांसाठी तर टिंडा ही औषधाप्रमाणे उपयोगी भाजी आहे. आठवड्यातून २-३ वेळा टिंड्याची भाजी खाण्याने व प्यायचे पाणी २० मिनिटांसाठी उकळून, गाळून घेतलेले असले तर पुन्हा पुन्हा मूतखडा होण्याची प्रवृत्ती नष्ट होते. 
मलावरोध होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी रात्रीच्या जेवणात टिंड्याची पातळ भाजी करून त्यात वरून १-२ चमचे तूप मिसळून घेण्याचा उपयोग होतो. 

तोंडाला रुची नसेल, तर भूक लागूनही अन्न जात नाही अशा वेळी टिंड्याची जिरे, हळद, आले, मिरी, कोकम व चवीनुसार मीठ टाकून बनविलेली भाजी खाण्याने जेवण जाते. 
लघवीला पिवळसर होत असली, जळजळ होत असली तर टिंडा व पडवळ या भाज्या शिजवून त्याचे मुगाच्या डाळीबरोबर सूप करून घेतले, चवीनुसार जिरे, धणे, कोथिंबीर, लिंबू, आल्याचा रस, मिरपूड वगैरे टाकलेले असेल, तर लगेच बरे वाटते. 

आधुनिक संशोधनानुसार टिंडा उच्चरक्‍तदाब, हृद्रोग, झटका वगैरे विकारांवर नियंत्रण ठेवणारा आहे, असे सिद्ध झालेले आहे. शरीरातील अतिरिक्‍त उष्णता मूत्रामार्गे बाहेर काढून टाकणारी ही भाजी पचनालाही मदत करते., पोट साफ होण्यासाठीही अनुकूल असते. तेव्हा आवडत नाही म्हणून या भाजीकडे दुर्लक्ष न करता ती वेगवेगळ्या रुपाने आहारात समाविष्ट करणे हे सर्वांच्या फायद्याचे होय. 

गवार 
गवारीच्या कोवळ्या शेंगांची भाजी करण्याची करण्याची पद्धत आहे. जून गवार सुकवून त्यातल्या बिया काढून त्या गुरांना घालण्याची पद्धत आहे. 
बाकुचीशिम्बिका रुक्षा वातला मधुरा गुरुः

सरा कफकारी चाग्निदीपनी पित्तनाशिनी ...निघण्टु रत्नाकर 
गवारीच्या शेंगा गुणाने रुक्ष तसेच पचायला जड असतात, चवीला गोड असल्या तरी वातदोष वाढवणाऱ्या असतात, सारक असतात, कफ वाढवितात. कोवळ्या असताना योग्य प्रमाणात खाल्ल्या असता अग्निदीपन करतात व पित्तदोष कमी करतात. 

गवारीच्या शेंगा जून झाल्या असता अधिकाधिक कोरडेपणा वाढवणाऱ्या होतात. त्वचारोगात, वातरोगात, मूत्रमार्गात जंतुसंसर्ग होण्याची प्रवृत्ती असताना गवार खाणे टाळणे चांगले. गरोदर स्त्रियांनी किंवा स्तन्यपान करविणाऱ्या स्त्रियांनी गवारीची भाजी खाऊ नये, असा वैद्याधार आहे. कारण त्यामुळे अपत्याला आकडीचा त्रास होण्याची शक्‍यता असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com