esakal | ​अन्नपानविध - शाकवर्ग 
sakal

बोलून बातमी शोधा

Annapaanvidhi Shakvarga

​अन्नपानविध - शाकवर्ग 

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे

पुनर्नवा हे एक उत्तम रसायन द्रव्य आहे. पावसाळ्यात जेव्हा पांढरा पुनर्नवा उपलब्ध असतो तेव्हा साठवून, वाळवून त्याचे चूर्ण करून ठेवून पुढे सहा महिने रोज एक चमचा प्रमाणात घेण्याने शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. 

आज आपण गुणकारी, परंतु भाजी म्हणून फारशा प्रमाणात प्रचलित नसणाऱ्या पालेभाजीची माहिती घेणार आहोत. हिचे नाव आहे पांढरा पुनर्नवा किंवा पांढरी वसु. ही भाजी पावसाळ्यात भरपूर प्रमाणात मिळते. हिची पाने छोटी-छोटी व गोलाकार असतात. वेलीसारखी वाढणारी ही वनस्पती जमिनीलगतच वाढते. पांढऱ्या पुनर्नव्याची फुले पांढऱ्या रंगाची असतात. तांबड्या फुलांचा पुनर्नवा सुद्धा मिळतो, पण तो औषधात वापरला जातो, त्याची भाजी केली जात नाही. 

पांढरा पुनर्नवा रक्‍त शुद्ध करतो, हृद्रोग, सूज, खोकला यांवर उपयोगी असतो, वातदोष तसेच कफदोष कमी करतो, तसेच शरीरातील विषद्रव्यांचा लघवीवाटे निचरा होऊन जाण्यासाठीही उत्तम असतो. या सर्व गुणांमुळे ही एक पथ्यकर भाजी समजली जाते. 
पौनर्नवी पर्णशाका चातिरूक्षा कफापहा । 
वाताग्निमान्द्य गुल्मघ्नी प्लीहशूलविनाशिका ।। 

पुनर्नव्याच्या पानांची भाजी रूक्ष, कफनाशक, वातनाशक असते. अग्निमांद्य, गुल्म, प्लीहावृद्धी, शूळ यांचा नाश करते. 

लघवीला कमी होणे हे मोठ्या रोगाचेही लक्षण असू शकते. त्यामुळे यासाठी वैद्यांचा सल्ला घेणे सर्वांत चांगले. बरोबरीने पांढऱ्या पुनर्नव्याची कमीत कमी मीठ टाकून केलेली भाजी घेणे किंवा पानांचा रस काढून तो दोन-दोन चमचे या प्रमाणात दिवसातून तीन-चार वेळा घेणे चांगले असते. सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर सूज दिसत असली, लघवीला कमी होत असली, लघवी साफ होत नसली तर त्यावरही हे दोन्ही उपाय करता येतात. 

लाल पुनर्नवा यकृतावरचे प्रभावी औषध असते, त्याप्रमाणे पांढऱ्या पुनर्नव्याची भाजी सुद्धा यकृताची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते. सतत प्रवास, त्यामुळे बाहेरचे खाणे, तेल व चरबीयुक्‍त पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात करणे यामुळे अपचन, भूक न लागणे, उत्साह न वाटणे, पोट नीट साफ न होणे वगैरे त्रास जाणवू लागतात. यावर पांढऱ्या पुनर्नव्याची भाजी आहारात ठेवणे हितावह असते. 

आघातामुळे किंवा मुरगळल्यामुळे सूज आल्यास त्यावर पांढऱ्या पुनर्नव्याची पाने वाफवून त्याचा शेक करण्याने दुखणे कमी होते, सूजही उतरते. 

हृद्रोगामध्ये तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने योग्य औषधयोजना करणे अत्यावश्‍यक असतेच, बरोबरीने आहारात पुनर्नव्याच्या भाजीचा समावेश करता येतो. पुनर्नवा, अर्जुन यांचा क्षीरपाक करून घेणे हे सुद्धा हृद्रोगामध्ये हितावह असते. 

पायावर सूज असली, लघवी कमी प्रमाणात होत असली, भूक नीट लागत नसली, आळस जाणवत असला, जिने चढल्यावर दम लागत असला तर पुनर्नव्याची भाजी आहारात घेणे आणि ताज्या पुनर्नव्याचा दोन चमचे रस त्यात अर्धा चमचा आल्याचा रस, अर्धा चमचा मध मिसळून घेणे चांगले असते. 

त्वचा कोरडी पडत असली, कंड येत असली, त्वचा निस्तेज दिसत असली किंवा काळवंडलेली असली तर स्नानापूर्वी पांढऱ्या पुनर्नव्याचा रस हलक्‍या हाताने चोळून जिरविण्याचा उपयोग होतो. 

कावीळ झाल्यावर पथ्य सांभाळणे खूपच आवश्‍यक असते. कावीळ बरी झाल्यावरही कमीत कमी दोन-तीन महिने आहारात पुनर्नव्याची भाजी घेणे, शक्‍य असल्यास पुनर्नव्याचा रस दोन-दोन चमचे या प्रमाणात घेणे हितकर असते. 

पुनर्नवा हे एक उत्तम रसायन द्रव्य आहे. पावसाळ्यात जेव्हा पांढरा पुनर्नवा उपलब्ध असतो तेव्हा साठवून, वाळवून त्याचे चूर्ण करून ठेवून पुढे सहा महिने रोज एक चमचा प्रमाणात घेण्याने शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. 

शरीरात कुठेही सूज असली तर पुनर्नव्याची तिखट न घालता केलेली भाजी, ज्वारीची भाकरी, मुगाचे कढण असा आहार घेणे पथ्यकर ठरते. 

डोळ्यातून थेंब थेंब पाणी येणे, खाज येणे, आग होणे वगैरे विकारांवर पांढऱ्या पुनर्नव्याचे मूळ दुधात उगाळून तयार केलेले मिश्रण सुती कापडातून गाळून घेऊन ते काजळाप्रमाणे डोळ्यात घालणे उपयोगी पडते.