पाण्यातील उपचार 

Aquatic Therapy
Aquatic Therapy

उपचारांसाठी पाण्याचा उपयोग करून घेणे रुग्णांना उपकारक ठरते. शरीर वेदना कमी करणारी आणि मानसिक ताण दूर करणारी ही उपचार पद्धती आहे. पाण्यात उतरले म्हणजे पोहायलाच हवे असे नाही, पण आजाराला दूर ठेवणारा व्यायाम पाण्यात करणे रुग्णांना आत्मविश्वास मिळवून देणारा ठरतो. 

शारीरिक स्वास्थ्य वाढवणारी आणि आरोग्य टिकवणारी क्रिया म्हणजे व्यायाम होय. योग्य व्यायामाने माणसाला स्वतःमधील ‘निरोगी माणूस’ प्राप्त होऊ शकतो. काही वेळेला व्यायाम करणे आणि निरोगी राहणे, हे अतिशय कठीण वाटते. परंतु आपल्यापैकी बरेच लोक नियमित व्यायाम करून स्वतःला सुदृढ ठेवत असतात. तुम्हाला निरोगी आयुष्य मिळवून देण्यासाठीचा एक पर्याय आहे ‘पाण्यातील उपचार पद्धती’ (अॅक्वॅटिक थेरपी). 

अॅक्वॅटिक थेरपीबद्दल सोप्या शब्दांत सांगायचे म्हणजे पाण्यात केले जाणारे व्यायाम प्रकार किंवा शारीरिक उपचार पद्धती. अॅक्वॅटिक थेरपीचा इतिहास पाहता आपल्याला लक्षात येते की, १९४० च्या सुमारास याचा वापर सुरू झाला. ज्यांना दीर्घकालीन वेदना, अपंगत्व आहे अशांनी, तसेच मानसिक आजार असलेल्या लोकांनी या उपचारांचा अवलंब करण्यास सुरुवात केली. अपंग लोकांना पोहण्याचे धडे देण्यासही याच काळात सुरुवात झाली, असे लक्षात येते. आजच्या काळात अनेक कारणांसाठी सर्व वयोगटाच्या लोकांना पाण्यातील व्यायाम प्रकार, तसेच पोहणे शिकवले जाते. हाडांच्या इजेसाठी, मेंदू व रक्त वाहिन्यांसंबंधित समस्यांसाठी, वजन कमी करण्यासाठी, तसेच उत्तम आरोग्यासाठी या उपचार पद्धतीचा वापर करण्यात येतो. 

हे उपचार मान्यताप्राप्त अॅक्वॅटिक थेरपिस्टकडून पोहण्याच्या तलावांवर दिले जातात. तसेच या उपचारांसाठी विशेष तलाव तयार करण्यात येतात. त्यांचाही उपयोग केला जातो. अॅक्वॅटिक थेरपिस्ट प्रथम रुग्णाच्या आजाराचे निदान करतात आणि त्यानंतर काही विशिष्ट ध्येय ठरवले जाते. सुरवातीला साधे, सोपे व्यायाम आणि हालचाली देऊन पाण्याची सवय होण्यास मदत करतात. 
मग प्रश्न येतो की, रुग्णाला हे उपचार घेताना पोहता येणे गरजेचे आहे का? हे उपचार ज्या व्यक्तींना पोहता येत नाही अशा लोकांनाही घेता येतात. त्यासाठी अशी कोणतीही अट नसते. हे उपचार घेताना सोप्या व्यायाम प्रकारांमधून श्वासोच्छवास कसा करावा याचेही मार्गदर्शन अॅक्वॅटिक थेरपिस्टकडून केले जाते. 

पाण्याच्या गुणधर्मांचा वापर करून अॅक्वॅटिक थेरपिस्ट रुग्णाला पाण्यात हालचाल करण्यास मदत करतात. तसेच रुग्णाकडून व्यायाम करून घेतात. याचा उपयोग रुग्णाला त्याचे अकार्यक्षम झालेले किंवा कमकुवत झालेले स्नायू आणि हाडे कार्यक्षम करण्यास होतो. तसेच घट्ट झालेल्या स्नायूंना ताण देण्यासही या व्यायामांचा उपयोग होतो. या उपचारांचा अवलंब करताना अॅक्वॅटिक थेरपिस्टकडून रुग्णाच्या सुरक्षिततेकडे प्राधान्य दिले जाते. 

अॅक्वॅटिक थेरपीचे फायदे 
- अॅक्वॅटिक थेरपीमुळे स्नायूंना पुरेशी विश्रांती मिळते. तसेच कोमट पाण्याचा उपयोग करून शरीराच्या सर्व भागांचा रक्तपुरवठा सुधारण्यात येतो. 
- रुग्णाची ताकद वाढण्यासाठी उपचार घेताना पाण्यामुळे योग्य प्रमाणात प्रतिकारशक्तीचीही निर्मिती होते. 
- पाण्यातील घनतेचा रुग्णाला व्यायाम करताना उपयोग होतो. पाणी रुग्णाला उभे करण्यास, चालण्यास, तसेच ताकद वाढण्यासाठी व्यायाम करण्यास मदत करते. या हालचाली होताना इजा झालेल्या स्नायूंना कोणताही संभाव्य धोका नसतो. 
- पाण्याच्या वेगवेगळ्या गुणधर्मांमुळे रुग्णाच्या वेदना कमी होतात. 
- पाण्याच्या वेगवेगळ्या गुणधर्मांमुळे रुग्णाची अतिसंवेदनशीलता कमी होते. 

आणखी काय? 
गेल्या काही वर्षांत अॅक्वॅटिक थेरपीमुळे मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे. गुडघ्याचा ऑस्टिओअर्थरायटीस असलेल्या रुग्णांना अॅक्वॅटिक थेरपीचा विशेष फायदा होतो. ऑस्टिओअर्थरायटीस असलेल्या रुग्णांच्या बाबतीत अॅक्वॅटिक थेरपी वेदना कमी करण्यास तसेच हालचाल सुधारण्यास अतिशय फायदेशीर ठरते, असे आढळते. सेरेब्रल पाल्सी असलेल्या नवजात बालकांमध्ये, लहान मुलांमध्ये, तसेच पौगंडावस्थेतील मुलांमध्ये अॅक्वॅटिक थेरपीमुळे त्यांची दैनंदिन कामे करताना आत्मविश्वास वाढल्याचे तसेच स्वावलंबी झाल्याचे आढळून आले आहे. मज्जासंस्थेशी संबंधित अर्धांगवायूसारखे आजार असलेल्या रुग्णांनासुद्धा अॅक्वॅटिक थेरपीचा अतिशय फायदा होतो. पाण्यामुळे गुरुत्वाकर्षण शक्तीचे परिणाम कमी होतात व स्नायूंचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. 

अॅक्वॅटिक थेरपीचे वेगवेगळे अनेक प्रकार आता रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. त्यातीलच एक अतिशय परिणामकारक प्रकार म्हणजे अॅक्वा अॅरोबिक्स होय. अॅक्वा अॅरोबिक्समध्ये रुग्णाच्या गरजेप्रमाणे शरीराच्या हात अथवा पायांना किंवा दोन्ही अवयवांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केला जातो. तसेच पाठीच्या मणक्यासाठी या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. यात कमी ते जास्त तीव्रतेचे व्यायाम घेतले जातात. ही व्यायाम पद्धती रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर असते. माणसाची सहनशक्ती वाढविण्यासाठी तसेच एकूणच शारीरिक आरोग्यासाठी अॅक्वा अॅरोबिक्स हे उपचार कमालीचे फायदेशीर असतात. जर तुम्हाला नाचायला आवडत असेल, तर पाण्यासारखा दुसरा सोबती मिळणार नाही. तसेच तणाव कमी करण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो. समूहाने एकत्रित व्यायाम केल्यास याचे इतरही अनेक फायदे जाणवतील. 

पाण्यात चालणे, फ्री-स्टाईल हा पोहण्याचा प्रकार, हात व पायाच्या हालचाली अशा अनेक प्रकारांचा अॅक्वा अॅरोबिक्समध्ये समावेश होतो. परंतु मान्यताप्राप्त आणि प्रशिक्षित अॅक्वॅटिक थेरपिस्ट तुम्हाला या व्यायामाची सखोल माहिती देतील. या व्यायाम प्रकाराची व्यवस्थित ओळख करून देतील. तुमच्या शरीराला कोणत्या प्रकारचे परिणामकारक ठरतील, याबद्दल अॅक्वॅटिक थेरपिस्ट योग्य मार्गदर्शन करतात. तसेच कोणत्या प्रकारच्या व्यायामाने रुग्णाच्या वेदना कमी होतील याबद्दल अभ्यास करून अॅक्वॅटिक थेरपिस्ट रुग्णाला मदत करतील. अॅक्वॅटिक थेरपिस्टच्या देखरेखीखाली हे उपचार घेतल्यास भविष्यातील शरीराला होणारी दुखापत तसेच हानी टाळता येऊ शकते. 

पोहण्याचा आनंद 
आणखी एक अतिशय महत्त्वाचा व्यायाम प्रकार म्हणजे पोहणे. कोणत्याही वेदनादायी आजारासाठी पोहण्यासारखा दुसरा व्यायाम प्रकार नाही. परंतु सर्वच रुग्णांना पोहता येईल असे नाही. तसेच सर्व रुग्णांच्या वेदना पोहण्यामुळे कमी होतील असेही नाही. पाण्यात कमी ताकदीचे आणि वेदनाविरहित व्यायाम केल्याने त्याचा फायदा नक्कीच होतो. 
पाणी हा तणाव कमी करण्याचा एक उत्तम स्रोत आहे. पाण्यात रुग्णाला अतिशय आरामदायी आणि शांत वाटू शकते. स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी पाणी फायदेशीर ठरते. अॅक्वॅटिक थेरपीमधील ‘आय ची’ हा एक व्यायाम प्रकार आहे. या व्यायामामुळे शरीराला आराम मिळण्यास मदत होते. तसेच वेदना कमी करण्यासाठी या व्यायामाचा उपयोग केला जातो. या व्यायाम प्रकारचे वैशिष्ट्य म्हणजे यामुळे सर्व वयोगटातील लोकांच्या मनातील भीती कमी होण्यास मदत होते. 

या आजारातही होईल उपयोग 
अॅक्वॅटिक थेरपीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल अशा काही वैद्यकीय समस्या याप्रमाणे - 
- ऱ्हुमेटॉईड अर्थरायटीस 
- स्पाँडीलायटीस (मणक्यांना आलेली सूज) 
- दाहक आणि विनादाहक संधिवात 
- स्ट्रोक 
- मणक्याला झालेली इजा ओघाने त्यामुळे हाताला किंवा पायाला अर्धांगवायू असणे 
- मधुमेह असलेल्या रुग्णांच्या संवेदनेच्या समस्या 
- मधुमेह असलेल्या रुग्णाचा पाय 
- स्नायूंचे आजार 
- पार्कीन्सन आजार 
- नितंबाच्या पेशींचा काही भाग नष्ट होण्याची अवस्था 
- ठराविक अवयवाच्या दीर्घकालीन वेदना 
- शस्त्रक्रियेनंतर स्नायूंना येणारा कमकुवतपणा 
- ऑस्टिओपोरोसिस 
- खेळामुळे होणाऱ्या दुखापती 
- सर्व वयोमानातील लोकांचे आरोग्य 
आणखी अनेक आजार व अवस्थांमधेही अॅक्वॅटिक थेरपीमुळे फायदा होतो. 

काही अनुभव 
काही रुग्णांना जमिनीवर व्यायाम करता येत नाही किंवा काही विशिष्ट अडचणी असतात, अशांना अॅक्वॅटिक थेरपीचा अतिशय चांगला उपयोग होतो. कल्पश्री हवालदार सांगतात, ‘‘एका अपघातात माझ्या पायांना अर्धांगवायूने ग्रासले. त्यामुळे मला अनेक अडचणी येऊ लागल्या. परंतु अॅक्वॅटिक थेरपीचा मला फायदा झाला. पोहताना मी स्वावलंबी झाले. माझ्या शरीराचे संतुलन सुधारले. बसताना आणि उठताना माझा तोल सुधारला. अॅक्वॅटिक थेरपी ताण- तणाव दूर करण्याचा योग्य स्रोत आहे. पाण्यात खेळणे मला आनंद द्यायचे.’’ 
धीरज सरन यांनाही अॅक्वॅटिक थेरपीमुळे फायदा झाला, त्यांचा अनुभव ते सांगतात, ‘‘एसीएल शस्त्रक्रियेनंतर एका महिन्यातच पाण्यात उपचार घ्यायचे या विचारानेच माझ्या अंगावर काटा आला. शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यावर भार पडू नये यासाठी मी जरा जास्तच सावध व्हायचो. कोणतेही आघात किंवा जखमेमुळे माझ्या गुडघ्याला परत त्रास होईल म्हणून मी खूप घाबरायचो. सकाळी बोटांवर जॉगिंग करताना पाय मुरगळला आणि त्यातून या आजाराचे निदान झाले. हे निदान व उपचारांसाठी करावी लागणारी शस्त्रक्रिया झाली. पण पुन्हा पळणे आणि चालणे हा माझा व्यायाम सुरू करणे अशक्य वाटत होते. गुडघ्याच्या पुनर्वसनासाठी डॉक्टरांनी अॅक्वॅटिक थेरपी घेण्याचा सल्ला दिला. हा सल्ला माझ्यासाठी अतिशय मोलाचा ठरला. मी उपचारांसाठी पहिल्यांदाच पाण्यात उतरलो होतो. अॅक्वॅटिक थेरपीमुळे माझ्या स्नायूंची ताकद वाढली. पाण्यात इजा होण्याची शक्यता अतिशय कमी असते. त्यामुळे माझा व्यायाम करण्याचा विश्वास वाढला. माझ्या स्नायूंची वाढलेली ताकद हाच अॅक्वॅटिक थेरपी घेतल्याचा पुरावा ठरला. कालांतराने हे उपचार मी चालू ठेवले. त्यामुळे माझी हालचाल योग्य रितीने सुधारली. एसीएल शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसनासाठी मी अॅक्वॅटिक थेरपी घेतलीच पाहिजे असे सांगेन’’ 
सारांश, योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेऊन पाण्यातील उपचार पद्धतीचा अवलंब करा. ज्या रुग्णांना संपूर्ण गुडघे बदल शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे, अशा रुग्णांना आधी शस्त्रक्रियेसाठी शारीरिकदृष्ट्या तयार करावे लागते. म्हणजेच रुग्णाला तंदुरुस्त बनवावे लागते. अशा रुग्णांकडून मान्यताप्राप्त प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली अॅक्वॅटिक थेरपी, सामान्य व्यायाम प्रकार, तसेच व्यायामशाळेतील व्यायाम करून घेतले जातात. शस्त्रक्रियेपूर्वीच्या तयारीमध्ये शस्त्रक्रियेनंतरच्या पुनर्वसनाचाही समावेश केलेला असतो. शस्त्रक्रियेनंतर लवकरात लवकर पुनर्वसन होईल याकरिता रुग्णांना मार्गदर्शन केले जाते. 

 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com