#FamilyDoctor गोकुळाष्टमी

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 31 August 2018

घरामध्ये छोटे बाळ, मग ती मुलगी असो वा मुलगा, असले की त्याला किमान एकदा तरी कृष्णासारखे नटवून, थटवून छायाचित्रे काढली जातात, घरात प्रत्यक्ष बाळकृष्ण असल्याचा आनंद साजरा केला जातो. हा आनंद एका दिवसापुरता नाही, तर कायम अनुभवायचा असेल, तर श्रीकृष्णांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायला हवा. मुलाला ज्या विषयात गोडी वाटत असेल, त्या विषयात त्याला प्रोत्साहन देऊन त्याच्या बुद्धीची वाढ होण्यास मदत करणे, हे श्रीकृष्णांची पूजा करणाऱ्या प्रत्येक भारतीय पालकाचे कर्तव्य होय.

गोकुळाष्टमीच्या उत्सवाची घराघरांत आतुरतेने वाट पाहिली जाते, विशेषतः ज्या घरात बाळाचा जन्म व्हायचा असेल, तेथे तर नक्कीच. श्रीकृष्ण हा एक आदर्श अवतार. कृष्णाचा जन्म, त्याचे बालपण, त्याचे तत्त्वज्ञान याकडे फक्‍त एक कथा म्हणून न पाहता जर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिले, तर लक्षात येईल की श्रीकृष्णांनी प्रत्येक कृतीमधून आपल्याला आरोग्याचा संदेश दिलेला आहे. या वर्षी दोन सप्टेंबरला म्हणजे परवाच्या दिवशी श्रीकृष्णाष्टमी आहे. त्या निमित्ताने आपण श्रीकृष्णांकडून आलेले काही मुख्य आरोग्यसंदेश समजून घेऊ या. 

श्रीकृष्णांचा जन्म आहे श्रावणातील. श्रावणात जन्म होण्यासाठी नऊ महिने अगोदर म्हणजे कार्तिक, मार्गशीर्ष महिन्यात गर्भाधान व्हायला हवे. आणि कार्तिक, मार्गशीर्ष हे दोन महिने हेमंत ऋतूचे असतात. आयुर्वेदातही निरोगी बाळासाठी करायला सांगितलेला गर्भाधान संस्कार शरीरशक्‍ती उत्तम असलेल्या ऋतूत म्हणजे हेमंत-शिशिर ऋतूत होणे आदर्श मानलेले आहे. ऋतूंचा राजा समजल्या जाणाऱ्या हेमंतात गर्भधारणा होऊ शकली, तर आजही बाळकृष्ण जन्माला येणे अशक्‍य नाही, हेच जणू श्रावणातली गोकुळाष्टमी सांगत असावी. 

लहान मुलांनी कसे राहावे, कसे वागावे, काय खावे, याचे जणू प्रात्यक्षिकच श्रीकृष्णांनी स्वतःच्या बालपणातून दाखवून दिले आहे. कृष्णाचे बालपण गोकुळात गेले. अगदी लहान वयापासून कृष्ण-बलराम गाईंना चारण्यासाठी वनात घेऊन जात असत. त्यांच्यासोबत गोकुळात राहणारे सर्व बाळ-गोपाळही आपापल्या गाईंना घेऊन जात असत. आरोग्याच्या दृष्टीने यावरून एक गोष्ट ध्यानात येईल, की लहान मुलांनी मोकळ्या हवेत खेळावे-बागडावे. आजकाल मुलांमध्ये बसून राहण्याची, घरच्या घरी संगणकावर खेळ खेळण्याची, टीव्हीवरचे कार्यक्रम बघण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते आहे. यामुळे लहान वयात कफदोषाचे असंतुलन होऊन कमी वयातच मुले जाड होतात, आळशीपणा जडतो, लहान वयातला स्वाभाविक चपळपणा व उत्साह लोप पावून त्याजागी मंदपणा, कंटाळा दिसू लागतो. एका बाजूने वाढती स्पर्धा व दुसऱ्या बाजूने असा आळशीपणा या ताणाला सामोरे जाणे हे मुलां-पालकांसाठी एक दिव्य असते. हे टाळायचे असेल, तर लहानपणापासून बाळकृष्णांना आदर्श समजून मुलांना मोकळ्या हवेत वावरण्याची, पुरेशा प्रमाणात खेळ खेळण्याची आणि पशुपक्षी व प्राण्यांवर प्रेम करण्याची सवय लावणे आवश्‍यक असते. 

गोकुळात लहानाचा मोठ्या झालेल्या गोपालकृष्णाला लहानपणापासूनच दह्या-ताकाची आवड असलेली आपण ऐकतो. गोकुळाष्टमीचा प्रसाद म्हणून ‘गोपाळकाला’ दिला जातो, तो तांदळापासून बनवलेले मऊ पोहे व दह्याच्या मिश्रणापासून बनवलेला असतो. पावसाळ्यात मंद झालेल्या पचनशक्‍तीला साजेसा असा हा प्रसाद आहे. तांदूळ मुळात पचायला हलके असतात. तांदळाचे पोहे करण्याने त्यांच्यात जे थोडेसे कोरडेपण येते ते दह्यातील स्निग्धतेने दूर होते व सोबत टाकलेल्या आले, मीठ, साखरेमुळे रुचकर तर होतेच, पण पचनासही सुलभ बनते. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी जेवणाबरोबर असा गोपाळकाला प्रसाद म्हणून अवश्‍य सेवन करावा. खरे तर पूर्ण श्रावणातच असे दही-पोहे अधूनमधून खाल्लेले चांगले, यात रुचिपालट म्हणून पोह्यांऐवजी साळीच्या लाह्या घेतल्या तरी चालू शकेल.

लहानपणी कृष्ण इतर बाळगोपाळांसमवेत गोपींच्या घरी जाऊन दही-लोणी फस्त करीत असत, ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. मुलांना खेळकर, उत्साही आणि ताकदवान बनवण्यासाठी लहानपणी दूध, लोणी, तुपासारख्या गोष्टी मुबलक मिळायला हव्यात, ही त्यामागची खरी योजना असावी. सर्वांच्या घरी या गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळत आहेत, हे पाहण्यासाठीच बहुधा श्रीकृष्ण घरोघरी शिंकी-मडकी शोधून त्यातले लोणी सगळ्यांना वाटायला जात असावेत.

बाळकृष्णाच्या गोष्टींमधून अजून एक गोष्ट समजते, की कृष्णाला दही-लोणी कितीही आवडत असले, तरी कृष्णाने ते एकट्याने कधीच खाल्ले नाही, उलट सोबत असलेल्या बालगोपाळांना अगोदर वाटून नंतर शिल्लक राहिलेले स्वतः खाल्ले. इतरांबरोबर ‘शेअर’ करण्याचा धडा यातून मिळतो. लहान मुलांनीच नाही, तर मोठ्या माणसांनीही ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे.

सर्व चित्रांमध्ये श्रीकृष्ण गाईसमोर उभे असलेले दाखवलेले असतात. त्यांचे ‘गोपाळ’ हे नाव गोमातेचा महिमा वाढविणारे आहे. आरोग्याच्या दृष्टीने गाईसारखा उपयुक्‍त प्राणी शोधूनही सापडणार नाही. आयुर्वेदात गाईपासून तयार होणाऱ्या दूध, दही, तूप, गोमूत्र व गोमय या पाच द्रव्यांना मिळून ‘पञ्चगव्य’ संज्ञा दिली आहे.

गोमूत्रं गोमयं क्षीरं दधि सर्पिस्तथैव च ।
समं योजितमेकत्र पञ्चगव्यमिति स्मृतम्‌ ।
एतद्‌ देहशुुद्धिकरं कफघ्नं च ।

आयुर्वेदात सांगितले आहे, की पंचगव्य शरीरशुद्धी करते, तसेच कफदोष संतुलित करते. पंचगव्याचा वापर पूजेसाठी केला जातो, पूजेच्या निमित्ताने तीर्थाच्या रूपात पंचगव्य प्राशन करण्याच्या प्रथेमुळे सरतेशेवटी आरोग्याचाच लाभ होतो. 

आयुर्वेदात पंचगव्यघृत नावाचे औषधी तूप बनवले जाते, हे तूप कावीळ, पांडुरोग, अपस्मार, ताप, सूज, मानसिक विकार, दमा वगैरे विकारातही औषध म्हणून वापरले जाते. अष्टांगसंग्रहात सांगितल्याप्रमाणे पंचगव्यघृत विषाणूबाधा, जंतुसंसर्ग दूर करते. 

रोजच्या रोज या पाच गोष्टी वापरता आल्या नाहीत, तरी गाईचे दूध, ताक, लोणी, तूप यांचा आहारात समावेश करणे सहज शक्‍य आहे.

श्रीकृष्णांच्या काळात दूध चांगलेच मिळत असावे. सध्या मात्र दूध शुद्ध, प्रक्रियाविरहित व मुख्य म्हणजे भारतीय वंशाच्या गायीचे किंवाम्हशीचे मिळविणे गरजेचे होय. श्रीकृष्ण त्यांच्या भावाबरोबर तसेच इतर सवंगड्यांबरोबर स्वतः गायींना जंगलात चरण्यास नेत असत, यावरून गाईला दिवसरात्र गोठ्यात बंद करून ठेवू नये आणि गाईची नीट काळजी घ्यावी, हे समजून घेता येते. अशा दुधामुळे जीवनशक्‍ती वाढते, आकलनशक्‍ती सुधारते, ताकद वाढते, तारुण्य टिकून दीर्घायुष्याचा लाभ होतो, तुटलेले हाड सांधते, हाडे बळकट राहतात, ओज वाढते. अनेक मनोरोगात, हृदयरोगात, गर्भाशयाच्या रोगात दूध उत्तम असते. 

अशा चांगल्या दुधाला भारतीय परंपरेचे (विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंनी युक्‍त) विरजण लावले की त्यापासून दही तयार होते. हे दही घुसळून त्यातील लोणी वेगळे करता येते. घरातील बालगोपाळांसाठी हे लोणी उत्तम असते. ताजे लोणी चवीला गोड, पचायला हलके, वीर्याने शीत व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, मेधावर्धक म्हणजे आकलनशक्‍ती सुधारणारे असते. लहान मुलांना रोज एक-दोन चमचे लोणी देण्याने ताकद वाढते, शारीरिक विकास व्यवस्थित होतो आणि आकलनशक्‍ती वाढते, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. हे लोणी कढवून तयार केलेले तूप तर लहान-मोठ्या सर्वांसाठीच आरोग्यदायक असते. तूप हा दूध-लोण्याचा सारभाग असल्याने तूप सर्वोत्तम समजले जाते. 

घृतं रसायनं स्वादु चक्षुष्यं वदिीपनम्‌ ।
शीतवीर्यं विष अलक्ष्मीपापपित्तानिलापहम्‌ ।।
...भावप्रकाश

शास्त्रोक्‍त पद्धतीचे साजूक तूप हे रसायन गुणांनी युक्‍त असते, चवीला गोड असते, डोळ्यांसाठी हितकर असते, तसेच अग्नी प्रदीप्त करते. तूप वीर्याने शीत असते, वात-पित्तदोषांना कमी करतेच, पण विषदोषांचाही नाश करते. तेव्हा घरातील लहानांच्या आहारात, तसेच मोठ्यांनीही दूध, लोणी, तूप हे पदार्थ नित्य सेवनात ठेवावे हे चांगले.

श्रीकृष्णचरित्रात कदंबाचा उल्लेख अनेक वेळा येतो. कदंबाचे झाड उंच, कायम हिरवेगार असते व त्याची फुलेही सुंदर व मोहक सुगंध देणारी असतात. कदंब हा त्रिदोषशामक व विषनाशक असल्याचे आयुर्वेदात सांगितलेले आहे. कदंबाचे असे महत्त्व असल्याने श्रीकृष्ण लहानपणापासून कदंबवृक्षाच्या सान्निध्यात राहात असावेत. श्रीकृष्ण कदंबाच्या झाडाखाली बसून बासरी वाजवत असत व कदंबफुलांची माला धारण करीत असत, असेही वर्णन वाचायला मिळते. वृक्षवल्लींचे महत्त्व व लहान वयापासून निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची शिकवणच यातून श्रीकृष्ण मुलांना देतात. यमुनेच्या डोहातील विषारी कालिया सर्पावर विजय मिळवण्यासाठी श्रीकृष्णांनी कदंबाच्या झाडावरून उडी घेतल्याचे वर्णन सापडते. कदंबाचा प्रभाव विषघ्न असल्यानेच बहुधा कृष्णांनी अगोदर कदंबाचा आश्रय घेतला असावा. 

मुले जरा मोठी झाली की शाळेत घालण्याची घाई होते. केवळ मोठी इमारत, अधिक फी, म्हणजे ती शाळा चांगली, असा एकांगी विचार न करता, चांगली शाळा ती जिथे अभ्यासासोबत मुलांचा उत्साह, नटखटपणा चांगल्या प्रकारे जोपासला जाईल, मुलांचे ज्ञान आणि क्रियाशीलता वाढवायचे महत्त्वाचे काम जिथे उत्तम प्रकारे होईल, अशी कल्पना असावी. आजकाल बऱ्याच वेळा मुलांना शाळेमधून नसते धाक किंवा अवाच्या सवा बंधने घातलेली आढळतात. याचा अकारण ताण मुलांवर येत असल्यास ते चांगले नाही व तो टाळण्याचा प्रयत्न केला जायला हवा. लहान मुलांनी केलेल्या खोड्या, दंगामस्ती जोपर्यंत जिवावर बेतण्यासारखी किंवा मुलांना त्रासदायक ठरण्यासारखी नसेल तोपर्यंत त्यांच्यावर भलतीच बंधने न घालणे चांगले. मुलाला ज्या विषयात गोडी वाटत असेल, त्या विषयात त्याला प्रोत्साहन देऊन त्याच्या बुद्धीची वाढ होण्यास मदत करणे, हे श्रीकृष्णांची पूजा करणाऱ्या प्रत्येक भारतीय पालकाचे कर्तव्य होय.

घरामध्ये छोटे बाळ, मग ती मुलगी असो वा मुलगा, असले की त्याला किमान एकदा तरी कृष्णासारखे नटवून, थटवून छायाचित्रे काढली जातात, घरात प्रत्यक्ष बाळकृष्ण असल्याचा आनंद साजरा केला जातो. हा आनंद एका दिवसापुरता नाही, तर कायम अनुभवायचा असेल, तर श्रीकृष्णांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायला हवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article abourt Gokulashtami