#FamilyDoctor गोपालकृष्ण

#FamilyDoctor गोपालकृष्ण

श्रीकृष्ण एक आदर्श अपत्य. आज साडेपाच हजार वर्षांनंतरही श्रीकृष्णजयंती आणि श्रीकृष्णलीला, श्रीकृष्णांचे महाभागवत यांची पारायणे, प्रवचने भारतवर्षात अत्यंत प्रचलित आहेत. आजही श्रीकृष्णजयंती उत्सवाचे स्वरूप देऊन साजरी केली जाते. नुसतेच स्वतःच्या आई-वडिलांना बंधनातून मुक्‍त केले म्हणून नव्हे तर, आपले इतर नातेवाईक, मित्रमंडळी, बालगोपाळांपासून ते अक्रूर, यादव, पांडव वगैरे सर्व वयाच्या व अधिकाराच्या लोकांना अभिमान वाटेल असा हा जन्म, असे हे कर्तृत्व आणि असा हा आदर्श. 

जगावेगळे असे काही न करता सर्वसामान्यांप्रमाणे राहून अगदी गल्लीतल्या मुलांमध्ये खेळण्यापासून ते आपल्याहून मोठ्या वयाच्या गोप-गोपींमध्ये रममाण होऊन मिसळून जाणारा; नंदग्राम गोकुळासारख्या लहानशा गावावरची संकटे दूर करणारा तसेच मथुरेसारख्या मोठ्या शहरावर होणाऱ्या अत्याचारासाठी झटणारा; अनेक जुलमी राजांना दंड देऊन तेथील प्रजेला भीतीमुक्‍त करणारा; स्त्रीला पूजनीय व आदिदेवता मानून तिचा अपमान हा संपूर्ण मानवतेचा अपमान आहे असे समजून स्त्रीची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी अनेक क्‍लृत्प्या, वेळप्रसंगी कारस्थाने करून स्त्रीला त्रास देणाऱ्यांना, तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांना नेस्तनाबूत करणारा; मल्लविद्येत प्रावीण्य मिळविलेला; उत्तम शरीरसौष्ठव व स्वास्थ्य असलेला; दह्या-दुधाच्या-लोण्याच्या व्यवसायापासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या व्यवसायात व्यवस्थित लक्ष घालून सर्वसामान्यांना समृद्धी मिळवून देणारा; सामाजिक क्रांती करविणारा, प्रत्यक्ष युद्धात सहभागी न होता अर्जुनाकडून त्याचे कर्तव्य करवून घेणारा; अधर्माने लढणाऱ्यांचा पराजय करविणारा; श्रीकृष्ण आपला पती व्हावा असे अनेक स्त्रियांना इतकेच नव्हे तर अनेक राजकन्यांना ज्याच्याबद्दल वाटते असा; श्रीकृष्ण बरोबर असला तर विजय नक्की असा विश्वास, खात्री व श्रद्धा उत्पन्न करणारा; आपल्याला असाच मुलगा व्हावा असे प्रत्येक व्यक्‍तीला वाटेल असे अलौकिक व्यक्‍तिमत्व असणारा असा श्रीकृष्ण. सर्व व्यायामशाळांमध्ये श्री हनुमंतांबरोबर खरे तर श्रीकृष्णांचे चित्र लावावे. 

हा सर्व श्रीकृष्णमहिमा लक्षात घेऊन ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकाच्या वेळी, गर्भवतीच्या शयनकक्षात श्रीकृष्णांचे एखादे सुंदर चित्र असावे अशी कल्पना मनात आली. अशा सुंदर चित्राकडे पाहिल्यावर आपल्याला श्रीकृष्णासारखे बालक व्हावे अशी इच्छा उत्पन्न होऊन श्रीकृष्णकृपेने तसे घडेलसुद्धा अशी यामागची संकल्पना. कुलाला अभिमान ठरावा असे श्रीकृष्णासारखे अपत्य, मग तो मुलगा असो वा मुलगी, जन्माला येण्यासाठी गर्भसंस्कारांचे महत्त्व खूपच असते. कंसाने तुरुंगात टाकल्यामुळे वसुदेव-देवकी यांना संपूर्ण विश्रांती मिळाली व ईशचिंतन घडले. सर्व प्रजेचे संकट दूर करून रक्षण करणारे अपत्य आपल्या पोटी जन्माला येणार अशी श्रद्धा व विचार त्यांच्या मनात पक्का झालेला होता. दांपत्याच्या मनात प्रथम असा विश्वास, आत्मविश्वास किंवा श्रद्धा रुजली पाहिजे की  होणारे अपत्य हे केवळ एक मूल झाल्याचे समाधान असण्यापुरते असू नये, तर ते अपत्य संपूर्ण मानवजातीला काहीतरी उपकारक ठरेल असे असावे. 

मुख्य म्हणजे अपत्याचा जन्म ही संकल्पना असावी, हा अपघात नसावा. एखादे काम करायचे असल्यास त्यासाठी मंडळी सुटी काढतात, वेळ काढतात, योग्य ऋतू पाहतात व कार्याची आखणी करतात. त्याप्रमाणे गर्भधारणा ही आकस्मिक व अनपेक्षित नसावी तर त्यासाठी व्यवस्थित पूर्वनियोजन केलेले असावे. देवकीची पहिली सात मुले जगली नाहीत म्हणून आठवा श्रीकृष्ण जन्माला येणार नाही किंवा तोही पहिल्या सातांप्रमाणेच मरेल असे न वाटता तिने स्वतःच्या श्रद्धेवर व्यवस्थित आत्मनियोजन केले व तिला आठवा पुत्र झाला. कारागृहात असल्यामुळे म्हणा किंवा तशी योजना केलेली म्हणून म्हणा गर्भातील अपत्यावर श्रद्धा संस्कारांचे परिणाम झालेच. तसेच गर्भातील प्रत्यक्ष देवत्व असलेल्या श्रीकृष्णांमुळे मातेचे आरोग्य, मानसिकता वगैरे गोष्टीही संतुलित राहिल्या. 

श्रीकृष्णांच्या गोपीवस्त्रहरण (आत्म्यावर चढविलेले मुखवटे काढल्याशिवाय परमात्मदर्शन नाही हे सांगण्यासाठी), द्रौपदीवस्त्रपूरण (स्त्रीसन्मान व प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी), कालियामर्दन (जलशुद्धिकरणासाठी), कंसनिर्दालन (दुष्टप्रृत्तींचा नाश करण्यासाठी) अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी प्रसिद्ध असल्या तरी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी व लोककल्याणासाठी, त्यांच्या उद्योग व्यवसायसंवर्धनासाठी व त्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी केलेला प्रयत्न. मित्रमंडळींवर केलेले अतिशय प्रेम, दूध-दुभत्याच्या वाढीसाठी व बालकांना आवश्‍यक असलेले दूध लोणी, तूप योग्य वेळी मिळावे म्हणून स्वीकार केला ‘माखनचोर’ हा आरोप. मथुरेच्या बाजारातील जाचक करआकारणी विरोधात केलेले आंदोलन गो-सेवा दुधा-तुपाचे महत्त्व वाढविल्यामुळे श्रीकृष्णांना ‘गोपाल’ हे नामाभिधान मिळाले.

आरोग्यासाठी कृपा हवी गोपालकृष्णांची व सेवा हवी गाईची. दूध, दही, लोणी, तूप याशिवाय माणसाचे आणि गोमय, गोमूत्र याशिवाय वनस्पतींचे व शेतीचे आरोग्य नीट राहणारच नाही, तसेही ‘गो’ (इंद्रिये) ही बाह्यवस्तूकडे आकर्षित होणारी असतात आणि त्यांना ‘पाल’ म्हणजे त्यांच्यावर विजय मिळवून तनाचे व मनाचे संपूर्ण आरोग्य देणारा तो ‘गोपाल’.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com