अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) बुद्धिवर्धन

Intelligences
Intelligences

रोजच्या व्यवहारातील अगदी साधा निर्णय घ्यायचा असला तरी परिस्थिती लक्षात येण्यासाठी मेधा जबाबदार असते. या परिस्थितीत काय करायला हवे, काय करायला नको हे सांगणारी बुद्धी असते. या द्विधा मनःस्थितीतून बाहेर येण्यासाठी तिला स्मृती व धृती मदत करतात. या चौघींनी आपले काम व्यवस्थित केले आणि मनाने त्यांना पाठिंबा दिला तर अचूक निर्णय घेतला जातो.

अग्र्यसंग्रहाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण पोचलो आहोत. आरोग्यरक्षणासाठी आवश्‍यक असणारे सर्व पैलू विचारात घेऊन त्यासाठी सर्वश्रेष्ठ उपाय कोणता हे सांगण्याचे महत्त्वाचे काम अग्र्यसंग्रहाने केलेले आहे. बुद्धिवर्धनासाठी अत्यावश्‍यक काय हे चरकाचार्य सांगत आहेत. 
तद्विद्यसंभाषा बुद्धिवर्धनानाम्‌ - तद्विद्य म्हणजे जाणती व्यक्‍ती, तज्ज्ञ व्यक्‍ती. आणि संभाषा म्हणजे शास्त्राचे अध्ययन करणाऱ्याशी संभाषण. त्यामुळे शास्त्राचा अभ्यास असणाऱ्या जाणकार, तज्ज्ञ व्यक्‍तीशी शास्त्राबाबत चर्चा करणे हा बुद्धिवर्धनासाठी सर्वोत्तम उपाय होय. 
सुश्रुतसंहितेतही बुद्धिमेधावर्धनासाठी पुढील उपाय सुचवले आहेत.
सतताध्ययनं वादः परतन्त्रावलोकनम्‌ तद्विद्याचार्य सेवा च इति बुद्धिमेधाकरो गणः ।
...सुश्रुत चिकित्सास्थान

सतत अध्ययन - अध्ययन करणे म्हणजे नुसते पाठांतर करून चालत नाही तर विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्‍यक असते. विषय समजणे म्हणजे नुसता शब्दांचा अर्थ लक्षात ठेवणे नाही तर आतले ज्ञान लक्षात घेण्याचा प्रयत्न करणे.

वाद - वाद म्हणजे चर्चा. ज्या शास्त्राचा अभ्यास करतो आहोत त्या शास्त्रासंबंधी इतरांशी चर्चा करणे, आपले शास्त्रसंमत मत मांडणे.
परतंत्रावलोकन - इतर शास्त्रांकडे लक्ष ठेवणे पण तरीही स्वतःच्या शास्त्राशी ठाम राहणे.

तद्विद्याचार्यसेवा - शास्त्रामध्ये जे तज्ज्ञ आहेत, निपुण आहेत त्यांची सेवा करणे, त्यांच्याकडून ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे.

बुद्धी, स्मृती, मेधा, धृती या सर्व एकमेकांशी संबंधित असतात आणि जीवनात पदोपदी आवश्‍यक असतात. जीवनाची यशस्विता व समाधान यांच्या संपन्नतेवर अवलंबून असते. 

रोजच्या व्यवहारातील अगदी साधा निर्णय घ्यायचा असला तरी परिस्थिती लक्षात येण्यासाठी मेधा जबाबदार असते. या परिस्थितीत काय करायला हवे, काय करायला नको हे सांगणारी बुद्धी असते. या द्विधा मनस्थितीतून बाहेर येण्यासाठी तिला स्मृती व धृती मदत करतात. या चौघींनी आपले काम व्यवस्थित केले आणि मनाने त्यांना पाठिंबा दिला तर अचूक निर्णय घेतला जातो, अन्यथा काही तरी चुकीचे घडते, ज्याचा दुष्परिणाम नंतर भोगावा लागतो. कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करावी असे जे म्हटले जाते त्यामागे मेधा, बुद्धी, स्मृती, धृती व मन यांची साखळी असते. म्हणूनच स्मरणशक्‍ती, बुद्धी वगैरेंचे काम नीट चालावे यासाठी सर्वांनीच दक्ष राहायला हवे. 
स्मरण होण्यामागे काय काय कारणे असतात हे चरकसंहितेत पुढीलप्रमाणे सांगितलेले आहे, 

वक्ष्यन्ते कारणान्यष्टौ स्मृतिर्यैरुपजायते ।
निमित्तरूपग्रहणात्‌ सादृश्‍यात्‌ सविपर्ययात्‌ ।।
सत्त्वानुबन्धात्‌ अभ्यासात्‌ ज्ञानयोगेन पुनः श्रुतात्‌ ।
दृष्टश्रुतानुभूतानां स्मरणात्‌ स्मृतिरुच्यते ।।
...चरक शारीरस्थान

निमित्तग्रहण - निमित्त म्हणजे कारण. कारणावरून स्मृती होते. उदा. गुलाबाचे फूल पाहून त्याचा सुगंध आठवतो.

रूपग्रहण - आकार, रूपामध्ये साम्य असल्याने त्याच्याचसारखी दुसरी गोष्ट आठवते. उदा. कवठ किंवा बेलाचे फळ पाहिल्यास चेंडूची आठवण येते. वनतुळशी बघितल्याने दारातील तुळस आठवते. 

सादृश्‍य - दोन गोष्टीत साम्य असल्याने एक गोष्ट पाहिली असता पूर्वी अनुभवलेली दुसरी गोष्ट आठवते. उदा. मोगऱ्याच्या वास आला की मोगऱ्याचा गजरा डोळ्यासमोर येतो. 

विपर्यय - दोन गोष्टीत अत्यंत विरोधाभास असल्यास एक पाहिल्यास दुसरी आठवते. उदा. एखादे ओसाड माळरान पाहिल्यास पूर्वी अनुभवलेली हिरवळ आठवते.

सत्त्वानुबन्धात्‌ - सत्त्व म्हणजे मन. एखादी गोष्ट लक्षात ठेवायचीच आहे असा मनाचा आग्रह असल्यास स्मरण होतो. उदा. उद्या अमुक व्यक्‍तीचा वाढदिवस आहे ही जाणीव मनात असेल तर स्मरण होते.

अभ्यास - एखादी क्रिया पुन्हा पुन्हा करत राहिल्यास ती कायम स्मरणात राहते. उदा. तेच तेच टेलिफोनचे नंबर वारंवार वापरल्याने लक्षात राहतात.
ज्ञानयोग - परमज्ञानाच्या प्राप्तीने सर्व काही स्मरण होते. हे अध्यात्मिक प्रगतीमुळे साध्य होऊ शकते.

पुनः श्रुतात्‌ - पूर्वी अनुभवलेल्या ज्ञानाचा एखादा अंश ऐकला, पाहिला तरी संपूर्ण ज्ञान स्मरते. उदा. पूर्वी पाहिलेल्या बर्फाच्या शिखरांचा एक फोटो जरी पाहिला तरी संपूर्ण सहल आठवते किंवा पूर्वी पाठ केलेल्या कवितेच्या दोन ओळी ऐकल्या की पूर्ण कविता आठवते. याचा एक गूढ अर्थ असाही होऊ शकतो की पूर्वजन्मातील ज्ञान या जन्मात थोडासा अभ्यास केला तरी पूर्ण आठवते. 

अग्र्यसंग्रहातील यापुढचा भाग आपण पुढच्या वेळी पाहू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com