नितंबाचे फ्रॅक्‍चर

नितंबाचे फ्रॅक्‍चर

‘आपण या जगात येताना ओटीपोटातून येतो आणि या जगातून जाताना नितंबामुळे जातो,’ असे इंग्लंडचे प्रसिद्ध अस्थिवैद्य सर वॉटसन जॉन यांनी दशकभरापूर्वी म्हटले आहे. याचा अर्थ असा की, पासष्ट वर्षांहून अधिक वय असलेल्या वृद्धासाठी नितंबाचे फ्रॅक्‍चर होणे ही शेवटची तसेच अतिशय वेदनादायी घटना असू शकते. ही समस्या नेमकी काय आहे आणि त्याचे परिणाम काय संभवतात?

जसे माणसाचे अपेक्षित आयुर्मान वाढले आहे, त्यामुळे जगातील सर्वच देशांमध्ये वयोवृद्ध लोकांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. ओघाने ज्येष्ठ वयोगटातील रुग्णांना उद्भवणाऱ्या समस्याही वाढल्या आहेत. त्यामुळे या रुग्णांना उत्तम उपचार मिळावेत, तसेच त्यांना परवडेल अशा स्वरूपात उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी सगळ्याच वैद्यकीय क्षेत्रावरचा ताण अतिशय वाढला आहे. या रुग्णांमध्ये सर्वसाधारणपणे आढळणारी समस्या म्हणजे हाडे ठिसूळ किंवा नाजूक झाल्याने होणारे फ्रॅक्‍चर्स होय.

तज्ज्ञांकडून असे सांगण्यात येत आहे की, ऐशी वर्षे व त्यावरील वयाच्या वृद्धांचा आकडा पुढील चाळीस  वर्षात तिपटीने वाढणार आहे. अमेरिकेमध्ये या समस्येवरील अंदाजे खर्च हा चाळीस कोटी अमेरिकन डॉलर एवढा वर्तवण्यात आला आहे. सध्या भारतात पंचवीस कोटी नागरिक पन्नाशीच्या पुढील आहेत. त्यातील तीस टक्के महिला व पंधरा टक्के पुरुष ऑस्टियोपोरोसिस या आजाराने ग्रस्त आहेत.  भारतीय लोक एवढे असुरक्षित का आहेत?

 आनुवांशिक घटक
स्त्रियांमध्ये लवकर येणारी रजोनिवृत्ती
स्त्रियांचे गर्भाशय काढणे
नेहमीच असणारी कॅल्शियमची कमतरता
जीवनसत्व ‘ड’ चा दीर्घकालीन अभाव
बैठी जीवनशैली, हालचालींचा अभाव
औषधांमुळे होणारे परिणाम: एपिलेप्सी, पार्कीन्संस, स्टेरॉइड्‌सचे परिणाम इत्यादि

या वयाच्या लोकांमध्ये धडपडण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच अपघातांमधून किंवा आघातांमधून बाहेर येण्याचे प्रमाण यांच्यात खूप कमी असते. वृद्धांमध्ये पडण्याचे प्रमाण जास्त का असते?

वयवर्षे पासष्टच्या पुढे पडण्याची भीती असते
शरीराचे संतुलन बिघडलेले असते
मज्जासंस्थेसंबंधीत असणाऱ्या कौशल्यांचा अभाव
ठिसूळ झालेली हाडे आणि कमकुवत स्नायू
हालचालींवर किंवा व्यायामावर असलेली बंधने
आकलनशक्तीच्या समस्या  पकड कमकुवत होणे
दीर्घकालीन आजार: पार्कीन्संस वगैरे
मनोविकारांची औषधे   कमी प्रकाशात दृष्टी अंधुक असणे
काठी, वॉकर, कुबड्या यांसारखी साधने न वापरण्याची सवय. वरील साधने वापरताना अवघडल्यासारखे होणे

अंदाजे पंचाहत्तर वर्षे वय असलेल्या एका महिलेला हॉस्पिटलमधील दुर्घटना विभागात आणले गेले. घरात बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या आणि नितंबाला फ्रॅक्‍चर झाले. त्यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक होते. त्याचबरोबर त्यांना मधुमेह, हृदयरोग आणि पार्कीन्संस वरही औषधे सुरु होती. या सगळ्याबरोबरच त्यांच्यासमोर इतरांसारखेच काही प्रश्न होते. त्यांची मुले भारताबाहेर राहात होती, तसेच त्यांच्या पतीचे वय ऐंशी वर्षे होते. त्यामुळे अशा वेळी मदतीकरिता कोणीच नव्हते.

अशा रुग्णांवर उपचार कसा करावा, हा विचार करताना अनेक प्रश्न समोर येतात.
शस्त्रक्रियेच्या खर्चापेक्षा, शस्त्रक्रियेदरम्यान जबाबदारी कोण घेणार शस्त्रक्रियेनंतर रुग्णांची काळजी घेणे हे अतिशय कष्टप्रद व दीर्घकालीन असते
 डॉक्‍टर आणि हॉस्पिटलशिवाय अनेक घटक व संस्था रुग्णाच्या उपचारांमध्ये समाविष्ट असतात. त्यामुळे मनुष्यबळ हा एक न संपणारा प्रश्न आहे
 त्या महिलेची वैद्यकीय काळजी तसेच फिजिओथेरपी घरी घेतली जाईल का?
 सगळ्यात महत्वाचे म्हणजे घरी गेल्यावर त्यांच्यात होणाऱ्या सुधारणांकडे लक्ष कोण ठेवणार तसेच त्या परत पडणार नाहीत याची जबाबदारी कोण घेणार?

काही वेळेला आयुष्यभर विश्वासू सेवकांची गरज भासू शकते. काही पाश्‍चात्य देशांमध्ये रुग्ण जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभा राहात नाही, तसेच स्वावलंबी होत नाही, तोपर्यंत त्यांना वृद्धाश्रमांमध्ये ठेवले जाते. जिथे त्या रुग्णाची वैद्यकीय सेवाही केली जाते. भारतामध्ये ही संकल्पना नुकतीच अस्तित्वात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे, तसेच आग्रही फ़िजिओथेरपीने त्यांना स्वावलंबी बनवणे हा एकच मार्ग शिल्लक असतो.  रुग्णाला लवकरात लवकर अंथरुणातून उठवणे आणि स्वावलंबी बनवणे हा एकमेव यशाचा मंत्र आहे.

सामान्यपणे सर्व ठिकाणी रुग्ण धडधाकट होण्यासाठी त्याची वैद्यकीय परिस्थिती पडताळली जाते आणि त्यात खूप वेळ जातो. एक परिस्थिती अशी येते की, शस्त्रक्रिया करण्याचीही वेळ हातातून गेलेली असते. त्यामुळे अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यावर भर दिला जातो.

रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर बारा तास अंथरुणातच राहण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णाची वैद्यकीय परिस्थिती पाहून शस्त्रक्रियेनंतर चौवीस तासात रुग्ण चालू शकला तर, त्याला पाच दिवसात घरी सोडले जाते. घरी घ्यायची काळजी आणि फ़िजिओथेरपी या गोष्टी त्याला सांगितल्या जातात. दर सहा आठवड्यांनी रुग्णाला पाठपुराव्यासाठी बोलावले जाते. तसेच भविष्यात घ्यावयाची काळजी आणि उपचार सांगितले जातात. 

घरी एकटे राहणाऱ्या वयोवृद्ध लोकांचा विचार करून आपल्या देशातील वैद्यकीय क्षेत्राने नितंबाचे फ्रॅक्‍चर संदर्भात त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे.
वयोवृद्ध लोकांच्या गरजा लक्षात घेऊन, त्यांच्या घरातही अशा सुविधा निर्माण केल्या पाहिजेत, जेणेकरून पडण्या-झडण्यापासून ते सुरक्षित राहतील.
पडण्या-झडण्यापासून प्रतिबंधित होण्यासाठी वयोवृद्ध लोकांना योग्य ती माहिती पुरवली गेली पाहिजे.
ऑस्टियोपोरोसिस आणि त्यांच्या परिणामांबद्दल वयोवृद्ध लोकांना साक्षर केले गेले पाहिजे.

प्रत्येक शहरामध्ये सर्व मोठ्या हॉस्पिटलमध्ये वयोवृद्ध लोकांसाठी विशेष उपकरणे आणि सोयीसुविधा असलेला एक विभाग तयार केला गेला पाहिजे. ज्यात भूलतज्ज, सर्जन(शस्त्रक्रिया करणारे डॉक्‍टर), फ़िजिओथेरपीस्ट, अतिदक्षता विशेषज्ज्ञ तसेच शस्त्रक्रियेनंतर घरी गेल्यावर लागणाऱ्या सोयी-सुविधायांचा समावेश असावा.
डॉक्‍टरांचे काही समूह तयार व्हावेत, तातडीच्या शस्त्रक्रियांबाबत जे जाणकार असतील, रुग्णांना योग्य उपचार देतील आणि फ़िजिओथेरपीचा योग्य वापर करून रुग्णांना स्वावलंबी बनवतील.
अशा रुग्णांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा एकच मार्ग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com