अमृतोपम आवळा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aavala

आवळ्याच्या झाडाभोवती आपल्या चेतासंस्थेला चालना मिळत असल्यामुळे या झाडाखाली श्री विष्णूंचा वास आहे असे समजले जाते.

अमृतोपम आवळा!

आवळ्याच्या झाडाभोवती आपल्या चेतासंस्थेला चालना मिळत असल्यामुळे या झाडाखाली श्री विष्णूंचा वास आहे असे समजले जाते. म्हणून आवळ्याच्या झाडाच्या सावलीत बसून भोजन करण्याची, आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची भारतीय परंपरा आहे. आवळ्याचा कल्क तुपावर परतून केलेला च्यवनप्राश किंवा बाहेर ऊन असले तरी ताजे आवळे सावलीत वाळवून तयार केलेली आवळकाठी, आवळकाठीचे चूर्ण या गोष्टींची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. अशा गुणकारी आवळ्याचे महत्त्व आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

निसर्ग प्राणिमात्राला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतो. हिवाळ्यात जेव्हा पचनशक्ती उत्तम असते, वर्षभर लागणारी शक्ती व स्फूर्ती कमवून ठेवण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झालेले असते तेव्हाच औषधांत अग्रणी असणारा आवळा उपलब्ध होतो. भारतीय संस्कृतीत सर्वच वृक्षांना पूजनीय मानले जाते, पण ज्या मोजक्या वृक्ष-वनस्पतींची पूजा केली जाते त्यातील एक म्हणजे आवळा. वड-वटवृक्ष असा असतो की त्याच्या पानाचे एक टोक जमिनीत खोवले तरी त्यापासून संपूर्ण वृक्ष तयार होऊ शकतो. त्यासाठी बीजाची आवश्‍यकता असतेच असे नाही. अशा प्रकारे नष्ट न होणारे कंटिन्युएशन त्यांच्यात असते. सस्टेनन्स (काळाच्या ओघात कायम टिकणे व सातत्य असणे) व कंटिन्युएशन हे दोन शब्द आपण सध्या खूप वेळा ऐकतो. काळाच्या ओघामध्ये टिकून राहणे व पुनरुत्पत्तीची ताकद असणे या दोन गोष्टी वड, पिंपळाच्या वृक्षांत दिसून येतात. हे वृक्ष जसजसे मोठे होतात तशी त्यांची जमिनीतील मुळे सुद्धा शे-पाचशे मीटर फैलावलेली असतात. म्हणून वडा-पिंपळाचे पूजन केले जाते. स्वतःभोवती गोल गोल फिरण्याने भ्रूमध्यातील ग्रंथीला चालना मिळते. या ग्रंथीला चालना मिळालेली असताना या वृक्षांभोवती फिरण्याने आरोग्याला वेगवेगळे फायदे मिळत असतात.

स्त्रियांच्या बाबतीत संप्रेरके (हॉर्मोन्स) अधिक महत्त्वाची असल्यामुळे या वृक्षांच्या पूजेचा स्त्रियांना अधिक लाभ होत असावा. यानंतर पूजा येते आवळ्याच्या वृक्षाची. आवळा आकारमानाच्या बाबतीत वडाच्या पंक्तीत पूर्ण बसत नसला तरी श्रेष्ठत्वात तो काकणभर पुढे आहे की काय अशी शंका येऊ शकते. कारण आवळ्याच्या वृक्षाची फळे रसायन म्हणून सेवन केली जातात आवळ्याच्या सेवनामुळे मनुष्यमात्राला तारुण्य, जोम, उत्साह, आरोग्य यांची प्राप्ती होते. झाडावरून पडून वाळलेला आवळा खाल्ला तरी पचनासाठी उपयोग होऊ शकतो. अर्थात पूर्ण तयार झालेला आवळा झाडावरून काढून वाळवला तर तयार झालेली आवळकाठी निश्र्चितच अधिक गुणकारी असते. पूर्ण तयार झालेल्या आवळ्यापासून केलेला मोरावळा किंवा च्यवनप्राश यांची तुलना इतर कशाचीही होऊ शकत नाही. झाडावरून अकाली गळून पडलेल्या अपक्व आवळ्यांपासून केलेला तयार मोरावळा, आवळकाठी वा च्यवनप्राश यांचा कितपत उपयोग होत असेल हा मुद्दा वादातीत आहे.

आवळ्याच्या झाडाभोवती आपल्या चेतासंस्थेला चालना मिळत असल्यामुळे या झाडाखाली श्री विष्णूंचा वास आहे असे समजले जाते. म्हणून आवळ्याच्या झाडाच्या सावलीत बसून भोजन करण्याची, आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची भारतीय परंपरा आहे. कुठल्याही झाडाला दुखवू नये. झाडे केवळ जंगलातच नाही तर आपल्या घरांभोवतीही असावीत. सध्या तर मनुष्याने आपल्या राहण्याच्या जागांमधून झाडांना हद्दपार केलेच आहे, पण त्याने जंगलेही कापायला सुरुवात केली आहे. याचा दुष्परिणाम आज सर्वांना भोगायला लागतो आहे. जसे आई-वडिलांना दुखवल्यावर मुलांना कधीही सुख व यश मिळत नाही, तसे वृक्षांचा नाश केला तर जीवन कधीही चांगले होणार नाही. तेव्हा आपल्यावर वृक्षवल्लींचे उपकार आहेत ही गोष्ट नक्की. सध्या याची आठवण होण्याचे कारण म्हणजे सध्या झालेले पर्यावरणाचे प्रदूषण. हे प्रदूषण व त्यामुळे झालेले दुष्परिणाम पाहिले की आपल्या पूर्वजांनी वृक्षांची पूजा का करायला सांगितली हे लक्षात येते. आवळा वर्षाचे काही महिनेच मिळत असतो.

आवळ्याचा कल्क तुपावर परतून केलेला च्यवनप्राश किंवा बाहेर ऊन असले तरी ताजे आवळे सावलीत वाळवून तयार केलेली आवळकाठी, आवळकाठीचे चूर्ण या गोष्टींची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे या चार महिन्यांत आवळ्यांपासून च्यवनप्राशसारखे रसायन बनवून ठेवून आवळ्याचा उपयोग बारा महिने करून घेता येईल अशी व्यवस्था करून ठेवावी लागते. यामुळेही आवळ्याला अधिक महत्त्व आलेले आहे. आवळीपूजनाच्या आधी आवळा बाजारात आला तरी आत्मसंतुलनमध्ये आवळीपूजनाच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करून नंतरच आवळ्यापासून बनवल्या जाणाऱ्या औषधीकरणाला सुरुवात होते. च्यवनप्राश हा खरोखरी आयुर्वेदाने दिलेला जीवनीय चमत्कार आहे. लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच च्यवनप्राश घेता येतो. फक्त तो करण्याची पद्धत आपल्या शास्त्रांनी सांगितल्यानुसार असावी, त्यात कुठल्याही प्रकारचा समझौता केलेला नसावा.

आवळे पोटलीमध्ये बांधून पाठात सांगितलेल्या सर्व वनस्पतींच्या काढ्यात शिजवून त्याचा गर काढला जातो. राहिलेला काढा घट्ट केला जातो. हा गर तेला-तुपावर परतून घेतला जातो. नंतर परतलेला घर, घट्ट केलेला काढा, साखर टाकून पुन्हा शिजवून च्यवनप्राश तयार होतो. यानंतर यात वंशलोचन, वेलची, दालचिनी, मध वगैरे द्रव्य टाकली जातात. असा शास्त्रोक्त पद्धतीने बनविलेला च्यवनप्राश अनेक गुणांनी युक्त असतो. असा च्यवनप्राश वर्षभर सेवन केल्याने आवळ्याच्या फायदा वर्षभर घेता येतो. आवळ्याच्या वृक्ष जणू परमेश्र्वराने मानवाला स्वस्थ ठेवण्यासाठीच निर्माण केलेला आहे. घरच्या घरी ताज्या आवळ्यापासून रसायन बनविण्याची आयुर्वेदाच्या ग्रंथातील कृती येथे देतो आहे. घरातील सर्वांना पूर्ण हिवाळ्यात रोज हे रसायन घेता येण्यासारखे आहे.

  • एक आवळा धुऊन पुसून घ्यावा.

  • किसणीने किसून पातळ सुती कापडात ठेवून त्याला रस काढावा. आवळा चांगला असला तर कमीत कमी ३-४ चमचे रस निघतो.

  • यात एक चमचा खडीसाखरेची पूड, एक चमचा मध आणि अर्धा चमचा घरी बनविलेले पातळ केलेले तूप टाकावे.

  • सर्व मिश्रण चमच्याने नीट हलवून एकजीव करावे व सेवन करावे.

हे रसायन सकळी घेणे उत्तम असते, पण वेळेअभावी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी घेतले तरी चालते. अर्धा तास आधी किंवा नंतर दूध वा कॉफी घेऊ नये. पाच वर्षांखालील मुलांना हेच प्रमाण निम्मे घेता येईल. फक्त भारतात मिळणारा आवळा रसायन गुणात सर्वश्रेष्ठ आहे, रक्तशुद्धीपासून ते तारुण्य टिकविण्यासाठी, डोळे, केस, त्वचेच्या आरोग्य व सौंदर्यासाठी, प्रमेहासारख्या अवघड विकारातही उपयुक्त असणाऱ्या अमृतोपम आवळ्याचा प्रत्येकाने उपयोग करून घ्यायला हवा.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)

टॅग्स :articleFruithealth