स्त्री-प्रतिष्ठा...

भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री ‘गृहलक्ष्मी’ असते. स्त्री ही फक्त स्वतःच्या घराचा, परिवारातील सर्वांचा आधार नसते तर संपूर्ण भावी पिढी, संपूर्ण समाज हासुद्धा स्त्रीच्या आरोग्याशी, तिच्या सुसंस्कृत व्यवहाराशी बांधलेला असतो.
स्त्री-प्रतिष्ठा...
Summary

भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री ‘गृहलक्ष्मी’ असते. स्त्री ही फक्त स्वतःच्या घराचा, परिवारातील सर्वांचा आधार नसते तर संपूर्ण भावी पिढी, संपूर्ण समाज हासुद्धा स्त्रीच्या आरोग्याशी, तिच्या सुसंस्कृत व्यवहाराशी बांधलेला असतो.

स्त्री-संरक्षण आणि स्त्री-प्रतिष्ठा हे प्रगतीचे लक्षण मानले आहे. स्त्री-प्रतिष्ठा म्हणजे स्त्रीचा स्वतःबद्दलचा आत्मविश्र्वास, स्त्री-प्रतिष्ठा म्हणजे एकूणच निसर्गातील संतुलनासाठी स्त्री-अस्तित्वाला असणारे महत्त्व, स्त्री-प्रतिष्ठा म्हणजे स्त्री-शक्ती आणि स्त्री-आरोग्य !

भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री ‘गृहलक्ष्मी’ असते. स्त्री ही फक्त स्वतःच्या घराचा, परिवारातील सर्वांचा आधार नसते तर संपूर्ण भावी पिढी, संपूर्ण समाज हासुद्धा स्त्रीच्या आरोग्याशी, तिच्या सुसंस्कृत व्यवहाराशी बांधलेला असतो. स्त्री-प्रतिष्ठा टिकली तरच समाजाची नैतिकता कायम राहू शकते. स्त्री-शक्तीचे महत्त्व अनादी काळापासून सर्वांना समजलेले आहे. आपल्या परंपरेत म्हटलेले आहे,

‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।

यत्र एताः तु न पूज्यन्ते सर्वाः तत्र अफलाः क्रियाः॥’

जेथे स्त्रियांना योग्य मानसन्मान देऊन पूजनीय समजले जाते तेथे देवतांचा म्हणजे शक्तींचा वास असतो. या उलट जेथे स्त्रीला हीन लेखून तिच्यावर अत्याचार केला जातो तेथे सर्व कार्ये निष्फळ होतात. जीवनातील सर्व विशेष कार्यशक्ती स्त्रीलिंगी स्वरूपातच असतात. देवदेवतांचे अनेक प्रकारे वर्णन केलेले असले तरी महत्त्व आदिमाया महाशक्तीचेच असते. श्री सरस्वती देवी बुद्धीची व संवाद-संपर्कामागची शक्ती, श्री लक्ष्मी देवी ही सर्व वस्तुजात व समृद्धीमागची शक्ती आणि श्री दुर्गा देवी ही उत्क्रांती व संक्रमणामागची शक्ती. म्हणून भारतीयांनी स्त्रीला समाजाच्या मर्यादा, लज्जा, संस्कृती यांचे प्रतीक मानलेले आहे.

स्त्री संरक्षण व स्त्री प्रतिष्ठा हे प्रगतीचे लक्षण मानले आहे. स्त्री-प्रतिष्ठा म्हणजे स्त्रीचा स्वतःबद्दलचा आत्मविश्र्वास, स्त्री-प्रतिष्ठा म्हणजे एकूणच निसर्गातील संतुलनासाठी स्त्री-अस्तित्वाला असणारे महत्त्व, स्त्री-प्रतिष्ठा म्हणजे स्त्री-शक्ती आणि स्त्री-आरोग्य! एखाद्या सशक्त व्यक्तीला आजारपणामुळे स्वतःचे काम करता आले नाही तर तिला वाईट वाटणे स्वाभाविक आहे. आजारपणामुळे मनुष्य परस्वाधीन होतो आणि त्याची स्वप्रतिष्ठा कमी होते. तेव्हा स्त्रीचे आरोग्य ही तिची सर्वप्रथम प्रतिष्ठा आहे. स्त्रीपुरतेच नाही, तर पुरुषाचे आरोग्य ही त्याची प्रतिष्ठा आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे अस्तित्व शारीरिक, मानसिक व आत्मिक पातळीवर अनुभवता आले पाहिजे व त्याचे समाधान घेऊन स्वतःच्या जीवनात असे काही तरी करता आले पाहिजे, ज्याने स्वतःला स्वतःचा आदर वाटेल. हीच ती प्रतिष्ठा. जशी स्त्रीला प्रतिष्ठा हवी तशी पुरुषालाही हवी. असे दोन प्रतिष्ठित स्त्री व पुरुष मिळून एक प्रतिष्ठित कुटुंब होते, ज्यातून प्रतिष्ठित समाज उदयाला येतो व समाजाची भरभराट व उत्क्रांती होते. तेव्हा स्त्री-प्रतिष्ठेत प्रथम विचार करायचा तो स्त्रीच्या आरोग्याचा. स्त्री-पुरुषांचे आरोग्य खालावलेले आहे असे चित्र गेल्या चाळीस वर्षांत दिसू लागले आहे. परंतु यातही स्त्रीच्या आरोग्याला अधिक महत्त्व आहे कारण ती ज्या अपत्यांना जन्म देणार त्यांना कुठल्याही प्रकारचा रोग वा व्यंग उत्पन्न झाले तर हलके हलके सर्व समाजाचाच ऱ्हास होत जातो. या दृष्टीने स्त्री-प्रतिष्ठेला अधिक महत्त्व द्यायला पाहिजे, अर्थातच स्त्रीनेच स्वतःच्या आरोग्याला खूप महत्त्व द्यायला पाहिजे.

स्त्री व पुरुषाच्या शरीरातील फरक म्हणजे स्त्रीला असलेले गर्भाशय व तिचे स्त्री अवयव. संपूर्ण आरोग्यासाठी जबाबदार असणारा शरीरातील अग्नी, जो शरीरातील हॉर्मोनल संस्थेशी जोडलेला आहे, तो स्त्रियांच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतो, त्यामुळे स्त्रियांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे खूप अवघड होते. सध्या आधुनिकतेच्या व धावपळीच्या नावाखाली मनुष्याचे जीवनमान अनैसर्गिक होत आहे, त्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक रोग उत्पन्न होत आहेत, मनुष्याची काम करण्याची पद्धत निसर्गाला सोडून होत आहे. निसर्गाची अतोनात हानी होत आहे. ही हानी थांबविण्याचे प्रयत्न थातुरमातुर असून ते केवळ चर्चेच्या स्वरूपात राहिलेले आहेत. माणसाच्या गरजा कमी करण्याकडे लक्ष न देता झालेले प्रदूषण कमी करण्यासाठी काय करता येईल, या संबंधीच्या चर्चा होताना दिसतात. वातावरणाचे प्रदूषण, ध्वनीचे प्रदूषण, नद्या-नाले, पर्वत यांचे प्रदूषण तर होत आहेच पण जुन्या मोडलेल्या उपग्रहांचा कचरा अवकाशात अनेक वर्ष फिरत राहून अवकाशातही प्रदूषण वाढत आहे.

या सर्व प्रदूषणाचा परिणाम म्हणून उष्णता वाढते आहे, निसर्गाचे ऋतुचक्र बिघडत आहे व अवेळी पाऊस, अवेळी थंडी, अवेळी उष्णता, दुष्काळ अशा अनेकविध समस्या आपणास सामोऱ्या येत आहेत. नको त्या देशात थंडी, नको त्या देशात उष्णता अशा तऱ्हेने निसर्गाचा ऱ्हास सुरू झालेला दिसतो आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून आजची स्त्री बळी ठरलेली आहे. शरीराने दुर्बल असणाऱ्यांचे शोषण करणे सोपे असल्याने स्त्रीचे शोषण मोठ्या प्रमाणावर झालेले दिसते. यात भर म्हणूनच की काय निसर्गाच्या असंतुलनामुळे स्त्रीचा एकंदरीत अग्नी (हॉर्मोनल सिस्टिम) दूषित होऊन स्त्रीला नाना तऱ्हेच्या यातना भोगाव्या लागत आहेत. एकूणच स्त्रीला सुखासाठी वा तिच्या स्त्रीत्वाचा स्वीकार होण्यासाठी बाह्य सौंदर्याचा आधार घेणे आवश्‍यक आहे, अशा भ्रामक समजुतीमुळेसुद्धा स्त्रीच्या आरोग्यासाठी केवळ वरवरचे व कामचलाऊ उपाय अवलंबण्यात आलेले दिसतात. अर्थात, या सगळ्यांचा परिणाम संपूर्ण भावी पिढीवर, सामाजिक नैतिक मूल्यांवर होणे स्वाभाविक आहे. आयुर्वेदिक जीवनशैली अंगीकारली, स्त्री-आरोग्यासाठी आयुर्वेदातील उपचारांची कास धरली, स्वतःच्या स्वार्थापेक्षा किंवा क्षणिक सुखापेक्षा निसरागाच्या संतुलनासाठी प्रयत्न केले तर खऱ्या अर्थातने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जाईल.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com